महिलांमध्ये डोपामाइन कमी होण्याची लक्षणे

अनेक महिला थकवा समजून अशा प्रकारच्या स्थितींना मुकपणे सामोऱ्या जात असतात. तेव्हा डोपामाइन कमरतेची लक्षणे कशी ओळखावी तसेच ही स्थिती कोणत्या कारणांमुळे उद्भवते हे आपण आज जाणून घेऊ.

Story: आरोग्य |
5 hours ago
महिलांमध्ये डोपामाइन कमी होण्याची लक्षणे

रुपा दोन मुलांची आई, नोकरी करणारी आणि सगळ्यांच्या नजरेत ‘परफेक्ट’ स्त्री होती. घर, ऑफिस, मुलं, नवरा सगळं व्यवस्थित. सकाळपासून रात्रीपर्यंत सगळ्यांची काळजी घेण्यातच तिचा दिवस संपायचा. पण काही काळानंतर हळूहळू नकळत तिचा उत्साह कमी कमी होत गेला. आवडते संगीत ऐकले तरी काही वाटेना, आवडते जेवण समोर असून भूक लागेना. ऑफिसमध्ये बसल्यावर ती एकटक संगणकाच्या पडद्याकडे बघत राहायची, पण विचार एकही पुढे सरकत नसे. सगळे नीट चालू असूनही आतून काहीतरी हरवल्यासारखे वाटत होते. तिला वाटले कदाचित थकव्यामुळे हे होत आहे. पण हा फक्त थकवा नव्हता; तिच्या मेंदूत आनंद निर्माण करणाऱ्या डोपामाइन या होर्मोनची कमतरता झाली होती ज्यामुळे तिच्यातला उत्साह, आनंद, आत्मविश्वास कमी कमी होत चालला होता.

रुपासारख्या अनेक महिला थकवा समजून अशा प्रकारच्या स्थितींना मुकपणे सामोऱ्या जात असतात. तेव्हा डोपामाइन कमरतेची लक्षणे कशी ओळखावी तसेच ही स्थिती कोणत्या कारणांमुळे उद्भवते हे आपण आज जाणून घेऊ.

डोपामाइन म्हणजे काय?

डोपामाइन हा मेंदूमध्ये निर्माण होणारा ‘न्यूरोट्रान्समीटर’ आहे म्हणजेच मेंदूतील पेशी एकमेकांशी संवाद साधण्यासाठी वापरत असलेले होर्मोन. याचा संबंध आनंद, प्रेरणा, लक्ष, एकाग्रता, झोप, लैंगिक इच्छा आणि हालचालींचे नियंत्रण यांच्याशी असतो. डोपामाइनची योग्य पातळी असणे मानसिक आणि शारीरिक आरोग्यासाठी अत्यंत आवश्यक असते.

महिलांमध्ये डोपामाइन व इतर हार्मोन्सचा काय संबंध असतो?  

महिलांमध्ये इस्ट्रोजेन हा हार्मोन डोपामाइन रिसेप्टर्सची कार्यक्षमता वाढवतो. म्हणून मासिक पाळी येण्याआधीचा काळ, प्रसूतीनंतर किंवा मेनोपॉज दरम्यान जेव्हा इस्ट्रोजेन कमी असते, तेव्हा डोपामाइनची पातळीही कमी होऊ शकते. यामुळे मूड स्विंग्स, उदासीनता आणि थकवा वाढतो.

कोणत्या कारणांमुळे महिलांमध्ये डोपामाइन कमी होऊ शकते?

१. दीर्घकालीन ताण – सतत तणावाखाली राहिल्यामुळे मेंदूतील डोपामाइन निर्मिती कमी होते.

२. हार्मोनल असमतोल – इस्ट्रोजेनची पातळी कमी झाल्यास (उदा. पेरिमेनोपॉज, मेनोपॉज दरम्यान) डोपामाइन रिसेप्टर्सची संवेदनशीलता कमी होते.

३. झोपेचा अभाव – झोपेची कमतरता डोपामाइन रिसेप्टर्सची कार्यक्षमता घटवते.

४. अयोग्य आहार – आहारात टायरोसीन आणि फेनिलअ‍ॅलनिन सारख्या अमिनो अ‍ॅसिड्सचा अभाव असल्यास डोपामाइन निर्मिती घटते.

५. कमी शारीरिक हालचाल – व्यायामाचा अभाव मेंदूतील ‘रिवार्ड सिस्टीम’ कमी सक्रिय ठेवतो.

६. औषधांचा दुरुपयोग – निकोटीन, कॅफिन, अल्कोहोल आणि काही औषधे तात्पुरते डोपामाइन वाढवतात पण नंतर त्याची नैसर्गिक निर्मिती कमी करतात.

महिलांमध्ये डोपामाइन कमी होण्याची लक्षणेः

 १. मानसिक लक्षणे

 प्रेरणेचा अभाव – काहीही करण्याची इच्छा नसणे, सतत ‘उदास’ वाटणे.

 आनंदाचा अभाव– आवडत्या गोष्टींतून आनंद न मिळणे.

 उदासीनता किंवा नैराश्य 

 अतिशय थकवा, उत्साह नसणे

 एकाग्रता कमी होणे, लक्ष विचलित होणे

 स्वतःबद्दल नकारात्मक विचार, आत्मविश्वास कमी होणे

२. शारीरिक लक्षणे

 झोपेच्या तक्रारी – झोप न लागणे किंवा झोपल्यानंतरही थकवा न जाणे

 लैंगिक इच्छेचा अभाव

 डोकेदुखी किंवा मायग्रेन

 भूक कमी होणे किंवा गोड पदार्थांची तीव्र इच्छा

 कमी ऊर्जा, स्नायूंमध्ये ताण किंवा वेदना

३. वर्तनातील बदल

 व्यसनाकडे ओढा – सोशल मीडिया, कॅफिन, साखर, गेमिंग किंवा खरेदी याकडे सतत ओढ वाटणे.

 काम टाळण्याची प्रवृत्ती

 संवेदनशीलता किंवा चिडचिडेपणा वाढणे

डोपामाइन नैसर्गिकरीत्या वाढवण्यासाठी कोणते उपाय करावेत?

योग्य आहार:

 टायरोसीनयुक्त अन्न – अंडी, कडधान्ये, डाळी, दूध, पनीर, बदाम, केळी आहारात असावेत

 ओमेगा-३ फॅटी अ‍ॅसिड्स – मासा, जवस, चिया बीज

 अँटीऑक्सिडंट्स – फळे, हिरव्या भाज्या

जीवनशैलीतील बदल:

 दररोज ३० मिनिटे व्यायाम

 झोपेचा योग्य वेळ (७–८ तास)

 ध्यान, योग किंवा श्वसन तंत्रे

 संगीत, नृत्य, चित्रकला यांसारख्या आपल्याला आनंद देणाऱ्या क्रिया कराव्यात.

 अतिशय कॅफिन, साखर आणि अल्कोहोल, उशिरापर्यंत स्क्रीन वापरणे टाळावे.

डोपामाइन हे केवळ ‘आनंदाचे रसायन’ नाही, तर महिलांच्या मानसिक, भावनिक आणि शारीरिक आरोग्याचे केंद्रबिंदू आहे. जर सतत उदासी, उत्साहाचा अभाव, झोपेच्या समस्या किंवा जीवनात रस न उरणे अशा तक्रारी २ आठवड्यांपेक्षा जास्त काळ असतील, तर मानसोपचारतज्ज्ञ किंवा एंडोक्रिनोलॉजिस्ट यांचा सल्ला घ्यावा. कधी कधी थायरॉइड, आयर्न डिफिशियन्सी किंवा व्हिटॅमिन डी कमतरता हेदेखील डोपामाइनसारखीच लक्षणे निर्माण करू शकतात.


डॉ. श्वेता राऊत मुळगावकर