लैंगिक छळ

परंतु दुर्दैवाने आपला समाज मात्र अजूनही लैंगिक छळाला लिंगावर मोजतो. पुरुष जर पीडित असेल, तर त्याची तक्रार विनोद बनते; स्त्री असेल, तर तिचं आयुष्य न्यायालयात उघडं पडतं. दोघांचंही सन्मानावरचं ओझं मात्र सारखंच असतं.


5 hours ago
लैंगिक छळ

शब्द सरळ आहेत परंतु त्याचे परिणाम खोलवर जाणवतात. ह्याविषयी वाच्यता करतानाही आवाज नकळत थोडा थरथरतो आणि खोलीतली हवा जड होते. समाजात देखील हा विषय फक्त कानाकोपऱ्यात कुजबुजला जातो, जणू काही बोलणं म्हणजे पाप. 

खरंतर, लैंगिक छळाची व्याख्या अगदी स्पष्ट आहे. कोणाच्याही इच्छेविरुद्ध केलेले लैंगिक वर्तन, टिप्पणी, स्पर्श, इशारे किंवा मानसिक त्रास देणारी कृती. ती विनोदाच्या नावाखाली केलेली असो, वा ‘मैत्रीपूर्ण जवळीक’ म्हणून. परंतg परवानगीशिवाय केलेला प्रत्येक स्पर्श हा एखाद्याच्या प्रतिष्ठेला, संमतीला आणि सुरक्षिततेला धक्का पोहोचवतो.

आता, प्रश्न पडतो हा विषय फक्त महिलांपुरताच मर्यादित आहे का? तर अजिबात नाही.

कार्यालयात, महाविद्यालयात किंवा सामाजिक वर्तुळात अनेकदा पुरुषांनाही लैंगिक छळाचा सामना करावा लागतो. फक्त त्यांच्यासाठी ते सांगणं, स्वीकारणं किंवा मदत मागणं अजूनही कठीण आहे. एवढंच नाही तर, अगदी तृतीयपंथातील व्यक्ती अथवा लहान विद्यार्थीही या वेदनेपासून मुक्त नाहीत.

उदा. एका तरुण मुलीला ऑफिसातल्या वरिष्ठांकडून ‘सूचक’ जोक ऐकावा लागतो  किंवा “थोडं फ्लर्टिंग केलं तर काय झालं?” अशा सहज वाक्यांमधून छळाचा प्रवास सुरू होतो. तर दुसऱ्या बाजूला कॉलेजात एका मुलाशी ‘ओव्हर फ्रेंडली’ बोलणं आणि समोरच्याच्या इच्छेचा मान न राखता जबरदस्ती मर्यादा ओलांडणं यामधली बारीक रेषा अनेकांना समजत नाही. ह्यात दोघांच्या वेदना भिन्न नाहीत. परंतु दुर्दैवाने आपला समाज मात्र अजूनही लैंगिक छळाला लिंगावर मोजतो. पुरुष जर पीडित असेल, तर त्याची तक्रार विनोद बनते; स्त्री असेल, तर तिचं आयुष्य न्यायालयात उघडं पडतं. दोघांचंही सन्मानावरचं ओझं मात्र सारखंच असतं.

शाळा असो वा महाविद्यालय, ऑफिस असो किंवा व्यवसाय, शिक्षक-विद्यार्थी, वरिष्ठ-कनिष्ठ, मार्गदर्शक-शिष्य या सगळ्या नात्यांमध्ये सत्ता अर्थात power आणि नियंत्रण अर्थात control यांचा खेळ सुरूच असतो. त्यामुळे कुणाचं प्रमोशन, कुणाचा रिपोर्ट, कुणाचं प्रोजेक्ट सगळं एखाद्याच्या इच्छेनुसार वाकवता येतं आणि त्याचा परिणाम ‘छळ’ या रूपाने बाहेर येतो.

याच पार्श्वभूमीवर २०१३ मध्ये आलेला POSH Act (Prevention of Sexual Harassment at Workplace) हा कायदा म्हणजे स्त्रिया आणि पुरुष दोघांसाठीही संरक्षणाचं कवच आहे. या कायद्यांतर्गत प्रत्येक संस्थेत POSH Committee म्हणजेच आंतरिक समस्या समिती स्थापन करणं बंधनकारक केले आहे जिथे कर्मचारी, विद्यार्थी आपली तक्रार सुरक्षितपणे मांडू शकतात.

परंतु दुर्दैवाने अशी कमिटी व कायदे असूनही, छळ हा केवळ सार्वजनिक ठिकाणीच नाही, तर घराच्या बंद दारांआडही तो घडतो. वैवाहिक बलात्कार हा अजूनही कायद्याच्या पानांवर धूसर आहे, पण वास्तवात अनेक महिलांच्या मनावर कोरलेली जखम आहे. “पती आहे म्हणून हक्क आहे,” हा खरा समाजाचा भ्रम आहे.

लैंगिक छळ आणि मानसिक आरोग्य

लैंगिक छळानंतरची अवस्था ही केवळ भीतीची नसते; ती आत्मसन्मानावर झालेली एक खोल जखमदेखील असते. एखाद्या व्यक्तीचं हसू हरवतं, झोप उडून जाते आणि मन भीतीनं गुरफटतं. त्याच्या ‘self-concept’ ला हादरा बसतो. प्रत्येक गोष्ट करताना, पुन्हा तोच धोका जाणवत राहतो. या अवस्थेला केवळ सहानुभूती (sympathy) पुरेशी नसते, तर संवेदना (empathy) देखील लागते. म्हणजे स्वतःला त्यांच्या स्थानावर ठेवून अनुभव समजून घेणे. 

आणि ह्याचसाठी इथे समुपदेशकाची भूमिका महत्त्वाची ठरते. समुपदेशनात पीडित व्यक्तीला पुन्हा स्वतःवर विश्वास ठेवायला शिकवलं जातं, की “मी चुकीचा/चुकीची नाही”. अनुभवाचं विश्लेषण करताना मानसशास्त्र सांगतं की trauma म्हणजे फक्त आठवणींचं ओझं नाही, तर भावनांचा गोठलेला प्रवाह आहे. त्यामुळे हळूहळू त्या गोठलेल्या भावनांना शब्द देणं हेच खऱ्या उपचाराचं 

स्वरूप आहे.

या प्रक्रियेत ती व्यक्ती आपल्या भीतीवर मात करून, स्वतःची सीमा ओळखून, सामाजिक आणि वैयक्तिक दृष्ट्या सशक्त बनते :

 कॉग्निटिव्ह बिहेविअरल थेरपी: नकारात्मक विचारांचे पुनरावलोकन करणे.

 सेल्फ-इफिकसी बिल्डिंग: स्वतःवरचा विश्वास वाढवणे, स्वतःच्या निर्णयांचा अधिकार पटवून देणे.

 ️माइंडफुलनेस आणि रिलॅक्सेशन टेक्निक्स: त्रासदायक आठवणींवर ताण कमी करणे.

 ️नॅरेटिव्ह थेरपी: आपले अनुभव कथेच्या स्वरूपात मांडणे, ज्यामुळे मानसिक भार हलका होतो.

मानसशास्त्रीय दृष्टिकोनातून, लैंगिक छळानंतरची मानसिक उभारी हा एक संघर्षपूर्ण प्रवास आहे. व्यक्तीचा आत्मविश्वास, आत्मसन्मान आणि सामाजिक सहभाग हळूहळू पुनर्संचयित होतो. त्यामुळे ही कथा फक्त पीडिताची नाही, तर प्रत्येक समाजासाठी एक धडा आहे, संवेदनशीलता, समजूतदारपणा आणि साहस यांचा संगम.


- मानसी कोपरे

मानसोपचारतज्ज्ञ व समुपदेशक

डिचोली - गोवा 

७८२१९३४८९४