
एकाच ठिकाणी वर्षानुवर्षे चिकटून बसलेल्या पोलिसांच्या बदली आदेशांची अखेर अंमलबजावणी सुरू झाली आहे. शनिवारी बदलीच्या आदेशानुसार पणजी पोलीस स्थानकातून पाच कर्मचाऱ्यांना सेवामुक्त करण्यात आले. राज्यात २०२४ पासून बदली आदेश जारी असूनही सुमारे ५७९ पोलीस त्या ठिकाणाहून अन्यत्र ठिकाणी बदली होऊन गेले नव्हते. याबाबत ‘गोवन वार्ता’ने वृत्त प्रकाशित केले होते. त्यानंतर अनेक कर्मचाऱ्यांना त्यांच्या मूळ पदावरून तातडीने मुक्त करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे.
पोलीस स्थापना मंडळाच्या शिफारशीनुसार पोलीस खात्याने मागील पाच वर्षांत अनेक कर्मचाऱ्यांच्या बदल्या केल्या आहेत. मात्र, यातील ५७९ जण अद्याप नवीन जागी रूजू झालेले नाहीत. यामध्ये अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांचाही समावेश आहे. पोलीस खात्याने अनेक वर्षे एकाच ठिकाणी कार्यरत असलेले अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची यादी मागवली होती. त्यातून अनेक जण पाच वर्षांहून अधिक काळ एकाच ठिकाणी कार्यरत असल्याचे स्पष्ट झाले होते.
याआधी बदली करण्यात आलेले कर्मचारी नवीन ठिकाणी रूजू झाले नसल्याने पोलीस खात्याने १५ आणि १९ सप्टेंबर रोजी बिनतारी संदेश जारी करून कर्मचाऱ्यांना मुक्त करण्याचे आदेश दिले. तसे न केल्यास संबंधित पोलीस स्थानक तसेच विभाग प्रमुखांवर खात्याअंतर्गत कारवाई करण्यात येईल, असा इशाराही देण्यात आला
होता. काही पोलीस अधिकारी व कर्मचारी मागील अनेक वर्षे एकाच ठिकाणी आहेत. त्यांच्या बदलीचे फक्त आदेश जारी झाले. त्यांनी नवीन ठिकाणी रूजू होणे आवश्यक आहे. मात्र, तेथे गेल्यानंतर संबंधित अधिकारी पुन्हा मूळ जागी रूजू होण्यास अडथळा निर्माण करू शकतील, या भीतीपोटी काही कर्मचारी आदेशाचे पालन करत नाहीत, अशी माहिती सूत्रांनी दिली.
बदली करून घेण्यासाठी राजकीय वजनाचा वापर
काही कर्मचाऱ्यांनी नवीन ठिकाणी रूजू न होता, पुन्हा त्याच ठिकाणी बदली करून घेतल्याचे समोर आले होते. तर काही कर्मचाऱ्यांनी आपल्या सोयीनुसार बदली करून घेण्यासाठी राजकीय वजन वापरल्याचेही उघडकीस आले होते. २०२५ मध्ये बदली केलेल्या ५०६ कर्मचाऱ्यांमध्ये ३ पोलीस निरीक्षक, २४ उपनिरीक्षक, ३९ सहाय्यक उपनिरीक्षक, ६० हवालदार तर ३८० कॉन्स्टेबलचा समावेश आहे.