पर्यावरण, प्रदूषण नियंत्रण मंडळ, जलसंपदा विभागाकडे पत्रव्यवहार

पणजी : वेर्णासहीत (Verna) सासष्टी तालुक्यातील (Salcete Taluka) एक प्रमुख नदी तथा एकेकाळची जीवनदायीनी साळ नदीची (Sal River) स्थिती बिकट बनली आहे. नदी मैला वाहून नेणारा नाला बनला आहे. ऐतिहासिक, पर्यावरणाच्यादृष्टीने महत्त्व असलेल्या या नदीची स्थिती अनेकांना अस्वस्थ करू लागली आहे. नदी प्रदूषणापासून वाचवून गतवैभव मिळावे म्हणून आता वेर्णा व आसपासच्या भागातील ग्रामस्थ एकवटले आहेत. सरकारकडे साकडे घातले आहेत. पर्यावरण संचालनालय (Environment), गोवा राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळ (Goa State Pollution Control Board), जलसंपदा विभाग (Water Resource) या सरकारी खात्याशी पत्रव्यवहार करून नदीचा नैसर्गिक प्रवाह पुर्वस्थितीत आणण्याची मागणी केली आहे.
सरकारी खात्यांकडे केलेल्या पत्रव्यवहारात म्हटले आहे की, साळ नदीचे पर्यावरणीय स्वास्थ्य सांभाळण्याकडे लक्ष द्यावे. तसेच नैसर्गिक प्रवाह सुरळीत करण्याची मागणी केली आहे, नदीच्या प्रवाहात कच्चे सांडपाणी, मैला, घाऊक मासळी बाजारातील कचरा, दुर्गंधीयुक्त पाणी, कत्तलखान्यांतील कचरा यामुळे नदीचे स्त्रोत मोठ्या प्रमाणात प्रदुषित झाले आहे. साळ नदी व उपनद्यांची स्थिती बिकट बनली आहे. वेर्णा गावांमधून सुरू होणारी नदी अरबी समुद्राला मिळेपर्यंत प्रदुषणाचे आगर बनले आहे. त्यातून एकूण जलस्त्रोतच प्रदुषित होत आहेत. महामार्गामुळे ही नदीच्या नैसर्गिक प्रवाहाला काही ठिकाणी अडथळे निर्माण झाले आहेत. उभारण्यात आलेले स्वच्छता प्रकल्प कुचकामी ठरले आहेत. साळ नदी वाचवण्यासाठी त्वरीत पावले उचलावीत अशी मागणी वेर्णा येथील ग्रामस्थांनी दक्षिण गोवा जिल्हाधिकारी, गोवा मानवाधिकार आयोग, पर्यावरण संचालनालय, गोवा राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळ, जलसंपदा विभाग, गोवा राज्य कचरा व्यवस्थापन प्राधिकरण व संबंधित सरकारी खात्यांकडे पत्रव्यवहार करून केली आहे.