एकजण गजाआड; दुसऱ्याचा शोध जारी.

जोयडा : उत्तर कन्नड जिल्ह्यातील भटकळ पोलिसांनी बनावट अमेरिकन डॉलरची बेकायदेशीर देवाणघेवाण करणाऱ्या एका मोठ्या एक्सचेंज रॅकेटचा पर्दाफाश केला. या कारवाईत एका व्यक्तीला अटक करण्यात आली असून, या अवैध चलनाची सूत्रे थेट गोव्यातील मडगाव येथून हलवली जात असल्याचे उघड झाले आहे. भटकळ रेल्वे स्थानकाजवळ ही कारवाई करण्यात आली. रुक्सुद्दीन सुलतान बाशा (वय ६२), रा. भटकळ (मुस्का स्ट्रीट) या आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे. पोलिसांनी रुक्सुद्दीनकडून सुमारे ७ लाख ३० हजार ८०० रुपये किमतीचे बनावट अमेरिकन डॉलर जप्त केले आहेत.
गोव्यातून तस्करी
पोलिसांच्या तपासानुसार, आरोपी रुक्सुद्दीन सुलतान बाशा हा बनावट चलन गोव्यातील मडगावहून रेल्वेमार्गे भटकळमध्ये घेऊन येत होता. अटक केल्यानंतर झालेल्या चौकशीत त्याने हे डॉलर स्थानिक रहिवासी असलेल्या कपा मुझीब याला देण्यासाठी स्कूटरवरून नेत असल्याची माहिती दिली. पोलिसांनी मुझीबचा शोध सुरू केला आहे.
पोलिसांनी केलेल्या छाप्यामध्ये १०० डॉलर्स मूल्याच्या १४ नोटा आणि ५० डॉलर्स मूल्याच्या १५६ नोटा, असा एकूण १७२ डॉलरचा म्हणजेच भारतीय चलनानुसार सुमारे ८ लाख रुपये किमतीचा बनावट चलन साठा जप्त केला आहे.
भटकळ केंद्र बनले
या तपासातून अवैध चलनाचा गोव्यापर्यंत विस्तारलेला मोठा नेटवर्क उघड झाला आहे. अनेक नागरिक गल्फ देशांमध्ये काम करत असल्याने भटकळ हे अशा अवैध देवाणघेवाणीचे केंद्र बनले आहे. या परिसरातील अनेक रहिवासी भारतीय रुपयांचे आणि इतर परकीय चलनांचे अमेरिकन डॉलर्समध्ये रूपांतर (Convert) करतात, ज्यामुळे बेकायदेशीर देवाणघेवाणीचा एक मोठा बाजार येथे तयार झाला आहे.
आरोपी रुक्सुद्दीन हा गोव्यातून ट्रॅव्हल एजंट्स (Travel Agents) आणि परदेशी पर्यटकांकडून डॉलर्स मिळवत होता आणि तपास यंत्रणांना चुकवण्यासाठी ही रक्कम स्कूटरसारख्या दुचाकी वाहनातून भटकळला आणत होता, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.
भटकळ शहर पोलीस स्थानकाचे सीपीआय दिवाकर पी.एम. यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे. रुक्सुद्दीन आणि मुझीब यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, या रॅकेटमधील अन्य लोकांचा आणि या अवैध व्यवसायाच्या संपूर्ण विस्ताराचा तपास पोलीस करत आहेत. जप्त केलेले चलन पुढील चौकशीसाठी सीमाशुल्क (कस्टम्स) अधिकाऱ्यांच्या ताब्यात देण्यात आले आहे.