
पणजी : अरबी समुद्रात तयार झालेला कमी दाबाचा पट्टा तसेच अन्य वातावरणीय कारणांमुळे शनिवारी राज्यात सोसाट्याच्या वाऱ्यासह पावसाने जोरदार हजेरी लावली. राज्यात ठीक ठिकाणी झाडे पडून नुकसानीच्या घटना घडल्या. पणजीतील चर्च व्ह्यू इमारतीजवळ दरड कोसळल्याने येथील घरांचे किरकोळ नुकसान झाले. ही घटना पहाटे २.३० च्या सुमारास घडली. वादळी वाऱ्यामुळे श्यामाप्रसाद मुखर्जी स्टेडियम येथे उभारण्यात आलेले डेकोरेशन कोसळून पडले.
शनिवारी पहाटे पासूनच पावसाला सुरुवात झाली. पणजीत सकाळी दहा पर्यंत पावसाची संततधार सुरू होती. सततच्या पावसाने शहरातील काही रस्ते पाण्याखाली गेले. हवामान खात्याने राज्यात २५ ते २८ ऑक्टोबर दरम्यान वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता व्यक्त केली आहे. यानुसार या चार दिवसांसाठी पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. तर २९ ते ३१ ऑक्टोबर दरम्यान तुरळक स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे.
राज्यात आज सकाळी ८.३० पर्यंत सरासरी ३ इंच पावसाची नोंद झाली. ही ऑक्टोबर महिन्यातील सर्वाधिक पावसाची नोंद ठरली. वरील कालावधीत काणकोणमध्ये ५.६० इंच, मुरगावमध्ये ४.१२ इंच पाऊस पडला. राज्यात १ ते २५ ऑक्टोबर दरम्यान सरासरी ७.३० इंच पावसाची नोंद झाली आहे. २५ ते २८ ऑक्टोबर दरम्यान वाऱ्याचा वेग ताशी ३५ ते ५५ किमीपर्यंत पोहोचण्याची शक्यता असल्याने मच्छीमारांनी समुद्रात उतरू नये असे आवाहन हवामान खात्याने केले आहे.