
पणजी: आंतरराष्ट्रीय कोकेन तस्करी आणि मनी लाँड्रिंग प्रकरणाचा तपास करत असलेल्या सक्तवसुली संचालनालयाच्या (ED) गोवा विभागाने मोठी कारवाई केली आहे. ४३.२० कोटी रुपये किमतीच्या कोकेन तस्करी प्रकरणी 'ईडी'ने एकूण सातजणांविरुद्ध (Accused) मेरशी येथील विशेष न्यायालयात आरोपपत्र (Prosecution Complaint - PC) दाखल केले आहे.
प्रिव्हेंशन ऑफ मनी लाँड्रिंग ॲक्ट (PMLA), २००२ च्या तरतुदींनुसार १८ ऑक्टोबर २०२५ रोजी हे आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे. या सात आरोपींमध्ये टांझानियाचा नागरिक वेदास्तो ऑडॅक्स, मासूम उइके, चिराग दुधाट, झिम्बाब्वेचा नागरिक तारिरो ब्राईटमोर मंगवाना, तसेच रेश्मा वाडेकर, मंगेश वाडेकर आणि निबू व्हिन्सेंट यांचा समावेश आहे.
काय आहे प्रकरण?
गोवा पोलिसांच्या गुन्हे शाखेने १४ एप्रिल २०२५ रोजी चिकोळणा बसस्थानक परिसरात छापा टाकून ४.३२ किलो कोकेन जप्त केले होते, ज्याची आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत किंमत सुमारे ४३.२० कोटी रुपये आहे. लाओसमधून भारतात या कोकेनची तस्करी झाली होती. याप्रकरणी गुन्हे शाखेने निबू व्हिन्सेंट, रेश्मा वाडेकर आणि तिचा पती मंगेश वाडेकर यांना अटक केली होती. चौकशीत रेश्मा वाडेकर हिने विदेशातून ड्रग्ज आणल्याचे समोर आले होते. या आंतरराष्ट्रीय ड्रग्ज सिंडिकेटमध्ये मनी लाँड्रिंगचा सहभाग आढळल्याने, 'ईडी'ने १४ मे २०२५ रोजी तपास सुरू केला.
आंतरराष्ट्रीय सिंडिकेटचे धागेदोरे
'ईडी'च्या तपासणीत उघड झाले आहे की, तारिरो ब्राईटमोर मंगवाना (जो वडोदरा येथील पारुल विद्यापीठात विद्यार्थी होता) याने या आंतरराष्ट्रीय ड्रग्ज वाहतुकीत मोठी भूमिका बजावली. तोच भारतीय नागरिकांसाठी ड्रग्ज कुरिअर (Courier) म्हणून काम करण्यासाठी प्रवासाची व्यवस्था करत होता आणि आर्थिक मदत करत होता. मुख्य आरोपी वेदास्तो ऑडॅक्स या टांझानियाच्या नागरिकाकडून मंगवाना या कृत्यांसाठी कमिशन घेत होता.
मंगवानाच्या बँक खात्यांमध्ये ऑक्टोबर २०२४ ते एप्रिल २०२५ या काळात ४८.७१ लाख रुपये जमा झाल्याचे उघड झाले आहे. त्याने रेश्मा वाडेकर, मंगेश वाडेकर आणि चिराग दुधाट यांच्या खात्यातही पैसे जमा केले होते. त्याने अब्दुस समद जमाल मन्सूरी (नेपाळ पोलिसांनी अटक केलेला ड्रग्ज तस्कर) याला बँकॉकला जाण्यासाठी तिकीट बुक करून आर्थिक मदत केल्याचेही उघड झाले आहे.
देशभर छापे आणि मालमत्ता जप्त
'ईडी'ने यापूर्वी १९ ऑगस्ट २०२५ रोजी दिल्ली, महाराष्ट्र, गुजरात, पश्चिम बंगाल, गोवा (चिकोळणा-बोगमाळो येथील वाडेकर आणि व्हिन्सेंटच्या घरांसह), हरियाणा, झारखंड आणि उत्तर प्रदेश अशा अनेक राज्यांमध्ये व्यापक शोधमोहीम राबवली होती. यामध्ये महत्त्वाचे डिजिटल पुरावे, दस्तऐवज जप्त करण्यात आले आणि अनेक बँक खाती गोठवण्यात आली होती.
याचबरोबर, 'ईडी'ने १८ ऑक्टोबर २०२५ रोजी रेश्मा वाडेकर हिच्या पश्चिम बंगालमधील उत्तर २४ परगणा येथील एका घरावर ४५.१५ लाख रुपयांची तात्पुरती जप्ती (Provisional Attachment Order - PAO) आणली आहे. रेश्मा वाडेकर हिने मार्च २०२५ मध्ये व्हिएन्टाइन येथून ४.३ किलो कोकेन भारतात आणले होते. आतापर्यंतच्या तपासात ड्रग्ज तस्करीद्वारे ८८.१४ लाख रुपयांची 'गुन्ह्यातील मालमत्ता' (Proceeds of Crime - POC) निर्माण झाल्याचे उघड झाले आहे.
'ईडी'च्या तपासात आंतरराष्ट्रीय रॅकेटचे 'गोल्डन ट्रँगल', मध्य पूर्व, नेपाळ आणि बांगलादेशमधील तस्करांशी असलेले संबंध समोर आले आहेत. 'ईडी'ने अंमली पदार्थांच्या तस्करीत गुंतलेल्या आर्थिक पायाभूत सुविधांवर लक्ष्य साधत तपास सुरू ठेवला आहे.