दारूतून गुंगीचे औषध पाजल्याने महाराष्ट्रातील युवतीचा मृत्यू

भावाकडून तक्रार : कळंगुट पोलिसांकडून सलून मालकावर गुन्हा नोंद

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
24th October, 11:45 pm
दारूतून गुंगीचे औषध पाजल्याने महाराष्ट्रातील युवतीचा मृत्यू

पणजी : पर्वरी येथे सलूनचा व्यवसाय करणाऱ्या अहिल्यानगर-महाराष्ट्र येथील २६ वर्षीय युवतीचा नशिली दारू प्राशन केल्याने मृत्यू झाला. याप्रकरणी तिला नशिली दारू पाजून तिच्या मृत्यूला कारणीभूत ठरल्याच्या आरोपाखाली कळंगुट पोलिसांनी रिझवान हुसेन (रा. कांदाळी व मूळ उत्तर प्रदेश) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

ही घटना दि. १९ ऑक्टोबर रोजी घडली असून पोलिसांनी दि. २० ऑक्टोबर रोजी गुन्हा नोंदवला आहे. याप्रकरणी युवतीच्या लहान भावाने पोलिसांत तक्रार दाखल केली आहे.

अहिल्यानगर येथील युवती संशयित आरोपीच्या मालकीच्या कळंगुटमधील एका सलूनमध्ये गेल्या तीन वर्षांपासून कामाला होती. जानेवारी २०२५ मध्ये तिने नोकरी सोडून पर्वरी येथे स्वत:चे सलून सुरू केले.

घटनेच्या दिवशी युवतीने दुपारी १.३० वा. तिच्या आईला फोन केला होता. मात्र नंतर अर्धातासाने तिचा मोबाईल बंद येऊ लागला. रात्री ९.३० वा. संशयित रिझवान हुसेन याने युवतीच्या आईला फोन करून तिची मुलगी आजारी असून तिला इस्पितळामध्ये दाखल केल्याचे सांगितले. नंतर १० मिनिटांनी त्याने पुन्हा फोन करून मुलीचा मृत्यू झाल्याचे सांगितले.

तत्पूर्वी रात्री ९ वाजण्याच्या सुमारास कळंगुट पोलिसांनी फिर्यादीला फोन करून त्याच्या बहिणीचा मृत्यू झाला असून मृतदेह गोमेकॉतील शवाघरात पाठवल्याचे सांगितले.

भावाने दिलेल्या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी युवतीला नशिली दारू पाजणे व तिच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याच्या आरोपाखाली भा.न्या.सं.च्या १२३ व १०६(१) कलमान्वये गुन्हा नोंद केला आहे. पुढील तपास कळंगुट पोलीस करीत आहेत.

लैंगिक अत्याचाराचा संशय

युवतीने स्वतःचे सलून सुरू केल्यापासून संशयित आरोपी, त्याची पत्नी आणि भाऊ यांनी तिला जातीवाचक शिवीगाळ करत सतत मानसिक त्रास दिला. तसेच आरोपी आपल्या बहिणीचा शारीरिक छळ देत होता. दारूमध्ये काहीतरी पदार्थ मिसळून तिला पिण्यास भाग पाडत असल्याचा आरोपही युवतीच्या भावाने केला आहे. शिवाय फिर्यादीने तक्रारीत लैंगिक अत्याचाराचा संशयही व्यक्त केला आहे.

हेही वाचा