रासई-लोटली येथील स्फोटात जखमी झालेल्या आणखी दोघांचा मृत्यू

मृतांची संख्या पाच : जहाज बांधणी प्रकल्पात बोट तयार करताना स्फोट

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
24th October, 11:43 pm
रासई-लोटली येथील स्फोटात जखमी झालेल्या आणखी दोघांचा मृत्यू

मडगाव : लोटली येथील जहाज बांधणी प्रकल्पात भीषण स्फोट होऊन आग लागली होती. यात तिघा कामगारांचा मृत्यू झाला होता. आता आणखी दोन कामगारांचा मृत्यू झाला आहे. अभिषेक कुमार (२५) व मनीष चव्हाण (२६) अशी मृतांची नावे आहेत.

रासई-लोटली येथील विजय मरीन जहाज बांधणी प्रकल्पात बोट तयार करण्याचे काम सुरू असताना शुक्रवारी सायंकाळी स्फोट झाला व आग लागली. यात सात कामगार जखमी झाले. त्यातील सेर अली (२१, पश्चिम बंगाल) व विनोद दिवाण (४२, छत्तीसगड) या दोघांचा जास्त भाजल्याने उपचारादरम्यान मृत्यू झाला होता. बंद टँकमध्ये सहा कामगार व एक कामगार टँकच्या बाहेर होता. मोहम्मद बाबूल (२५), संतोष कुमार (२५), मनीष चव्हाण (२६) आणि अभिषेक सिंग (२५ सर्व रा. अलिबाग, उत्तरप्रदेश) यांच्यावर गोमेकॉत उपचार सुरू होते. त्यातील संतोष कुमार या कामगारांचा मृत्यू झाला. मृतांची संख्या तीनवर पोहोचली होती. यानंतर मायणा- कुडतरी पोलिसांनी विजय मरीन वर्कशॉपचे सुरक्षा अधिकारी राजू बोरा (मूळ रा. आसाम) याला कामगारांना संरक्षणात्मक उपकरणे पुरवण्यात हलगर्जीपणा केला म्हणून अटक केली.दरम्यान, विजय मरीन शिपयार्डचे कामकाज बंद ठेवण्यात यावे असे आदेश दक्षिण गोवा जिल्हाधिकाऱ्यांनी काढलेले होते.

अजून दोघांची प्रकृती अस्थिर

गोमेकॉत उपचार सुरू असलेल्या आणखी दोन कामगारांचा मृत्यू झाला आहे. मनीष चव्हाण (२६) आणि अभिषेक सिंग (२५ दोघे रा. अलिबाग, उत्तरप्रदेश) अशी मृत कामगारांची नावे आहेत. मोहम्मद बाबुल व सुरेंद्र कुमार यांच्यावर गोमेकॉत उपचार सुरू आहेत. त्यांचीही प्रकृती स्थिर नसल्याचे पोलिसांनी सांगितले. 

हेही वाचा