‘फर्जी बीच’ रेस्टॉरंटला मोरजी पंचायतीकडून नोटीस

एका नावाने ट्रेड लायसन, तर दुसऱ्याच नावाने व्यवसाय

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
24th October, 11:51 pm
‘फर्जी बीच’ रेस्टॉरंटला मोरजी पंचायतीकडून नोटीस

पेडणे : मोरजी पंचायत क्षेत्रातील गावडेवाडा समुद्रकिनारी भागात मोरजी पंचायतीने २० मार्च २०२५ रोजी जुबिलंट हॉस्पिटलिटी सर्विसेस या नावाने बार आणि रेस्टॉरंट व्यवसायासाठी परवाना दिला होता. परंतु, त्या ठिकाणी ‘फर्जी बीच’ या वेगळ्या नावाने रेस्टॉरंट चालवत असल्याची माहिती पंचायतच्या निदर्शनास आली.

यामुळे मोरजी पंचायतीने संबंधित व्यवसायाला कारणे दाखवा नोटीस जारी केली आहे. नोटीसमध्ये सात दिवसांच्या आत कागदपत्रे सादर करून, दिलेला परवाना का रद्द केला जाऊ नये, याची माहिती देण्यास सांगण्यात आले आहे. अन्यथा परवाना रद्द केला जाऊ शकतो, असे नमूद केले आहे.

सरपंच विलास मोर्जे यांच्या म्हणण्यानुसार, ‘फर्जी बीच’ नाव वापरणे आक्षेपार्ह असून त्यामुळे संपूर्ण समाजाच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत. मोरजी पंचायत मंडळाच्या १६ ऑक्टोबर रोजी झालेल्या पाक्षिक बैठकीत या प्रकरणाची सविस्तर चर्चा झाली.

दरम्यान, मोरजी पंचायत क्षेत्रात अनेक ठिकाणी ‘फर्जी बीच’ असे फलक कोपऱ्या-कोपऱ्यात, विजेच्या पोलांवर दिसून येत आहेत. नागरिकांनी यावर प्रश्न उपस्थित केले.

मोरजी पंचायत क्षेत्रात अनेक गैरगोमंतकीय रेस्टॉरंट्स आणि रिसॉर्ट्स चालवत आहेत. या ठिकाणी समुद्राचे नाव देण्याऐवजी वेगवेगळी नावे देणे व्यावसायिक कारस्थान आहे, असे नागरिकांकडून म्हटले जात आहे. याशिवाय, या क्षेत्रात सायलेंट झोन असल्यामुळे रात्री १० नंतर संगीत कार्यक्रम आयोजित करण्यास परवानगी नाही. नागरिक उमा शेट्ये यांनी यावर प्रश्न उपस्थित करत “परवाना नसताना रात्री संगीताचे कार्यक्रम कसे आयोजित केले जातात?” असा सवाल उपस्थित केला आहे.

‘फर्जी’ शब्दाला आक्षेप

‘फर्जी’ या शब्दाचा अर्थ खोटा, नकली किंवा बनावटी असा होतो, त्यामुळे पंचायतने गंभीर दखल घेऊन जुबिलंट हॉस्पिटॅलिटी सर्विसेस या आस्थापनाला नोटीस पाठवली आहे. सामाजिक माध्यमांवर ‘फर्जी बीच’ च्या जाहिरातींमध्ये प्रायव्हेट बीच असल्याचा उल्लेख असून, संगीत रजनीचे आयोजन केले जात असल्याचेही दिसून आले आहे. 

हेही वाचा