
मडगाव: प्रत्येकाला मत व्यक्त करण्याचा अधिकार असतो. भारतीय जनता पक्षाची (भाजप) उमेदवार निवडीसाठी काही प्रक्रिया असते. त्यामुळे फोंडा पोटनिवडणुकीबाबत योग्य वेळी निर्णय होईल, असे भाजप प्रदेशाध्यक्ष दामू नाईक यांनी सांगितले.
मडगाव येथील रवींद्र भवन येथे एका कार्यक्रमासाठी आलेल्या भाजप प्रदेशाध्यक्ष दामू नाईक यांनी फोंडा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकी संदर्भात पक्षाकडून योग्य वेळी निर्णय घेण्यात येईल, असे स्पष्ट केले. प्रसारमाध्यमांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तर देताना नाईक यांनी सांगितले की, मडगाव रवींद्र भवनच्या कामासंदर्भात आपण भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष झाल्यापासून कोणताही हस्तक्षेप करत नाही. रवींद्र भवनचे निर्णय हे अध्यक्ष राजेंद्र तालक व समिती तसेच कला व संस्कृती खात्याकडून घेण्यात येतात. आपल्याकडे कोणी काही समस्या घेऊन आल्यास त्यावर चर्चा होते, असेही त्यांनी सांगितले.
रवींद्र भवन येथे स्थानिक कलाकारांना व कलेला प्रोत्साहन दिले जात आहे. त्याचप्रमाणे देशातील इतरही कला व संस्कृती यांची माहिती गोव्यातील नागरिकांना व कलाकारांना मिळावी यासाठीच राज्याबाहेरील विविध कलेचे प्रयोग या ठिकाणी होतात. कोणत्याही पाश्चात्त्य कलेला सादरीकरणासाठी व्यासपीठ देत नाही, तर भारतीय कलेला सादरीकरणासाठी संधी दिली जाते, असे नाईक म्हणाले.
राज्यातील कलाकारही गोव्याबाहेर जाऊन कलेचे सादरीकरण करतात. अनेक कलाकार बाहेर गेल्यानंतर त्यांच्या कलेच्या जोरावर मोठे झालेले आहेत. गोव्यातील कला प्रकारांसह राज्याबाहेरील चांगल्या कला पाहण्याची संधी मिळते, असेही नाईक म्हणाले.
फोंडा मतदारसंघातील पोटनिवडणुकीबाबत बोलताना नाईक म्हणाले की, रवी नाईक यांची शोकसभा झाल्यानंतर पक्ष योग्य वेळेवर योग्य निर्णय घेईल. भाजपच्या उमेदवार निवडीबाबतही एक प्रक्रिया असते. मत मांडण्याचा अधिकार सर्वांना आहे. त्यांना कोणीही रोखू शकत नाही. मात्र भारतीय जनता पक्षाची उमेदवार निवडीबाबतची एक प्रक्रिया आहे. त्यानुसार योग्य वेळी योग्य निर्णय घेण्यात येईल, असे स्पष्ट केले.
जिल्हा पंचायत निवडणुका १३ डिसेंबर रोजी जाहीर करण्यात आलेल्या आहेत. या संदर्भात पक्षाकडूनही मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्या अध्यक्षतेखाली प्रक्रिया सुरू आहे, असेही त्यांनी सांगितले. राज्य सरकार व पक्ष संघटना यांच्यात योग्य समन्वयातून कार्य सुरू आहे. कोणत्याही मतभेदाबाबत आपण काहीही ऐकले नाही किंवा तसे काहीच नाही, असे दामू नाईक यांनी सांगितले.