एनडीए घटक पक्ष असूनही गोव्यात भाजपशी युती नाही: श्रीवास्तव

पणजी: राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष (Nationalist Congress Party) हा फक्त महाराष्ट्रात आणि केंद्रीय पातळीवर एनडीएचा (NDA) घटक पक्ष आहे. गोव्यात भाजपशी आमची युती नसल्याने, राष्ट्रवादी अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली घड्याळाच्या काट्याच्या आधारावर निवडणुका लढवण्यास स्वतंत्र आहे. "आगामी जिल्हा पंचायत (Zilla Panchayat) आणि नगरपालिका (Muncipality) निवडणुकांसाठी आम्ही उमेदवार उभे करण्यासाठी प्रयत्न करू," असे राष्ट्रवादीचे राष्ट्रीय प्रवक्ते ब्रिजमोहन श्रीवास्तव यांनी सांगितले.
पणजी येथे पत्रकार परिषदेत श्रीवास्तव बोलत होते. राष्ट्रवादीचे युवा अध्यक्ष सनी म्हार्दोळकर आणि इतर नेते यावेळी उपस्थित होते.
गोव्यात सध्या राष्ट्रवादीची कोणतीही समिती नाही. त्यामुळे राज्य समित्या स्थापन करण्यासाठी गोव्यात आलो असल्याचे असे श्रीवास्तव यांनी सांगितले.
घड्याळाच्या काट्यावर चालणारा राष्ट्रवादी हा महाराष्ट्र आणि राष्ट्रीय पातळीवर एनडीचा घटक पक्ष आहे. परंतु गोव्यात आमचा भाजपशी कोणतीही युती नाही. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस राज्यात घड्याळाच्या आधारे आणि अजित पवारांच्या नेतृत्वाखाली निवडणुका लढण्यास मोकळी आहे, असे श्रीवास्तव यांनी स्पष्ट केले.
येत्या काही दिवसांत गोव्यात जिल्हा पंचायत आणि नगरपालिका निवडणुका होणार आहेत. या दोन्ही आगामी निवडणुकांमध्ये आम्ही योग्य उमेदवार उभे करण्याचा प्रयत्न करू. पणजी महानगरपालिका आणि १३ नगरपालिकांच्या निवडणुका लवकरच अधिसूचित केल्या जातील. त्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस निरीक्षक पाठवेल. "जर पक्ष पातळीवर निवडणूक लढवणे शक्य नसेल तर आम्ही स्वतंत्र उमेदवारांना पाठिंबा देऊ," असे श्रीवास्तव यांनी जाहीर केले.
राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये शरद पवार आणि अजित पवारांसारखा कोणताही गट नाही. भारतीय निवडणूक आयोगाने घड्याळाच्या चिन्हांना मान्यता दिली आहे आणि ही चिन्हे फक्त अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसची आहेत. इतर कोणीही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा वापर करू शकत नाही, असे श्रीवास्तव म्हणाले.
गोव्यात आमचे अध्यक्ष नाहीत, राज्य समिती नाही आणि त्यामुळे कोणतेही कार्यालय नाही. आम्ही असे नेतृत्व शोधत आहोत जे गोव्यात राष्ट्रवादीसाठी चांगले काम करेल. "आम्ही गोव्यातील मुद्द्यांसह आमचे नेतृत्व स्थापित करू जेणेकरून आमचे वास्तव्य गोव्यातील लोकांशी जुळेल," असे श्रीवास्तव म्हणाले.