ज्याप्रमाणे एक माय आपल्या लेकरासाठी रक्ताचे दूध करून पोषण करते, त्याचप्रमाणे गाय सुद्धा आपल्या रक्ताचे दूध करून पूर्ण जगाचे पोषण करते. म्हणून गाय हा एक प्राणी नसून तो आपल्या परिवारातील एक अविभाजित सदस्य आहे. म्हणून गायी-म्हशींचे महत्त्व अधोरेखित करणारा असा हा गोव्यात साजरा केला जाणारा पाडवा आणि नष्ट पाडवा.

दिवाळीचा सण म्हणजे जसा रोषणाईचा सण, तसेच गायी-म्हशींचा सुद्धा सण. त्यात गोवा, ज्याचे नावच गो म्हणजेच गोमातावरून ठरले तिथे प्राचीन काळापासून गायी पूजनाची प्रथा दिसून येते. गावोगावी असलेल्या गोठणी याचे प्रतीक आहे. लहानपणापासूनच दिवाळी म्हटले की गोव्यातील प्रत्येकाला पाडव्याची आठवण येते. कारण या दिवशी प्रत्येक घरातील प्रत्येक गोठ्यातील गुरा-वासरांची पूजा केली जाते. ही पूजा झाल्यावर पूर्वी त्यांच्या गळ्यात झेंडूची आणि तांदळाच्या वड्यांची माळ बांधली जायची. त्यानंतर गोठ्यातून गुरांना सोडले जायचे. गुरे गोठ्याबाहेर येताच त्यांच्या गळ्यातील वड्यांच्या माळेतून वडे काढण्यात जी गंमत होती ती काही औरच. अशी ही पाडव्याची गंमत, या सणामधून आपल्याला गायी-गुरांविषयीचे लोकमनामध्ये असलेले अमाप प्रेम दिसून येते.
ह्या गायीविषयी आपलं प्रेम व्यक्त करताना घरणीबाई देखील गाऊ लागते की धरित्रीचा जन्म झाल्यानंतर सगळ्यात अगोदर कोण प्राणी या भूतलावर रचला गेला असेल तर ती आहे आपली गोमाता. या गोमातेच्या प्रत्येक अवयवात घरणीबाईला देवरूप दिसते.
आधी रचिली धरतरी
मग रचिली गायतरी
गायवर्ण गायतरी
गायी तुजी नि शिंगा
जशी महादेवाची लिंगा गे
पंढरीत
गायवर्ण गायतरी
गायी तुजे नी डोळे
जशे मोगरेचे कळे
गे पंढरीत
गायवर्ण गायतरी
गायी तुजी गे फाट
जशी पंढरीची वाट
गायवर्ण गायतरी
गायी तुजी नि शेप
रुक्मिण घेई झोप
गे पंढरीत
गायवर्ण गायतरी
गायी तुजी नि गेळा
जशी पंढरीची बेला
गायीची शिंगे पाहून घरणीबाईला त्यामध्ये महादेवाचे, लिंगाचे दर्शन होते. गायीचे काळेभोर नाजूक डोळे पाहून तिला पांढऱ्याशुभ्र मोगरी कळ्यांची आठवण होते. गायीची लांब रुंद पाठ तिला आपल्या अतिप्रिय विठ्ठलाजवळ घेऊन जाणाऱ्या पंढरपूरच्या वाटेसारखी दिसते. गायीची लांब एकशिवडी शेपटी पाहून रुक्मिणी त्या शेपटीवर बसून ‘झोप’ म्हणजे झोका घेत असल्याचा तिला भास होतो. गायीचे पाय बघून आणि त्या पायांचे गेळे बघून पंढरीला जायची आपली वेळ जवळ आली अशी तळमळ ती व्यक्त करताना दिसते.
एकूण काय, तिच्या जीवनात देव, पंढरीचा पांडुरंग तिला गायीच्या प्रत्येक अवयवातून दिसू लागतो. कारण ती जशी पंढरीच्या पांडुरंगापुढे व्यक्त होते, तशीच गोठ्यातल्या गायीपुढेही व्यक्त होते. म्हणून गायीचे आणि घरधनीण बाईचे नाते अगदी जिवलग मैत्रिणींचे असते. तसेच गायीचे आणि कारभाऱ्याचे नाते म्हणजे बाप-लेकाचे. गोठ्यातील प्रत्येक बैल कारभाऱ्याला त्याच्या बापासारखा भासतो.
या गायीप्रती आपली भक्ती याच दिवाळीच्या पाडव्याला व्यक्त करताना घरणीबाई आणि तिचा कारभारी दिसतो. पाडव्याच्या दिवशी घरणीबाई तुळशी वृंदावनापुढे छानसा गोठा सजवते. शेणाच्या नाजूकशा भिंती घालून घरणीबाई गोठ्यातील वेगवेगळे भाग तयार करते. एका भागामध्ये लहानग्या गुरांना बांधते. एका भागात दुभत्या गाई बांधते. काही गवळणी तयार करते. त्यापैकी कोणीतरी दूध काढणाऱ्या, दही घुसळणाऱ्या असतात तर कोणी दूध तापवणाऱ्या असतात. या सगळ्या गाई म्हणजे कारटापासून तयार केलेली प्रतीकात्मक प्रतिमा आणि गवळणी म्हणजे शेणापासून तयार केलेल्या प्रतिमा. झेंडूच्या आणि वेगवेगळ्या स्थानिक फुलांनी सजवलेला गोठा आणि त्या गोठ्यापुढे उभा केलेला भुत्या. भुत्या म्हणजे राखणा. ह्या भुत्याच्या हातात एक दांडा. हा भुत्या संपूर्ण गोठ्याचा रक्षण करणारा रक्षक. असा गोठा तयार केल्यावर त्याला दुधा-भाताचा नैवेद्य दाखवायचा. संध्याकाळी हा गोठा मोडून त्याच्यापासून एक मोठाला प्रतिकात्मक भुत्या तयार करायचा. हा भुत्या तयार करताना घरणीबाई गाऊ लागते,
आरे आरे भुत्या खैरे गेलंय
गेलो गेलो शेजारणीगेर
शेजारणी बाई काय घेतय ता घे गे
माजो भुत्याक सोडून दि गे
तयार केलेला भुत्यालाही फुलांनी सजवले जाते. एक चांगला असा बांबूचा दांडा त्याच्या शेजारी ठेवला जातो. दुसऱ्या दिवशी त्याच शेणाची शेणी थापली जाते. याच गोठ्यामध्ये घरातील जाते आणून ठेवतात. रवी आणून ठेवला जातो, ज्याने दही घुसळतात. गुरांची सगळी दावी स्वच्छ धुतात. त्यात सगळ्यात वर, नवीन तयार केलेले दावे असते. संध्याकाळी गुरे गोठ्यात परतताना सगळ्यात अगोदर जे ढोर गोठ्यात येते त्याला नवीन दाव्याचा सन्मान मिळतो.
अशाप्रकारे घरणीबाई पाडवा साजरा करते आणि दुसऱ्या दिवशी कारभारी गोठणीवर ‘नष्ट पाडवा’ साजरा करतो. गोठण म्हणजे अशी जागा, जिथे दुपारच्या वेळी गुरे-वासरे नदीकाठी आराम करण्यासाठी बसतात. इथे गावातील प्रत्येक कारभारी आपापल्या गोठ्यातील दांडा घेऊन गोठणीवर जातो. तिथे मध्यभागी शेण ठेवून त्यावर झेंडूचे झाड लावतात. सभोवताली दांडे ठेवून एकत्र बांधतात. त्या दांड्याची पूजा करतात. म्हणजेच गोठण पूजा करतात. तिथेच गोठणीवर तीन दगडांची चूल करून दूधभात शिजवतात. शिजवलेला दूधभात नैवेद्य म्हणून गोठण पूजनासमोर ठेवला जातो. त्यानंतर उपस्थित सर्वांना हाच दूधभात महाप्रसाद म्हणून वाटला जातो. पूजा संपन्न झाल्यावर घरी येताना कारभारी एकेक दांडा आणि दूधभाताचा नैवेद्य घेऊन येतो. गोठ्यातील गुरा-वासरावर हा नैवेद्य शिंपडतो. हीच गुरा-वासरांसाठी वर्षभराची राखण.
अशाप्रकारे पाडवा आणि नष्ट पाडवा उत्साहात साजरा केल्यावर दिवाळीला स्वल्पविराम मिळतो आणि पूर्णविराम मात्र तुळशी विवाहानंतरच दिला जातो.
गुरे-वासरे आपल्या जीवनाचे अविभाज्य घटक आहेत. ज्याप्रमाणे एक माय आपल्या लेकराचे रक्ताचे दूध करून पोषण करते, त्याचप्रमाणे गाय सुद्धा आपल्या रक्ताचे दूध करून पूर्ण जगाचे पोषण करते. म्हणून गाय हा एक प्राणी नसून तो आपल्या परिवारातील एक अविभाजित सदस्य आहे. म्हणून गाई-म्हशींचे महत्व अधोरेखित करणारा असा हा गोव्यात साजरा केला जाणारा पाडवा आणि नष्ट पाडवा. आज कोणी एकेकाळी घराघराच्या शेजारी असलेले गोठे नष्ट झाले आहेत. तरीही पाडव्याच्या तुळशी वृंदावनातील गोठ्यावरून इथली गोवंशप्रिय संस्कृती आजही गोव्यातील प्रत्येक खेडोपाडी दिसून येते. हे प्रतीक आहे गोवेकरांचे गायीवर असलेले अमाप प्रेम. म्हणून घरणीबाई आपल्या ओव्यांमधून म्हणते,
तांदळाचो नी गे कुणो
कुणो उडवू नये साने गोटा
दनपाराच्या रे पारा
हे घे गायतरे बांधू नये जोता
एवढ्या पिर्थमीचो
हो गे सांभाळ केलो कोणी
गायीच्या पाडकानी
होगे जोताक दिलो खान
