हा दिवा केवळ तेलाचा नाही, हा दिवा माणुसकीचा प्रकाश आहे. समाजातील श्रीमंत आणि गरीब यांच्यातली दरी या एका क्षुल्लक दिव्याने मिटवून टाकली होती. बाहेर फटाके आकाश वाजत होते, पण त्या छोट्या झोपडीतला दिवा मात्र शांतपणे सांगत होता “खरी दिवाळी तीच, जी दुसऱ्याच्या अंधाराला उजेड देते.”

गावाचं नाव होतं चांदवाडी. लहानसं पण रंगांनी, नात्यांनी आणि परंपरांनी नटलेलं. वर्षभर शांत असणारं हे गाव दिवाळी आली की उजेडाने उजळून निघायचं. प्रत्येक घरात कंदिलांची झगमग, अंगणात रांगोळ्यांचे नाजूक रंग, घराघरांतून दरवळणारा फराळाचा सुगंध आणि आकाशात फुटणारे फटाके. सगळं गाव जणू एका स्वप्नात जगत होतं पण त्या झगमगाटाच्या टोकावर, शेवटच्या वाटेवर असलेली ती मातीची झोपडी मात्र काळोखात बुडालेली होती.
त्या झोपडीत राहायची चंपा. दहा वर्षांची, पण जीवनाने तिला वेळेआधीच मोठं बनवलं होतं. तिचे आई-वडील काही वर्षांपूर्वी आजाराने गेले होते. आता ती आणि तिचा सात वर्षांचा भाऊ गण्या एवढंच तिचं विश्व होतं. लहान वयातच तिने आयुष्याचे ओझे अंगावर घेतले होते. सकाळी सूर्य उगवायच्या आधी ती घराबाहेर पडायची. कुणाच्या अंगणात झाडणं, कुणाच्या घरात रांगोळी, कुणाच्या देव्हाऱ्यात फुलं सजवणं, कुणाच्या दरवाज्यावर दिवे लावणं. तिच्या हातात जणू एक जादू होती, ती जिथे स्पर्श करे तिथे सौंदर्य फुलून जाई.
त्या दिवशी दिवाळीचा मुख्य दिवस होता, लक्ष्मीपूजनाची रात्र. गावात उत्साह ओसंडून वाहत होता. प्रत्येक घरात स्त्रियांचे हसरे आवाज, मुलांच्या हशा, फराळाचा सुवास आणि देवघरात उजळलेले शेकडो दिवे. चंपा दिवसभर काम करत होती. हातात तेलाचा वास, पायात थकवा, पण चेहऱ्यावर समाधान. कारण इतरांच्या घरात उजेड पेटवण्यातही तिला आनंद वाटत होता. लोकांच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहण्यातच तिला आपली दिवाळी सापडत होती. संध्याकाळी ती शेवटचं काम आटपून परतली. तिच्या झोपडीत मात्र काळोखाचा पसरलेला पसारा होता. दारासमोर ना कंदील, ना रांगोळी. फक्त मंद चांदणं भिंतीवर पडलेलं.
गण्याने निरागसतेने विचारलं, “ताई, आपल्याकडे दिवा नाही का पेटवायचा?” चंपा थकलेल्या पण प्रेमळ आवाजात म्हणाली, “तेल संपलं रे बाळा... पण काही हरकत नाही. बघ ना, चंद्र आपल्यासाठीच तर उजळलाय.” तिच्या ओठांवर हलकं हसू, पण डोळ्यांत दडलेली वेदना होती. दिव्याचं तेल विकत घेण्यापेक्षा गण्याच्या पोटाची भूक भागवणं तिला जास्त महत्त्वाचं वाटत होतं. पोटात भुकेचा अग्नी असताना, बाहेरचा दिवा पेटवण्याची हौस ती कशी करू शकणार?
गण्या तिच्या मांडीवर डोकं ठेवून झोपला. बाहेर फटाक्यांचा गडगडाट आणि आत शांत अंधार. चंपा छपरातून येणाऱ्या प्रकाशाच्या रेघांकडे पाहत होती, तेवढ्यात टकटक दारावर कोणीतरी वाजवलं. ती दचकली. इतक्या रात्री कोण असावं? हळूच दार उघडलं तर समोर उभी होती सानिका देशमुख काकांची लहान मुलगी. तिच्या हातात छोटं ताट आणि एक तेलाचा दिवा. मागे देशमुख बाई
स्वतः उभ्या.
“चंपा,” देशमुख बाई मृदू आवाजात म्हणाल्या, “आज तू आमच्या घरात इतका सुंदर उजेड केलास की आम्ही ठरवलं, त्या उजेडाचा एक किरण तुझ्याही घरात यायला हवा.” सानिकाने ताट पुढे केलं. त्यात मिठाई, फुलं आणि तो छोटासा दिवा होता. क्षणभर चंपा नि:शब्द उभी राहिली. डोळ्यातील हा ओलावा कशाचा आहे, आनंदाचा की कृतज्ञतेचा, हेच तिला कळेना! झगमगाटात हरवून न जाता, कोणीतरी आपली आठवण ठेवली या जाणिवेने तिचं हृदय भरून आलं. तिने सानिकाकडे पाहिलं. त्या दिव्याच्या उजेडात सानिकाचं हसू देवदूतासारखं वाटत होतं. तिच्या डोळ्यांत अश्रू जमा झाले, पण ओठांवर प्रकाशासारखं हसू उमटलं.
तिने दिवा घेतला, काळजीपूर्वक पेटवला. तेलाचा सुगंध दरवळला आणि मातीच्या भिंती अचानक उजळून गेल्या. गण्या जागा झाला आणि हसत म्हणाला, “ताई, आपल्याकडेही दिवा पेटला!” त्या क्षणी चंपाला जाणवलं; हा दिवा केवळ तेलाचा नाही, हा दिवा माणुसकीचा प्रकाश आहे. समाजातील श्रीमंत आणि गरीब यांच्यातली दरी या एका क्षुल्लक दिव्याने मिटवून टाकली होती. बाहेर फटाके आकाश वाजत होते, पण त्या छोट्या झोपडीतला दिवा मात्र शांतपणे सांगत होता “खरी दिवाळी तीच, जी दुसऱ्याच्या अंधाराला उजेड देते.”

- पल्लवी घाडी