
गोविंद आणि त्याची छोटी बहीण चिऊ, दोघंही खूप उत्साही होते. कारण काय? दिवाळी! घरात पणत्या, आकाशकंदील, फराळाचा खमंग वास आणि नवीन कपड्यांची घडी... सगळं काही चमचमीत होतं. पण या सगळ्यापेक्षा गोविंदला जास्त आवडायचे ते फटाके.
“यावर्षी मी १०० रुपयांचे सुतळी बॉम्ब घेणार!” गोविंद डौलात म्हणाला. चिऊ म्हणाली, “आणि मी फुलबाजे! मला ती हिरवी-लाल फुलं खूप आवडतात.” त्यांच्या घराच्या खिडकीजवळ एक चिमणीचं घरटं होतं. चिऊ रोज त्यांना दाणे टाकायची. आज चिमणी आणि तिची दोन पिलं शांतपणे बसली होती. आईने दोघांना समजावलं, “पाहिलंत, चिमण्या किती शांत आहेत. फटाक्यांमुळे त्यांना त्रास होतो. त्यांना खूप भीती वाटते. शिवाय, आपल्या शेजारचे आजोबा खूप आजारी आहेत, त्यांना फटाक्यांचा आवाज सहन होत नाही.” गोविंदला आईचं बोलणं ऐकून थोडं वाईट वाटलं, पण फटाक्यांचा मोह काही त्याला सोडवत नव्हता. “पण दिवाळी म्हणजे फटाके, आई! खूप मजा येते!”
दिवाळीचा दिवस उजाडला. संध्याकाळ झाली आणि आजूबाजूला 'धूम धडाका' सुरू झाला. गोविंदने त्याचे सुतळी बॉम्ब काढले. पहिला बॉम्ब त्याने दारात टाकला. धूम! मोठा आवाज झाला. त्या आवाजाने चिमणी घाबरून घरट्यातून उडून गेली. तिची पिलं थरथर कापू लागली. शेजारच्या आजोबांच्या घरातून खोकल्याचा मोठा आवाज आला. गोविंदला क्षणभर वाईट वाटलं, पण आता तो दुसऱ्या बॉम्बची वात पेटवणार होता, तेवढ्यात चिऊ धावत आली.
“दादा, थांब ना! बघ ना, चिमणी कशी घाबरून उडून गेली,” चिऊ रडवेली झाली. तिने चिमणीच्या पिल्लांकडे बोट दाखवले. गोविंदने पाहिले. ती छोटी पिलं एकमेकांना अगदी घट्ट बिलगली होती. त्यांचे छोटे डोळे मोठे झाले होते, जणू ते म्हणत होते, 'थांबव हा आवाज!' गोविंदने बॉम्ब खाली ठेवला. त्याला आपली चूक जाणवली. त्याने पाहिले, आकाशात धुराचे लोट जमा झाले होते. हवेत एक विचित्र वास पसरला होता. डोळे चुरचुरत होते.
त्याला आठवले, बाबा नेहमी म्हणायचे, “फटाक्यांचा धूर आपल्या श्वासातून आत जातो. त्यामुळे आपल्याला दम लागतो, खोकला येतो.” गोविंदने सगळे बॉम्ब आणि लवंगी फटाक्यांचे पॅकेट घेतले आणि आईकडे गेला. “आई, मला आता हे नाही फोडायचे. चिमण्यांना आणि आजोबांना त्रास होतोय आणि हा धूर... मला नाही आवडत.” आईने त्याला जवळ घेतले. “शाब्बास माझ्या शहाण्या मुला! तू खूप मोठा विचार केलास.” गोविंदने मग चिऊला सोबत घेतले. दोघांनी मिळून छान रांगोळी काढली. आईने त्यांना छान छान घरीच रंगवलेल्या पणत्यांचे ताट दिले.
गोविंदने पणत्यांचे ताट अंगणात नेले आणि पूर्ण अंगणात छान मंद तेवणाऱ्या पणत्या सजवल्या. चिऊनेही त्याला मदत केली आणि सर्व पणत्या लावून झाल्यावर चिऊने आनंदाने टाळ्या वाजवल्या. त्यांनी आकाशकंदिलाच्या प्रकाशात बसून फराळ खाल्ला. चिमणी तिच्या घरट्यात परतली होती. आजोबांच्या घरातून आता शांत संगीत ऐकू येत होतं. गोविंदला जाणवलं, फटाक्यांच्या आवाजापेक्षा पणत्यांचा शांत प्रकाश, फराळाचा गोडवा आणि चिमणीची सुरक्षितता यातच खरी दिवाळी आहे. त्याने ठरवले, पुढच्या वर्षी तो एकही आवाज
करणारा फटाका घेणार नाही! कारण शांत आणि स्वच्छ दिवाळीच खरी 'आनंदी दिवाळी' असते!

- स्नेहा सुतार