कातयो

मुलीच्या गळ्यात एकदा का सौभाग्य अलंकार पडले, की तिने फक्त स्वतःच्या संसाराला जोडून घ्यायचे असते. तिचा नवरा, मुले, सासु-सासरे, नणंद-दिर, गोठ्यातील जनावरे, शेतीभाती… हेच तिचं विश्व. मग ती वयाने लहान असो, अथवा मोठी. तिला संसारासाठी राबावेच लागते. या गीतातून तोच भाव व्यक्त झालेला आहे.

Story: लोकगंध |
4 hours ago
कातयो

नितळ गंगेचा शीतळ पाणी गे 

जानुले गाईचे हाडीला शेण गे 

सखिया वकीया ने धरतरी सारयली

 त्यावर घातली पिठा रांगोळी 

त्यावर थेयलो चंदन पाट 

त्यावर  थेयली पानाची शिरोती 

तेजेर घातिली साळी दाळी 

तेजेर पूजिला तांब्याचा कळस

 भूतर दवरल्यो सात कातियो 

कातयो कातयो कातीवड्यो

आज कोण येता रातीवड्यो

आज येत उद्या येत

भिवा घोड्यावयल्यानं चालींनात

तेजो घोडो सोनियाचो

भांग भरलो देविताचो मोतीयाचो


गोव्याचे माथेरान अशी प्रतिमा ज्या गावाची आहे, तो गाव म्हणजे सत्तरी तालुक्यातील सूर्ला गाव. कार्तिक महिन्यात याच गावात फार फार पूर्वी ‘गितीगायन’ केले जायचे. रात्रीचा स्वयंपाक करून सर्व कामे आटोपून वाड्यावाड्यावरील महिला एखादीच्या घराच्या अंगणात बसायच्या. हिवाळ्याचे दिवस, वर आकाश निरभ्र, चांदण्यांची लुकलुक. खाली घरात पणत्यांची आरास आणि सोबत समूहाने म्हटली जात असलेल्या गीतांची! मध्यरात्रीपर्यंत हे गायन चालायचे. मनोरंजनाची कोणतीच साधने नसताना या महिलांनी स्वतःच्या अभिव्यक्तीला वाट मोकळी करून देत बदलत्या ऋतूला, खाद्यसंस्कृतीला, त्याच्याशी निगडित असलेल्या रुढी परंपरांना त्यांनी गीतातून अजरामर केले. 

या गावात पूर्वापार चालत आलेली ‘कातयो’ची परंपरा अशीच आगळी वेगळी. गोव्याच्या धारबांदोडा आणि फोंडा शिरोडा येथे तुळशी विवाहादरम्यान होणारा कातयोचा उत्सव यांच्यात मोठा फरक आढळतो. सूर्ला गावातील कातयो कार्तिक पुनवेच्या तिसऱ्या दिवशी होतो. इथे या गावात नवीन लग्न झालेली जोडपी या उत्सवाचे खास आकर्षण असते. सामूहिकतेने गायिलेल्या गीतातून कातयो उत्सवाचे वर्णन करीत करीत गीत पुढे पुढे प्रवाहित होते. या गीतात नवीन लग्न झालेल्या वधू-वरांची नावे गुंफून गीत वाढवले जाते. नवऱ्या मुलाचा सोन्याचा घोडा, तो रुबाबात त्या घोड्यावर बसून येतो, वधूचा भांग मोत्यांनी भरलेला असतो.

बारक्या कापडार एक मीरी

मिरयेर मीरी खवटली

थोरांगेली बाळ वावूरली

थोरागेरचो थोर गे अहंकार

दिवो भरता गोरयेचो

पायात चिरमुले

देविता व्हानानी खेळे

व्हानानी खेळतले तुजो

बाळ गे रडेता

रडला जाल्यार रडानी

माजो खेळ गे मोडेता..

लहान वयात लग्न करून सासरी आलेली एखादी मुलगी. संसार म्हणजे काय असतो, हे ही तिला माहीत नसावे. अशीच निराग, अवखळ पोर असावी. ती खेळत असावी. तिला कोठे माहिती असणार की काही रीतिरिवाज आहेत! नवरा बायकोने एकत्रित संसार करण्यासाठीची ती सुरुवात असू शकते. म्हणून तिला बोलवत आहेत. ती बालसुलभ निरागसपणे सांगते, माझा खेळ चालू आहे आणि मी तो अर्धवट टाकून येणार नाही. आणखीही हे गीत पुढे वाढत जाते. गीताच्या सोबतीने विधी करण्यासाठीची लगबग सुरू असते. गावातील नवीन लग्न झालेली जोडपी एव्हाना जमलेली असतात. नवरीला तुळशीसमोर बसवून तिच्यावर चादर ओढली जाते. तिच्या भोवताली ओळ धरली जाते.

काशाच्या वाडग्यात जेवण ठेवलेले असते. नवरीचा भावोजी तिच्यावर तीन मुटके मारतो आणि तेथील जेवणाचा वाडगा घेऊन जातो. तीही घरात जाते पण त्यापूर्वी तिथे पेटवून ठेवलेल्या वाती म्हणजेच कातयो घराच्या छपरावर उधळते. विधी चालू असताना तेथे जमलेल्या महिला कातयो गीत गात असतात. भावा-बहिणीची नावे गुंफून गीत प्रवाहित होत राहते.

शेता मेरेर हाय करंज्या

मोडा टाळ्या बांधा भरिया

दूर दिली अंजया भयन

हाडूक जा गा उमेशा बंधू

हाडुक गेल्या नये गे सये

दिल्ली अन्ना दुडती पायीं

आटे घोसाळे,माटे घोसाळे

आळंबे टाळये लागलो रे

चढ चढ रे रमेशा बंधवा

पाड पाड रे नाणो, चुनो, घोसाळे रे

कुडाय कुडाय अंजनी भयनी

म्हाराचे रवळी गे,

रान रान गे देवकी घरनी

तेला तुपा सांबारान

वाढ वाढ गे लक्ष्मी घरनी

दिरा बाया भरतारा गे…

गीतातील प्रत्येक शब्द अर्थपूर्ण असेलच याची खात्री देता येत नाही, मात्र त्यामागच्या भावनेतून त्या काळातील लग्न परंपरेचे वेगळेपण लक्षात येते. मुलीच्या गळ्यात एकदा का सौभाग्य अलंकार पडले, की तिने फक्त स्वतःच्या संसाराला जोडून घ्यायचे असते. तिचा नवरा, मुले, सासु-सासरे, नणंद-दिर, गोठ्यातील जनावरे, शेतीभाती… हेच तिचं विश्व. मग ती वयाने लहान असो, अथवा मोठी. तिला संसारासाठी राबावेच लागते. या गीतातून तोच भाव व्यक्त झालेला आहे. करंज्या नावाची भाजी रांधून ती नवऱ्याला, दिराला वाढायची. ती कशी करायची हेही धडे तिला या गीतातून दिले जात आहेत. कातयो म्हणजे आकाशातील नक्षत्रे. लग्न झाल्यावर सुनेने घर कसे सांभाळावे? याचाही अलिखित पाठ या परंपरेतून नववधूला प्रतीकात्मकतेने देण्यात येत आहे.

आधी आसलय तू चांदाची

आता जालय नवऱ्याची 

...अशी तिला जाणीव करून दिली जाते. कातयो संपविताना.

बाळाची येडणा चिखलान भरली गे

ये बाळे खेळा या गे, ये बाळे खेळा या गे,

आमच्यान नजो बाये कांगोली तोडाया गे

यात दागिन्यांची नावे गुंफून गीत वाढवले जाते आणि मग शेवटी.

भुरग्यांनी हाडली शिरपुटी

झिलग्यांनी हाडले बुडकुल्यो

बायलानी केले खुतकुले.

नैतिक मूल्यांची शिकवण नवीन पिढीला देण्याची पद्धती लोकपरंपरेत होती. संसार करायचा तर मग घरच्या लक्ष्मीने कसे वागायचे याचे नीतिनियम त्यात होते. अर्थात ही सारी बंधने स्त्रियांसाठीच होती. खस्ता खायच्या, कष्ट करायचे आणि वरून सगळ्यांकडून ऐकूनही घायचे. ते सुद्धा मुखातून एकही शब्द न काढता हे खूप काठीण काम लोकपरंपरेतील स्त्रियांनी आजन्म स्वीकारले. फक्त स्वीकारले नाही तर अनुभवातून आलेल्या कणखर, लवचिकतेतून स्वतःला सिद्ध केलं. मातीत पाय घट्ट रोवून ती उभी राहिली. कायम गुणगुणत राहिल्या. याच त्यांच्या सकारात्मक वृत्तीमुळे त्यांनी जगण्याचे चांदणे केले.


- पौर्णिमा केरकर

(लेखिका लोकसाहित्याच्या अभ्यासक, 

कवयित्री आणि शिक्षिका आहेत.)