तंदुरी चिकन

Story: चमचमीत रविवार |
12 hours ago
तंदुरी चिकन

तंदूरी चिकन! नुसतं नाव जरी ऐकलं तरी मांसाहार प्रेमींच्या तोंडाला पाणी सुटल्याशिवाय राहत नाही. बाहेरून हलकासा क्रिस्पी, आतून एकदम रसाळ आणि मसालेदार... आहाहा! तंदूरी चिकनचा तो खास स्मोकी, भाजलेला स्वाद म्हणजे स्वर्गसुख! हा अप्रतिम पदार्थ खाण्यासाठी वारंवार हॉटेल किंवा रेस्टॉरंटमध्ये जावं लागतं. पण, आता नाही! आज मी तुमच्यासाठी घेऊन आले आहे, अगदी हॉटेलमध्ये मिळतो तसा अस्सल, चविष्ट तंदूरी चिकनचा स्वाद घरच्या घरी बनवण्याची सोपी आणि अचूक रेसिपी!

लागणारे साहित्य (४ लोकांसाठी)

चिकन – १/२ किलो (मध्यम आकाराचे तुकडे, शक्यतो हाडांसकट घ्यावेत.)

दही – १/२ कप (घट्ट आणि ताजे दही वापरा)

आलं-लसूण पेस्ट – २ टीस्पून

लिंबू रस – १ टेबलस्पून

लाल तिखट (तिखटपणासाठी) – २ टीस्पून

काश्मीरी लाल तिखट (उत्तम रंगासाठी) – १ टीस्पून

हळद – १/२ टीस्पून

मीठ – चवीनुसार

गरम मसाला – १ टीस्पून

जिरे पावडर (पूड) – १/२ टीस्पून

धणे पावडर (पूड) – १ टीस्पून

कसुरी मेथी – १/२ टीस्पून (हातावर चोळून घालावी)

मोहरीचे तेल – २ टेबलस्पून (तंदूरीचा खास स्वाद हवा असल्यास वापरा, नसल्यास साधे तेल वापरावे)

लोणी – २ टेबलस्पून (चिकन भाजून झाल्यावर त्यावर लावण्यासाठी)

👨🏻‍🍳 कृती – सविस्तर स्टेप्स

चिकन कापून धुवा. चिकनचे तुकडे धुवून पुसून कोरडे करा. प्रत्येक तुकड्यावर चिरा (slits) मारा जेणेकरून मसाला आत शिरेल. एका बाऊलमध्ये लिंबूरस, मीठ आणि टीस्पून लाल तिखट घाला. हे मिश्रण चिकनवर चोळून १५ मिनिटं बाजूला ठेवा. आता दुसऱ्या बाऊलमध्ये दही, आलं-लसूण पेस्ट, उरलेले मसाले (धणे, जिरे, हळद, गरम मसाला, लाल तिखट, काश्मीरी तिखट, कासुरी मेथी) आणि मोहरीचे तेल एकत्र करून जाडसर पेस्ट तयार करा. ही पेस्ट चिकनवर नीट चोळा आणि किमान ४ तास (रात्रीभर ठेवलं तर बेस्ट) फ्रीजमध्ये मॅरिनेट होऊ द्या.

चिकन भाजणं

• तंदूर/ओव्हन पद्धत: २००.C वर २५-३० मिनिटं भाजा. मध्येच उलटा-पालटा करा आणि लोणी लावा.

• गॅस/तवा पद्धत: जाडसर तव्यावर किंवा ग्रिल पॅनवर झाकून मध्यम आचेवर भाजा. धुरकट चव यावी म्हणून शेवटी कोळशाचा धूर द्या.

शेवटी भाजून झाल्यावर गरमागरम चिकनवर लोणी ब्रश करा.

तंदूरी चिकन हिरव्या पुदिना-कोथिंबीर चटणीसोबत, कांद्याच्या चकत्या आणि लिंबूसह सर्व्ह करा. 

खास टिप्स

• मॅरिनेशन जितकं जास्त तितकी चव जबरदस्त!

• मोहरीचं तेल असेल तरच खरा हॉटेलसारखा फ्लेवर येतो.

 • भाजून झाल्यावर लगेच सर्व्ह केलं तर चिकन रसाळ लागतं.



- शिल्पा रामचंद्र