सब-रजिस्ट्रारसाठी भूमी कायदे आणि इतर अभ्यास

गोव्यातील भूमीसंबंधीचे कायदे पूर्णपणे वेगळे आहेत. सब-रजिस्ट्रार पदासाठी जी प्रवेश परीक्षा घेतली जाते, त्यात जमीनविषयक कायद्यांवर प्रश्न विचारले जातात व त्याची योग्य ती उत्तरे देणे अपेक्षित असते.

Story: यशस्वी भव: |
12 hours ago
सब-रजिस्ट्रारसाठी भूमी कायदे आणि इतर अभ्यास

गोवा लोकसेवा आयोगातर्फे (GPSC) नुकतीच सब-रजिस्ट्रार पदासाठी परीक्षा होऊन गेली. सब-रजिस्ट्रार हा असा राजपत्रित अधिकारी (Gazetted Officer) असतो, जो सरकारला महसूल मिळवून देत असतो. कोणत्याही जमीन विक्रीच्या व्यवहारामध्ये सरकारला चांगला घसघशीत कर (Tax) मिळतो. साधारणपणे ६% अचल संपत्तीच्या भावाच्या प्रमाणात 'सारा' कर (Tax) गोळा होतो. गोव्यात ३% किमतीचा मुद्रांक कागद (Stamp Paper) आणि ३% नोंदणी शुल्क (Registration Charges) भरावे लागते. सब-रजिस्ट्रार कार्यालयात उमेदवाराने जाऊन, तिथे काय काय काम, कसे कसे चालते ते जाणून घेतले पाहिजे.

भारताच्या प्रत्येक राज्याच्या भूमीवर वेगवेगळे जमीन कायदे आहेत, ज्यांना 'भूमी कायदे' (Land Laws) असे म्हणतात. गोव्यातील भूमीसंबंधीचे कायदे पूर्णपणे वेगळे आहेत. सब-रजिस्ट्रार पदासाठी जी प्रवेश परीक्षा घेतली जाते, त्यात जमीन विषयक कायद्यांवर प्रश्न विचारले जातात व त्याची योग्य ती उत्तरे देणे अपेक्षित असते. परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर जी प्रत्यक्ष मुलाखत (Interview) घेतली जाते, त्या उमेदवाराला भारतीय दंड संहिता (IPC), फौजदारी प्रक्रिया संहिता (CRPC), दिवाणी प्रक्रिया संहिता (CPC) आणि भूमी कायदे (Land Laws) हे विषय माहिती असणे गरजेचे आहे. तसेच गट विकास अधिकारी (BDO), मामलेदार परीक्षांनाही कायदा या विषयावरील प्रश्न असतात. त्यामुळे कायद्याचे पदवीधरच फक्त या परीक्षांना बसू शकतात.

भूमी कायद्यांमध्ये (Land Laws) जमीन कमाल मर्यादा (Land Ceiling), विभाग (Zones), कोमुनिदाद (Comunidade), जिल्हाधिकारी यांचे अधिकार, कर्तव्य, विभाजन (Partition), फेरफार (Mutation), इन्वेंटरी (Inventory) असे विषय नीट अभ्यासून घ्यावेत. देणगी पत्र (Gift Deed), विक्रीपत्र (Sale Deed), शुद्धीकरण पत्र (Rectification Deed), हस्तांतरण पत्र (Deed of Assignment), नोंदणीकृत मृत्यूपत्र (Registered Will), मालमत्तेचा सर्वसाधारण समूह (General Communion of Asset), विवाह नोंदणी (Marriage Registration) या बाबतीत सर्व कायदे उमेदवाराला माहिती असावेत. GPSC परीक्षेची तयारी यासाठी अगदी नियोजनबद्ध असावी. खूपदा विद्यार्थी अशा पदांच्या परीक्षांना बसतात, परंतु त्यांनी त्या त्या विभागाच्या कार्यपद्धतीचा अभ्यास केलेला नसतो. त्यामुळे त्यांना गुण मिळत नाहीत.

वरील उल्लेख केलेल्या कामाव्यतिरिक्तसुद्धा अनेक कामे सब-रजिस्ट्रार करत असतो. लग्नाची नोंदणीसुद्धा येथेच करतात. प्रत्येक सब-रजिस्ट्रार कार्यालयामध्ये एक निळा फलक (Blue Board) लावलेला असतो. त्यावर कार्यालयात होणाऱ्या प्रत्येक कामाचा संपूर्ण तपशील लिहिलेला असतो. तो वाचून काढावा अथवा त्याचा फोटो काढून घ्यावा. मुलाखतीमध्ये या विषयावर प्रश्न विचारले जाऊ शकतात. त्यांच्यामध्ये मुख्य म्हणजे मुद्रांक शुल्क (Stamp Duty) किती व नोंदणी शुल्क (Registration Charges) शासन किती घेते हे लिहिलेले असते. याची माहिती असणे आवश्यक आहे.

वरच्यावर या परीक्षा होत असतात. त्या विभागामध्येदेखील कर्मचारी काही प्रमाणात याच अभ्यासावर निवडले जातात. कर्मचारी निवड आयोगातर्फे (Staff Selection Commission) गट 'क' (Group C) आणि गट 'ड' (Group D) साठी कर्मचारी नेमले जातात. या विभागात कनिष्ठ कर्मचारी या परीक्षांमधून निवडले जातात. यात सामान्य बुद्धिमत्ता (General Intelligence), योग्यता चाचणी (Aptitude), इंग्रजी, संख्यात्मक क्षमता (Numerical), तर्कशक्ती (Reasoning) व मुख्य विषयासाठी (Core Subject) कायद्याचे विषय असतात. अभ्यासक्रम नीट समजून घ्यावा व नीट नियोजन करून पुढील वर्षात होणाऱ्या या परीक्षेसाठी सज्ज व्हावे.

ही परीक्षा संगणक-आधारित चाचणी (CBRT - Computer Based Recruitment Test) पद्धतीने घेतली जाते. या परीक्षेला प्राथमिक तपासणी परीक्षा (Pre-Screening) नसते. थेट तपासणी परीक्षा (Screening) असते. वयाच्या ४० पर्यंत ही परीक्षा देता येते. या परीक्षेसाठी १५ वर्षांचे गोव्यातील वास्तव्य असणे गरजेचे आहे. कोकणी बोलणे अनिवार्य आहे. इंग्रजी आली पाहिजे आणि मराठी कळाली पाहिजे पण अनिवार्य नाही.


- अॅड. शैलेश कुलकर्णी

कुर्टी - फोंडा

(लेखक नामांकित वकील आणि 

करिअर समुपदेशक आहेत.)