संशयिताला अटक; इंदूर येथील घटना

इंदूर: भारतात सुरू असलेल्या आयसीसी महिला विश्वचषक २०२५ (ICC Women’s World Cup 2025) स्पर्धेदरम्यान एक धक्कादायक घटना समोर आली आहे. गुरुवारी सकाळी इंदूर येथे हॉटेलमधून एका कॅफेच्या दिशेने पायी जात असलेल्या ऑस्ट्रेलिया महिला क्रिकेट संघाच्या दोन खेळाडूंची छेडछाड (Molestation) झाल्याचा आरोप आहे. या घटनेमुळे भारतात आयोजित आंतरराष्ट्रीय स्पर्धेच्या सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

तातडीने 'एसओएस अलर्ट'; आरोपीला अटक
अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, छेडछाडीची घटना घडताच खेळाडूंनी त्वरित 'एसओएस अलर्ट' (SOS alert) दिला. सुरक्षा अधिकारी तातडीने घटनास्थळी पोहोचले. त्यानंतर त्याच दिवशी सायंकाळी संघाचे सुरक्षा व्यवस्थापक डॅनी सिमन्स यांनी एमआयजी पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली. तक्रारीनंतर पोलिसांनी तात्काळ 'एफआयआर' (FIR) दाखल केला आणि अकील खान नावाच्या संशयिताला अटक केली आहे, जो घटनेच्या वेळी मोटारसायकल चालवत होता. ऑस्ट्रेलियन संघ सध्या इंदूर येथील रॅडिसन ब्लू हॉटेलमध्ये थांबलेला आहे.
नेमकी घटना काय?
उपनिरीक्षक निधी रघुवंशी यांनी सांगितले की, दोन्ही क्रिकेटपटू कॅफेच्या दिशेने जात असताना आरोपी दुचाकीवरून त्यांचा पाठलाग करू लागला. आरोपीने एका खेळाडूला अयोग्यरित्या स्पर्श करून छेडछाड केली आणि नंतर तो घटनास्थळावरून पळून गेला.

रघुवंशी पुढे म्हणाल्या, "जवळ उभ्या असलेल्या एका नागरिकाने आरोपीच्या दुचाकीचा नंबर नोंदवून घेतला, ज्यामुळे आम्हाला आरोपीला शोधण्यास मदत झाली. अटक करण्यात आलेला आरोपी खान याच्यावर यापूर्वीही गुन्हेगारी स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत."
![]()
सहाय्यक पोलीस आयुक्त (ACP) हिमानी मिश्रा यांनी हॉटेलमध्ये जाऊन खेळाडूंची भेट घेतली आणि त्यांचे जबाब नोंदवले. 'भारतीय न्याय संहिता' (BNS) च्या कलम ७४ आणि कलम ७८ (पाठलाग करणे) अंतर्गत 'एफआयआर' दाखल करण्यात आल्याची माहिती मिश्रा यांनी दिली. स्थानिक प्रशासनाने केलेल्या या तात्काळ कारवाईची ऑस्ट्रेलियन संघ व्यवस्थापनाने आणि 'आयसीसी'च्या सुरक्षा अधिकाऱ्यांनी दखल घेतली आहे. पुढील तपास सुरू आहे.
![]()