तळवडे येथे दुचाकीची एसटी बसला धडक; सर्वत्र हळहळ
कणकवली : कणकवली (Kankavli) लग्नाची पत्रिका मामाच्या घरी देऊन परतणारी युवती अपघातात (Accident) ठार झाली. लग्न (marriage) होण्यापूर्वीच या युवतीचे निधन झाल्याने सर्वत्र हळहळ करण्यात येत आहे. तळवडे -आंब्रड रस्त्यावर हा अपघात घडला. अपघातात फोंडाघाट, गांगोवाडी येथील निकीता सावंत (२८ वर्षे) जागीच मृत्यू पावली तर तिचा भाऊ वैभव सावंत जखमी झाला.
लग्नाची पत्रिका घेऊन निकीता मुंबईहून गावी आली होती. दुचाकी घेऊन आपल्या भावा सोबत आंब्रडहून फोंडाघाट येथे येत होते. कसवण, तळवडे बौद्धवाडी येथे उतारावर पोचताच समोरून एसटी बस आली. बसला बाजू देत असताना दुचाकी रस्त्याजवळ असलेल्या ग्रीडवर घसरली व दोघेही खाली आपटले. त्यात निकीताच्या डोक्याला जबर मार लागला. भाऊ वैभव किरकोळ दुखापत झाली.
अपघात घडल्यानंतर या दोघांना ही आंब्रड येथील डॉ. खटावकर यांच्या इस्पितळात दाखल करण्यात आले. एसटी बस चालक, वाहक व प्रवाशांनी एकत्र येऊन दोघांनाही त्वरीत इस्पितळात दाखल करण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावली. प्राथमिक उपचार झाल्यानंतर दोघांना ही कणकवली येथील जिल्हा इस्पितळात दाखल केले. तपासणीनंतर वैद्यकीय अधिकाऱ्यांनी निकीताला मृत घोषित केले.
अपघातानंतर एसटी बसचालक कृष्णा नेरकर यांनी कणकवली पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली असून, दुचाकीस्वाराने बेदरकार वाहन चालवल्याने अपघात घडल्याचे म्हटले होते. त्यानुसार दुचाकीस्वारावर गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
मामा घरी लग्नाची पत्रिका दिली पण..
फोंडाघाट, गांगोवाडी येथील निकीता दिलीप सावंत आपल्या लग्नाची पत्रिका देण्यासाठी काही दिवसांपूर्वीच मुंबईहून गावी आली होती. रविवारी सकाळी आपल्या भावाला घेऊन लग्न पत्रिका देण्यासाठी बाहेर पडली. मामा घरी पत्रिका देऊन परतत असताना अपघात घडला. त्यात होत्याचे नव्हते झाले. २३ फेब्रुवारीला लग्नसमारंभ होता. पत्रिका छापून वाटप ही सुरू करण्यात आले होते. काळाने अकाली घाला घातला व लग्न करून सुखी संसार करण्याचे स्वप्न अधुरे राहिले.