शनिवारपर्यंत बरसणार पावसाच्या सरी

बिगरमोसमी पावसाचे प्रमाण ३१ टक्के कमी

Story: प्रतिनिधी।गोवन वार्ता |
2 hours ago
शनिवारपर्यंत बरसणार पावसाच्या सरी

पणजी : दिवाळीत नरकासूर भिजवून काही प्रमाणात गैरसोय करणाऱ्या पावसाचा (Rain)  मुक्काम आता शनिवारपर्यंत असणार आहे. पणजीतील वेधशाळेने येते पाच दिवस येलो अॅलर्ट (Yellow Alert) जारी करताना मध्यम प्रमाणात पावसाच्या सरी पडणार असल्याचा अंदाज व्यक्त केला आहे. दरम्यान, बिगरमोसमी (१ ऑक्टोबरपासून) पावसाचे प्रमाण सरासरीपेक्षा ३१ टक्के कमी आहे. आतापर्यंत बिगरमोसमी पाऊस ३.४६ इंच (८८.१ मीमी) झाला आहे. 

यंदा पावसाने दिवाळीच्या आदल्या दिवशी हजेरी लावली. यामुळे नरकासुराच्या प्रतिमा काही प्रमाणात भिजल्या. सोमवारी रात्रीही पावसाने हजेरी लावली. हवामान खात्याकडून शनिवारपर्यंत पावसाचा अंदाज व्यक्त झाल्याने पाडवा व भाऊबिजेलाही पाऊस असणार आहे. पावसाचे प्रमाण कमी असल्याने शेती, बागायतीवर विशेष परिणाम होणार नसल्याची माहिती कृषी खात्याच्या अधिकाऱ्यांनी दिली. 

गेल्या २४ तासात राज्यात १८.७ मीमी पावसाचे नोंद झाली असून एकूण पाऊस ३.४६ इंच (८८.१ मीमी) झाला आहे. 

सोमवारी रात्री साखळीत सर्वाधिक १.७१ इंच (४३.६ मीमी) पावसाची नोंद झाली. यानंतर पेडण्यात १ इंच (२६.८ मीमी), काणकोण २४.२ मीमी, केपे २० मीमी, मुरगाव १८.८ मीमी, दाबोळी १४.२ मीमी, म्हापसा १४.२ मीमी, फोंडा ४.८ मीमी, धारबांदोडा ९.४ मीमी, सांगे २.९ मीमी पावसाची नोंद झाली आहे.

१ ऑक्टोबरपासून आतापर्यंत पेडण्यात सर्वाधिक ७.२६ इंच (१८४.६ मीमी), साखळीत ४.०३ इंच,  (१०२ मीमी), धारबांदोडा ४ इंच (९९.६ मीमी), वाळपई ३.४६ इंच (८८.१ मीमी), काणकोण ८९.२ मीमी, केपे ८० मीमी, मुरगाव ७७.२ मीमी, दाबोळी ५८.४ मीमी, म्हापसा ७३.६ मीमी, फोंडा ३५.८ मीमी, धारबांदोडा ९९.६ मीमी, सांगे ६३.८ मीमी पावसाची नोंद झाली आहे.


हेही वाचा