ख्रिस्तियानो रोनाल्डो खेळणार नाही
पणजी : अखेर अधिकृत घोषणा झाली आहे — ख्रिस्तियानो रोनाल्डो (Cristiano Ronaldo) गोव्यात (Goa) खेळणार नाही. सौदी अरबच्या अल-नस्र संघाचे विमान काल रात्री गोव्यात उतरले असले तरी पोर्तुगालचा हा दिग्गज खेळाडू संघासोबत आलेला नाही.
उद्या (बुधवारी) फातोर्डा स्टेडियमवर एफसी गोवा (Fc Goa) आणि अल-नस्र यांच्यात एएफसी चॅम्पियन्स लीग २ चा सामना होणार आहे. रोनाल्डो अनुपस्थित असला तरी सादियो माने, जोआओ फेलिक्स आणि इनिगो मार्टिनेज यांसारखे तारे या सामन्यात चमकणार आहेत. त्यामुळे सामन्याची उत्सुकता तशीच ताणलेली आहे.
एफसी गोवा विरुद्ध अल-नस्र सामना जाहीर झाल्यापासून गोव्यात रोनाल्डोला प्रत्यक्ष पाहण्याची चाहत्यांची प्रचंड उत्सुकता होती. परंतु, एफसी गोवाच्या वारंवार विनंतीनंतरही रोनाल्डो भारतातील हा सामना टाळणार असल्याचे क्लबने जाहीर केले आहे.
एफसी गोवाने याआधी माजी एएफसी कप विजेते अल सिब यांना पराभूत करून पात्रता मिळवली होती. गट डीत त्यांना अल-नस्र सोबत स्थान मिळाले आहे.
बुधवारी मोठ्या संख्येने प्रेक्षक उपस्थित राहतील, याची कल्पना घेऊन एफसी गोवा सीईओ रवी पुस्कुर यांनी स्थानिक अधिकाऱ्यांच्या समन्वयाने विस्तृत सुरक्षा आणि प्रवेश व्यवस्था जाहीर केली आहे.
या सामन्यासाठी सहा प्रवेशद्वारे सुरू राहणार आहेत.
गेट १ : व्हीव्हीआयपी व व्हीआयपींसाठी
गेट ४ : माध्यमे व वेस्ट अपर स्टँड
गेट ५ : नॉर्थ अपर व लोअर
गेट ६ : ईस्ट लोअर
गेट ८ : ईस्ट अपर, साऊथ अपर व लोअर, तसेच वेस्ट लोअर स्टँड
पार्किंग झोन
‘वी फॉर फातोर्डा’ ग्राउंड, डॉन बॉस्को पार्किंग, एसजीपीडीए लॉट, एसएजी जॉगर्स पार्क, स्विमिंग पूल ग्राउंड आणि रवींद्र भवन येथे करण्यात आले आहेत.
माध्यमांसाठी फातोर्डा चर्च येथे, व्हीआयपींसाठी गेट ४ आणि ५ समोर, तर व्हीव्हीआयपींसाठी स्टेडियमच्या आत पार्किंगची सोय असेल.
प्रवेशास बंदी असलेली वस्तू
पॉवर बँक, सिगारेट, लायटर, सेल्फी स्टिक, नाणी, टिन कॅन, वाद्य, धारदार वस्तू, बॅग, काच बाटल्या, छत्री, हेल्मेट, मद्य, बाहेरील अन्न, डीएसएलआर कॅमेरे, फटाके, व्हेप्स आदी वस्तू स्टेडियममध्ये नेण्यास मनाई आहे.
प्रत्येक प्रेक्षकाकडे भौतिक तिकीट असणे बंधनकारक आहे; मोबाईल स्क्रीनशॉट किंवा ई-तिकीट ग्राह्य धरण्यात येणार नाही,” असे पुस्कुर यांनी सांगितले. “बुकमायशो स्वयंसेवकांकडून तिकीट तपासणीनंतर पोलिस आणि खाजगी सुरक्षा कर्मचाऱ्यांकडून तपासणी केली जाईल.”