पणजी: माजी मुख्यमंत्री स्व. रवी नाईक हे युवकांसाठी प्रेरणास्थान होते, तर सरकारसाठी मार्गदर्शक होते, अशा शब्दांत मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी स्व. रवी नाईक यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली आहे. माजी मुख्यमंत्री रवी नाईक यांच्या शोक सभेमध्ये बोलताना मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी अनेक आठवणींना उजाळा दिला. रवी नाईक हे फावल्या वेळेत केवळ आपले अनुभवच सांगत नसत, तर ते कूळ आणि मुंडकार यांसारख्या महत्त्वाच्या विषयांवर मार्गदर्शनही करायचे. 'मी त्यांना कायम पात्रावच म्हणायचो,' अशी आठवणही मुख्यमंत्र्यांनी सांगितली.
जनतेच्या प्रेमाची साक्ष
मुख्यमंत्र्यांनी रवी नाईक यांच्या लोकप्रियतेचा गौरव करताना सांगितले की, पहिले मुख्यमंत्री स्व. भाऊसाहेब बांदोडकर यांच्या अंतिम दर्शनासाठी तसेच माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्या निधनानंतर जनसागर लोटला होता. त्याचप्रमाणे, रवी नाईक यांच्या अंतिम दर्शनासाठीही लोकांनी दिवसभर रांग लावली होती, जी त्यांच्या लोकप्रियतेची साक्ष देते.
बहुजन समाजाचे कैवारी
मुख्यमंत्री पुढे म्हणाले की, रवी नाईक हे केवळ भंडारी समाजाचे नव्हते, तर ते समस्त बहुजन समाजाचे कैवारी होते. कूळ आणि मुंडकार हा त्यांच्या अत्यंत जिव्हाळ्याचा विषय होता. या विषयावर अधिक माहिती देण्यासाठी ते नेहमी तत्पर असायचे. राजकीय वारसा नसतानाही त्यांनी मंत्री, मुख्यमंत्री, खासदार अशी महत्त्वाची पदे भूषवली आणि पेडणे ते काणकोणपर्यंतच्या जनतेसाठी कार्य केले. त्यांचे हे कार्य कायम स्मरणात राहील, असे मुख्यमंत्र्यांनी यावेळी स्पष्ट केले.