लोटली जहाज बांधणी प्रकल्पात स्फोट, माजी मुख्यमंत्री रवी नाईकांच्या निधनाने राज्यात हळहळ
पणजी : लोटली येथील जहाज बांधणी प्रकल्पात शुक्रवारी भीषण स्फोट होऊन आग लागली. यात आतापर्यंत तिघा कामगारांचा मृत्यू झाला. कृषीमंत्री रवी नाईक यांचे हृदयविकाराने निधन झाल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात आली. कोमुनिदाद कायद्यातील दुरुस्तीला न्यायालयात आव्हान देण्यात आले. याशिवाय अपघात, चोरी अशा घटना घडल्या. या आठवड्यातील घडामोडींचा घेतलेला आढावा.
रविवार
दरोडेखोरांच्या शोधार्थ गोवा पोलीस बांगलादेशाच्या सीमेवर
म्हापसा येथील डॉ. महेंद्र घाणेकर यांच्या बंगल्यावर सशस्त्र दरोडा टाकलेल्यांना मदत केलेल्या तिघांना कर्नाटकमध्ये पोलिसांनी ताब्यात घेतले. दरम्यान, उत्तर गोवा पोलीस आणि गुन्हा शाखेचे मिळून १४ पथके अजूनही गोव्याबाहेर आहेत. त्यातील दोन पथके बांगलादेशाच्या सीमेच्या परिसरात आहेत. तेथे ते संशयित ठिकाणांवर छापे टाकत आहेत.
रामा काणकोणकरच्या जबाबात राजकारण्याचे नाव नाही : पोलीस अधीक्षक
रामा काणकोणकर यांनी दिलेल्या जबाबात राजकारण्याच्या सहभागाचा दावा केला नव्हता. मात्र त्यांनी नव्याने केलेल्या दाव्यानुसार या प्रकरणाची चौकशी केली जाईल. रामा आणि त्याच्या कुटुंबियांना पोलीस सुरक्षा दिली आहे अशी माहिती उत्तर गोवा पोलीस अधीक्षक राहुल गुप्ता यांनी दिली.
जुगार अड्ड्यावर छापा टाकत २० जणांना अटक
सां जुझे दी अरीयाल येथील नेसाय गेटनजीक एका बंदिस्त जागेत सुरू असलेल्या ऑनलाईन जुगारावर मायना कुडतरी पोलिसांनी छापा टाकला. छाप्यात २० संशयितांना अटक केली. तसेच ४.४० लाखांची रोख रक्कम, ४ टॅब, एक राऊटर व एक मोडेम जप्त करण्यात आला.
सोमवार
दरोडेखोरांची टोळी बांगलादेशात पसार
गणेशपुरी-म्हापसा येथील डॉ. महेंद्र घाणेकर यांच्या बंगल्यावर सशस्त्र दरोडा टाकून पसार झालेली दरोडेखोरांची टोळी बांगलादेशी असल्याचे स्पष्ट झाले आहे. मेघालय पोलिसांच्या हातावर तुरी देऊन ही टोळी भारताची सीमा ओलांडून बांगलादेशात पसार झाली आहे.
पोलीस उपनिरीक्षकाला मारहाण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल
म्हार्दोळ पोलीस उपनिरीक्षक जाकी हुसेन हे माशेल भागात रात्री गस्त घालत असताना त्यांनी पुंडलिक मोहन गावकर (रा. केळबायवाडा, तिवरे) याला मध्यरात्रीनंतर फिरत असल्याबद्दल जाब विचारला. यावेळी पुंडलिक गावकर याने आक्रमक पवित्रा घेतला व सुरुवातीलाच उपनिरीक्षकाला शिवीगाळ व धक्काबुक्की केली. नंतर मारहाण केली
मंगळवार
पोलीस बनून चालकाची भरदिवसा ८ लाखांची रोकड लुटली
पर्वरी येथील सुकूर भागात पोलीस बनून एका टोळीने बोलेरो गाडी अडवून मटण आणि चिकन विक्रेत्याची ८ लाख रुपयांची रोकड असलेली बॅग पळवून नेली. चोरीप्रकरणी पर्वरी पोलिसांनी चार अज्ञात संशयितांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. ही इराणी टोळी असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.
दरोडेखोरांच्या दोघा मदतनीसांना अटक
गणेशपुरी-म्हापसा येथील डॉ. महेंद्र घाणेकर यांच्या बंगल्यावर पडलेल्या सशस्त्र दरोडा प्रकरणी पोलिसांनी दोघा बांगलादेशी नागरिकांना अटक केली. या संशयितांनी सहा जणांच्या मुख्य टोळीला बांगलादेशमध्ये सुखरूप पळून जाण्यास मदत केली असून घटनेच्या दिवशी पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले होते.
राज्याच्या निवडणूक आयुक्तपदी मिनिनो डिसोझा
राज्याच्या निवडणूक आयुक्तपदी निवृत्त नागरी सेवा अधिकारी मिनिनो डिसोझा यांची नियुक्ती करण्यात आली आहे. पंचायत संचालकांकडून मंगळवारी त्यांच्या नियुक्तीचा आदेश जारी करण्यात आला.
बुधवार
कृषीमंत्री रवी नाईक यांचे हृदयविकाराने निधन
गोव्याचे ज्येष्ठ नेते, राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि विद्यमान कृषी मंत्री रवी नाईक (७९) यांचे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. बुधवारी सायंकाळी नाईक कुटुंबियांच्या खासगी जागेत त्यांच्या पार्थिवावर सरकारी इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. केंद्र सरकारचे प्रतिनिधी म्हणून केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी उपस्थित होते.
कोमुनिदाद कायद्यातील दुरुस्तीला आव्हान
सरकारने कोमुनिदाद कायद्यात दुरुस्ती केली. त्यात कोमुनिदाद जमिनीवरील घरे वा बांधकामे अधिकृत केली जाणार आहे. याला सात कोमुनिदाद आणि एका कंपनीने विरोध करून गोवास्थित मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे.
आकेत फ्लॅटला आग लागून एक लाखाचे नुकसान
आके मडगाव येथील कॉस्टा फॅक्टरीच्या समोरील आकार हॅबिटाट या इमारतीतील रहिवासी फ्लॅटला आग लागली. यात एक लाखांचे नुकसान झाले असून आगीवर नियंत्रण आणत मडगाव अग्निशामक दलाने २० लाखांची मालमत्ता वाचवली.
गुरुवार
चिमुकलीच्या हत्येप्रकरणी आईसह प्रियकराला अटक
डिचोली तालुक्यातील वन-म्हावळींगे येथे अडीच वर्षीय चिमुकलीच्या हत्येप्रकरणी डिचोली पोलिसांनी संशयित तिच्या आईला आणि आईच्या प्रियकराला अटक केली आहे. मृत मुलीची आई नागम्मा (वय २८) आणि तिचा प्रियकर नितीन कुमार यांनीच मिळून हे निर्घृण कृत्य केल्याचे पोलीस तपासात उघड झाले आहे.
व्याघ्र क्षेत्राला स्थानिकांचा विरोध, तर पर्यावरणवाद्यांचा पाठिंबा
गोव्यात प्रस्तावित व्याघ्र क्षेत्र घोषित झाल्यास अनेक गावांमधील नागरिक विस्थापित होतील आणि लाखो लोकांच्या उपजीविकेवर गदा येईल, अशी भीती व्यक्त करत स्थानिकांनी या प्रस्तावाला तीव्र विरोध दर्शवला आहे. राज्यात व्याघ्र क्षेत्राची गरजच नाही, अशी ठाम भूमिका घेत सरकारमधील मंत्री, आमदार आणि सामान्य नागरिक एकवटले आहेत. दुसरीकडे, पर्यावरणवाद्यांनी मात्र वाघांच्या अस्तित्वासाठी हे क्षेत्र आवश्यक असल्याचा दावा केल्याने हा संघर्ष अधिकच तीव्र झाला आहे.
कोमुनिदाद कायद्यातील दुरुस्तीला स्थगितीस उच्च न्यायालयाचा तूर्त नकार
कोमुनिदाद जमिनीवरील घरे वा बांधकामे अधिकृत करण्याच्या कायद्यात केलेल्या दुरुस्तीला स्थगिती देण्यास गोवास्थित मुंबई उच्च न्यायालयाने तूर्तास नकार दिला आहे. या प्रकरणाची पुढील सुनावणी १३ नोव्हेंबर रोजी होणार आहे. त्यावेळी सरकार आपली बाजू मांडणार आहे.
शुक्रवार
लोटलीतील स्फोटोत दोघा कामगारांचा मृत्यू
लोटली येथील जहाज बांधणी प्रकल्पात शुक्रवारी भीषण स्फोट झाला. यात दोघा कामगारांचा मृत्यू झाला असून चार जण गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्यावर गोमेकॉत उपचार सुरू आहेत. एकावर दक्षिण गोवा जिल्हा इस्पितळात उपचार सुरू आहेत. या प्रकरणी मायणा-कुडतरी पोलिसांनी गुन्हा नोंद करून तपास सुरू केला आहे.
अडीच वर्षीय मुलीचा आईनेच घोटला गळा
वन म्हावळिंगे येथे अडीच वर्षाच्या मुलीची हत्या तिच्या आईनेच आपल्या प्रियकरासाठी केल्याची धक्कादायक माहिती तपासात उघड झाली आहे. डिचोली पोलिसांनी वेगवेगळ्या माध्यमातून पुरावे गोळे करताना फॉरेन्सिक विभागाचेही सहकार्य घेत असताना तपासाला गती दिली. कसून चौकशी केली असता आईनेच गळा घोटून मुलीचा खून केल्याचे स्पष्ट झाले आहे.
चोपडे येथे भीषण अपघातात झारखंडच्या पर्यटकाचा मृत्यू
चोपडे येथे सुसाट वेगाने जात असलेल्या एका पर्यटकांच्या चारचाकी वाहनाने रस्त्याच्या कडेला पार्क केलेल्या ट्रकला जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात झारखंड येथील वाहनचालक मिलिंद उज्ज्वल सिन्हा यांचा जागीच मृत्यू झाला, तर त्यांच्या पत्नीला किरकोळ दुखापत झाली.
शनिवार
जेनिटो, सात संशयितांना न्यायालयीन कोठडी
रामा काणकोणकर हल्लाप्रकरणी जेनिटो कार्दोज आणि इतर सात संशयित आरोपींना मेरशी सत्र न्यायालयाने ३१ ऑक्टोबरपर्यंत न्यायालयीन कोठडी ठोठावली आहे. रामा काणकोणकर याच्यावर करंझाळे येथे १८ सप्टेंबर रोजी प्राणघातक हल्ला झाला होता. या प्रकरणात पणजी पोलिसांनी गुन्हा दाखल करून सराईत गुंड जेनिटो कार्दोझ याच्यासह आठ जणांना अटक करून कारवाई केली.
विजय मरीन स्फोटातील मृतांची संख्या तीन
लोटली येथील जहाज बांधणी प्रकल्पात शुक्रवारी भीषण स्फोट होऊन आग लागली. यात शुक्रवारी दोघांचा तर शनिवारी सकाळी आणखी एका कामगाराचा मृत्यू झाला. या प्रकरणात शिपयार्डचे सुरक्षा अधिकारी राजू बोरा (रा. आसाम) याला अटक करण्यात आली आहे.
लक्षवेधी
नावेलीत चर्चमधील प्रार्थना आटोपून येणार्या वृद्ध महिलेच्या गळ्यातील सोनसाखळी चोरण्याचा प्रकार घडला. यात सुमारे १.२० लाखांची सोन्याची चेन दुचाकीवरुन आलेल्या चोरांनी लंपास केली. याप्रकरणी मडगाव पोलिसात तक्रार नोंद करण्यात आली आहे.
बागा-कळंगुट परिसरात दारूच्या नशेत धिंगाणा घालणाऱ्या दोन संशयित पर्यटकांनी पोलिसांवर हल्ला केला. रॉबर्ट जीपवरील पोलिसांना धक्काबुक्की करत वाहन चालकाचा गळा आवळण्याचाही प्रयत्न त्यांनी केला. या दोघांनाही पोलिसांनी अटक केली असून पुढील तपास सुरू आहे.
वेर्णा येथून मडगावच्या दिशेने जाणार्या दुचाकीचालकाने नुवे बायपास रस्त्यावर भात सुकत घालणार्या दोघांना धडक दिली व पळ काढला. यात दोघांनाही दुखापत झाली. मायना कुडतरी पोलिसांनी संशयित चालक लक्ष्मण कुमार सिंग (रा. वेर्णा, मूळ झारखंड) याच्याविरोधात गुन्हा नोंद केला.
तिसवाडी येथे एका ७२ वर्षीय निवृत्त ज्येष्ठाने ऑनलाईन गुंतवणूक केल्यानंतर ४.७४ कोटी रुपये गमावले आहेत. गोव्यातील हा आतापर्यंतचा सर्वात मोठा गुंतवणूक घोटाळा मानला जात आहे.
राज्यात होणाऱ्या बेकायदेशीर रेती उत्खनन संदर्भात गोवास्थित मुंबई उच्च न्यायालयाने महत्त्वाचे निर्देश दिले आहेत. रात्री ८ ते सकाळी ८ दरम्यान पोलीस गस्त घालावी. याशिवाय नोंदणीकृत नसलेल्या होड्या आढळल्यास जप्त करून कारवाई करा. तसेच बेकायदेशीर रेती उत्खनन थांबवण्यासाठी सर्व आवश्यक उपाय करण्याचे निर्देश न्यायालयाने देत अवमान याचिका निकालात काढली.