आकाशकंदील, पणत्या खरेदीला प्राधान्य : बाजार परिसरात वाहतूक कोंडी
पणजी मार्केट परिसरात झालेेली वाहतूक कोंडी. (नारायण पिसुर्लेकर)
प्रतिनिधी। गोवन वार्ता
पणजी : दिवाळीच्या खरेदीसाठी शनिवारी पणजीसह राज्यातील विविध बाजारात मोठी गर्दी झाली होती. बाजारात आकाशकंदील, पणत्या, विद्युत रोषणाई माळा, रांगोळी, नरकासुर मुखवटे, कृत्रिम फुलांच्या माळा, शोभेच्या अन्य वस्तू खरेदीसाठी लगबग होती. गावठी पोहे, साधे पोहे, कारीटे आदींची खरेदी देखील उत्साहात झाली. शनिवारी बाजार परिसरासह बहुतेक प्रमुख रस्त्यांवर वाहतूक कोंडी झाली होती.
पणजी बाजारात गेल्या वर्षीच्या तुलनेत विविध वस्तूंच्या किमतीत किंचित वाढ झाली आहे. तरीदेखील खरेदीचा उत्साह कायम होता. बाजारात दिवाळीसाठी आवश्यक असणारे गावठी पोहे १२० ते १५० रुपये किलो दराने विकले जात होते. साधे पोहे ७० रुपये किलो होते. कारीटे ३० रुपयांना ५ नग होते. आंबडे ६० ते १०० रुपयांना १० नग तर बत्तासे ५० रुपयांना ६ होते. बेसन लाडू १६० रुपये डझन दराने विकले जात आहेत. रवा लाडू २०० रुपये डझन आहेत.
बाजारात आकाशकंदीलाचे दर आकार तसेच कलाकुसरीनुसार २०० ते १ हजार रुपयांपर्यंत आहेत. मातीच्या साध्या पणत्या ५० ते ८० रुपये डझन, तर कलाकुसर केलेली पणती १५ ते ४० रुपये नग दराने विकली जात होती. विद्युत रोषणाई माळा २०० ते १५०० रुपयांना होत्या. कृत्रिम फुलांच्या माळा ३० ते १५० रुपयांना एक या दराने विकले जात आहेत. याशिवाय शनिवारी बाजारात मिठाई, भेटवस्तू, कपडे खरेदीसाठी गर्दी झाली होती.
पणजीत वाहनांच्या रांगा
शनिवारी सांतिनेज, १८ जून, एमजी रस्ता, आझाद मैदान परिसर, बांदोडकर रस्ता येथे वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. बहुतेक ठिकाणी पोलीस असले तरी पार्किंगची व्यवस्था नसल्याने वाहने रस्त्यांवर पार्क करण्यात आली होती. यामुळे वाहतूक कोंडीत भर पडली.