तरुणांमध्ये उत्साह : डीजेच्या आवाजावर नियंत्रणासाठी प्रशासन सज्ज
नरकासुराच्या प्रतिकृतीला रंगकाम करताना पणजीतील सांतिनेज परिसरातील किंग काँग बॉईज पथकातील तरुण. (समीप नार्वेकर)
प्रतिनिधी। गोवन वार्ता
पणजी : राज्यभरात सोमवारी पहाटे नरकासुर दहन होणार आहे. दिवाळी साजरी करण्यासाठी उत्साहाचे वातावरण आहे. नरकासुराच्या प्रतिकृती उभारण्यासाठी तरुणाईने विशेष मेहनत घेतली आहे. अनेक ठिकाणी नरकासुर प्रतिमेचे काम अंतिम टप्प्यात पोहोचले असून सजावटीसाठी रंगरंगोटी सुरू आहे.
पणजीसह राज्यभरात नरकासुर प्रतिमा बनविण्याचे काम जोरात सुरू आहे. अनेक मंडळांनी मुलांच्या परीक्षा आणि अवकाळी पावसाचा व्यत्यय यामुळे उशिरा काम सुरू केले. त्यामुळे त्यांना वेळ कमी पडला. अखेर युवकांनी रात्रभर काम करून प्रतिकृती उभारल्या आहेत.
सांतिनेजसह राजधानीतील विविध पथकांनी नरकासुर प्रतिमा तयार केल्या आहेत. काही ठिकाणी सांगाड्यावर कागद चिकटवून रंगकाम सुरू झाले असून रविवारी दुपारपर्यंत या नरकासुराच्या प्रतिकृती पूर्ण होणार आहेत.
राज्यात अनेक ठिकाणी दिवाळीच्या पूर्वसंध्येला संगीत आणि लाईट शोची तयारी करण्यात आली आहे. तरुणांनी संगीत कार्यक्रमांसह डीजे पार्टी, ईडीएम कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. यामध्ये इतर राज्यांतील नामांकित डीजेही सहभागी होत आहेत.
तथापि, मोठ्या आवाजातील संगीतामुळे नागरिक, विशेषत: वृद्ध आणि हृदयविकाराच्या रुग्णांना त्रास होऊ नये, यासाठी सरकारने आवाजाच्या तीव्रतेवर मर्यादा घातल्या आहेत. गोवा प्रदूषण नियंत्रण मंडळाने ध्वनिप्रदूषणावर नियंत्रण ठेवण्यासाठी वेळेची मर्यादा घातली आहे. रात्री १२ नंतर कोणत्याही ठिकाणी संगीत वाजविल्यास संबंधितांवर कारवाई केली जाईल, असे प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.