मिळवली २१ कोटींहून अधिक सूट; एका गाडीची किंमत आहे ६० लाख ते १.३० कोटी
संघटन, सामुदायिक शक्तीचा योग्य वापर केल्यास मोठा आर्थिक फायदा कसा होतो, याचा उत्तम प्रत्यय जैन समाजाने दिला आहे. व्यापार आणि उद्योगातील आपल्या समृद्ध वारशासाठी ओळखल्या जाणाऱ्या जैन समाजाने एकत्रितपणे १८६ अलिशान (Luxury cars) गाड्यांची खरेदी करून तब्बल २१ कोटी रुपयांहून अधिक सूट मिळवली आहे. यातून जैन समाजाची प्रचंड खरेदी क्षमता सिद्ध झाली आहे.
'जैन इंटरनॅशनल ट्रेड ऑर्गनायझेशन' (JITO) या संस्थेच्या पुढाकाराने हा 'वन-ऑफ-इट्स-काईंड' (One-of-its-kind) करार यशस्वी झाला. देशभरात ६५,००० सदस्य असलेल्या 'जीतो'ने बीएमडब्ल्यू, ऑडी, मर्सिडीज (AUDI,BMW, MERCEDES ) यांसारख्या १५ प्रमुख ब्रँडच्या डीलर्ससोबत थेट वाटाघाटी करून आपल्या सदस्यांसाठी सर्वोत्तम दर निश्चित केले.
२१ कोटींची ऐतिहासिक बचत
जीतो (JITO) च्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, या गाड्यांची किंमत ६० लाख ते १.३४ कोटी रुपये प्रति वाहन अशी होती. जानेवारी ते जून या सात महिन्यांच्या कालावधीत ही खरेदी पूर्ण झाली. एकूण १४९.५४ कोटी रुपयांच्या या डीलमध्ये सदस्यांनी एकत्रितपणे २१.२२ कोटी रुपयांची बंपर सूट मिळवली आहे.
'जीतो'ने या व्यवहारात केवळ मध्यस्थ (facilitators) म्हणून काम केले, कोणताही नफा कमावला नाही. 'जीतो'चे उपाध्यक्ष हिमांशु शाह यांनी सांगितले की, अशा पद्धतीने केलेल्या सामुदायिक खरेदीमुळे घासाघीस (BARGAIN ) करण्याची क्षमता वाढते. या डीलमुळे प्रत्येक सदस्याने सरासरी ८ लाख ते १७ लाख रुपये इतकी मोठी बचत केली आहे, ज्यात कुटुंबासाठी आणखी एक कार खरेदी करता आली असती.
गुजराती जैन आघाडीवर
या सामुदायिक खरेदीमध्ये देशातील अनेक जैन सदस्य सहभागी झाले असले तरी, बहुतेक अलिशान गाड्या गुजरातमध्ये स्थायीक (अहमदाबाद) जैन सदस्यांनीच खरेदी केल्या आहेत. 'जीतो'च्या एका सदस्याने ही कल्पना मांडली होती. कार डीलर्सना एकाच वेळी मोठे 'व्हॉल्यूम' मिळत असल्यामुळे आणि त्यांची 'मार्केटिंग कॉस्ट' वाचत असल्यामुळे, त्यांनाही ही 'विन-विन' (Win-Win) स्थिती फायदेशीर ठरली. या यशानंतर 'जीतो'ने आता सामुदायिक खरेदीसाठी एक स्वतंत्र विभाग तयार केला आहे. यापुढे इलेक्ट्रॉनिक्स, औषधे आणि दागिने यांसारख्या इतर श्रेणींमध्येही असे सामूहिक सौदे करण्याची त्यांची योजना आहे.
फक्त जैनच नाही, तर भरवाड समाजानेही अशा सामुदायिक खरेदीचा अवलंब केला आहे. भरवाड युवा संघटनेने १२१ जेसीबी मशीन्ससाठी सामूहिक बुकिंग केले होते आणि प्रत्येक मशीनवर सरासरी ३.३ लाख रुपयांची सूट मिळवली, ज्यामुळे सुमारे ४ कोटी रुपयांची बचत झाली. त्यामुळे सामुदायिक शक्तीच्या बळावर भविष्यात अशा मोठ्या आर्थिक बचतीचे आणि व्यापाराचे नवे अध्याय लिहिले जाण्याची शक्यता आहे
.