शिक्षण : सोशल मीडिया इन्फ्लुएंसर सिद्धेश लोकरेचे अभिनव 'मिशन 30303'

ग्रामीण भागात शिक्षणाला 'कूल' बनवण्याचा ध्यास

Story: वेब डेस्क । गोवन वार्ता |
2 hours ago
शिक्षण : सोशल मीडिया इन्फ्लुएंसर सिद्धेश लोकरेचे अभिनव 'मिशन 30303'

पुणे : आजच्या करिअर सेंट्रीक जगात, सिद्धेश लोकरे या तरुणाने आपल्या स्कूटीवरून एक अभूतपूर्व सामाजिक क्रांतीची मशाल पेटवली आहे. सोशल मीडियावर 'सिडियसली' (Sidiously) या नावाने लोकप्रिय असलेल्या सिद्धेशने ग्रामीण भागात शिक्षणाचे महत्त्व अधोरेखीत करण्यासाठी 'मिशन 30303' हे महत्त्वाकांक्षी अभियान सुरू केले आहे. ३० दिवसांत ३० शाळांसाठी ३ कोटी रुपये जमा करण्याचे हे स्वप्न केवळ निधी उभारणी नाही, तर महाराष्ट्रातील ग्रामीण शिक्षणाला 'जनचळवळ' बनवण्याचा ध्यास आहे.



२२,००० शाळा 'कोलमडण्याच्या' वाटेवर

सिद्धेश लोकरेच्या सखोल अभ्यासातून धक्कादायक वास्तव समोर आले आहे. तो सांगतो, "महाराष्ट्रातील २२,००० हून अधिक शाळा आज अक्षरशः कोलमडण्याच्या वाटेवर आहेत. लाखो शाळांमध्ये मुलांना शिकण्यासाठी मूलभूत सुविधा, बाकडे, पुस्तके किंवा स्वच्छतेची साधने नाहीत. शाळा केवळ नावापुरत्या नसाव्यात, मुलांना शिकायला योग्य वातावरण देखील मिळाले पाहिजे," या विचारातून त्याने हे मिशन सुरू केले आहे.



 स्कूटीवरून समाजक्रांती

महाराष्ट्रातील संघर्षरत शाळांची खरी स्थिती जगासमोर आणण्यासाठी सिद्धेश स्वतः स्कूटीवरून राज्यभर फिरतो. गावागावातल्या शाळांना भेटी देतो, मुलांशी बोलतो आणि त्यांच्या गरजा समजावून घेतो. त्याच्या प्रवासाचे व्हिडिओ आणि रील्स सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले आहेत. मुलांच्या डोळ्यांतील निरागस आनंद आणि शिक्षणाचा अभाव असलेले भीषण वास्तव तो जगासमोर आणतो, ज्यामुळे अनेकांचे हृदय पिळवटून निघते. त्याने अतिशय सोपे गणित मांडले आहे: "३० हजार लोकांनी फक्त १००० रुपये दिले, तरी ३ कोटी जमा होतील. प्रत्येकाने फूल ना फुलाची पाकळी जरी दिली, तर मोठे काहीतरी घडू शकते." ही केवळ आकडेमोड नसून, सामूहिक जबाबदारीची जाणीव आहे.



जामखेडची 'गरीबाची शाळा' ठरली प्रेरणास्रोत

याच प्रवासात सिद्धेश जेव्हा जामखेड (अहमदनगर) येथील एका छोट्या जिल्हा परिषद शाळेत (या शाळेला गरीबाची शाळा म्हणून ओळखले जाते ) पोहोचला, तेव्हा तेथील दृश्य पाहून तो थक्क झाला. या शाळेच्या भिंतींवर विज्ञान, इतिहास आणि जीवशास्त्राचे रंगीत नकाशे रेखाटले होते, तर वर्गखोल्यांचे दरवाजे रॉकेट आणि विमानांसारखे रंगवले होते, ज्यामुळे मुलांना कल्पनेत उंच भरारी घेण्याची प्रेरणा मिळत होती. हे अद्भुत परिवर्तन करणारे शिक्षक बोराटे सर गेल्या अडीच वर्षांपासून एकही दिवस सुट्टी न घेता मुलांमध्ये वावरतात. त्यांचे समर्पण पाहून सिद्धेश लोकरे भावूक झाला आणि त्याने या शाळेचा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला.

जामखेड़ की ‘गरीबाची शाळा’ ने सबको किया हैरान समाजसेवी सिद्धेश लोकरे ने देखी प्रतिभा से भरी स्कूल की दुनिया


शिक्षण म्हणजे केवळ पुस्तके नाही, त्यात समाज बदलण्याची शक्ती!

सिद्धेश लोकरे आज केवळ एक सोशल मीडिया इन्फ्लुएंसर राहिलेला नाही. तो आज लाखो तरुणांसाठी आशेचा दीपस्तंभ बनला आहे. "बदल घडवण्यासाठी मोठे पद लागत नाही, लागतो तो फक्त प्रामाणिक प्रयत्नाचा ध्यास.” या विचाराने तो समाजाला प्रेरणा देत आहे. त्याच्या या मिशनमुळे ग्रामीण मुलांना बाकडे, पुस्तके, स्टेशनरी, ग्रंथालये, शौचालये अशा मूलभूत सुविधा मिळतील, ज्याचा थेट परिणाम विद्यार्थ्यांच्या जीवनावर आणि पुढील पिढ्यांवर होईल.



सिद्धेश दाखवून देत आहे की, शिक्षण म्हणजे केवळ पुस्तके नाहीत, तर त्यात समाज बदलण्याची खरी शक्ती आहे.
हेही वाचा