मडगाव : राय पंचायतीचे (Panchayat) सरपंच (Sarpanch) जासिंटा डायस यांच्याविरोधात अविश्वास ठराव सहा विरूद्ध पाच मतांनी संमत झाला.
राय पंचायतीमधील सरपंच व उपसरपंचपदाचा संगीत खुर्चीचा खेळ संपत नाही. यापूर्वी उपसरपंचांवर अविश्वास ठराव दाखल करण्यात आल्यानंतर सरपंच मारिओ डिसोझा यांनी अविश्वास ठराव दाखल होण्यापूर्वी सरपंचपदाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर सरपंचपदाच्या झालेल्या निवडणुकीत झेविअर फर्नांडिस यांचा सहा विरुध्द पाच अशा मतांनी पराभव करत जून २०२५ मध्ये जासिंटा डायस या सरपंच झाल्या होत्या. त्यानंतर रिक्त असलेल्या उपसरपंच पदावरील निवडणूक ९ ऑक्टोबर रोजी झाली व त्यावेळी एकाच गटातील असलेले गॉडफ्री सुझा व सिंथिया फर्नांडिस हे आमनेसामने आले होते. हे दोन्ही पंच सत्ताधारी गटातील होते व आमदार आलेक्स रेजिनाल्ड यांचे समर्थक मानले जात होते. मात्र, गॉडफ्री सुझा यांनी सहा विरुध्द पाच मतांनी सिंथिया फर्नांडिस यांचा पराभव करत उपसरपंचपद मिळवले. यानंतर १० ऑक्टोबर रोजी विरोधी गटाने सहा पंचांच्या सह्यानी सरपंच जासिंटा डायस यांच्याविरोधात अविश्वास ठराव दाखल केला होता. यावेळीच्या पंचायत निवडणुका झाल्यापासून जासिंटा या चौथ्या सरपंच आहेत. आंतानिओ झेविअर फर्नांडिस, मॅन्युएल रॉड्रिग्ज, पीटर क्वाद्रोस, गॉडफ्री ओसवाल्ड सुझा, मिंगुलिना डिसोझा, क्विनी डिकुन्हा इ. डिकोस्टा या सहा पंचांकडून निवेदनावर सह्या करण्यात आलेल्या होत्या. सरपंच कोणत्याही निर्णयात पंचांना विश्वासात घेत नाहीत तसेच पंचाच्या कामात कोणतेही सहकार्य करत नाहीत, अशा कारणाखाली बीडिओंकडे अविश्वास ठराव दाखल करण्यात आला होता. त्यानुसार गटविकास अधिकाऱ्यांनी शुक्रवारी अविश्वास ठरावावर बैठक ठेवली होती. त्यावरूनही वाद झाला होता. सरपंच जासिन्टा यांच्या गटातील पंचांनी नोटीस न स्वीकारल्याने त्याच्या घराबाहेर नोटीस लावण्यात आली यावरून त्यांनी सचिवांवर मनमानी कारभाराचे आरोप केले होते. शुक्रवारी झालेल्या बैठकीत सरपंच जासिंटा डायस यांच्या विरोधातील ठराव ६ विरूद्ध ५ मतांनी संमत झाल्याने त्यांना सरपंच पदावरून पायउतार व्हावे लागले.