आमदार बोरकांच्या तक्रारीची दखल; पर्यटन खात्याचे बांधकाम बंदीचे आदेश
बांबोळी समुद्रकिनारी ग्रँड हयात रिसॉर्टने बेकायदा केलेले संरक्षक भिंतीचे काम.
पणजी : बांबोळी समुद्रकिनाऱ्यावर ग्रँड हयात रिसॉर्टने बेकायदेशीरपणे केलेल्या संरक्षक भिंतीच्या बांधकामावरून पर्यटन खात्याने मेअर्स गोवन हॉटेल्स अॅण्ड रिएल्टी प्रा. लि. या रिसॉर्ट कंपनीवर कारवाई केली आहे. पर्यटन खात्याच्या मालमत्तेत अतिक्रमण केल्याचा ठपका ठेवत, या बांधकामावर तत्काळ बंदी घालण्याचे आदेश पर्यटन खात्याचे संचालक केदार नाईक यांनी काढले आहेत.
ग्रँड हयात रिसॉर्टच्या समोर समुद्रकिनाऱ्यावर रिसॉर्ट व्यवस्थापनाने ही संरक्षक भिंत बांधली होती. हे बांधकाम पूर्णपणे बेकायदेशीर असल्याचा आरोप स्थानिक आमदार वीरेश बोरकर यांनी करून यासंदर्भात गोवा किनारी क्षेत्र व्यवस्थापन प्राधिकरण आणि पर्यटन खात्याकडे तक्रार दाखल केली होती. बोरकर यांच्या तक्रारीची दखल घेऊन पर्यटन खात्याने सदर कारवाई केली आहे.
पर्यटन खात्याने रिसॉर्ट व्यवस्थापनाला पुढील आदेश येईपर्यंत हे बांधकाम आहे तसेच ठेवण्यास सांगितले आहे. इतकेच नव्हे तर, हे बांधकाम 'गोवा पर्यटन तळ संरक्षण आणि देखरेख कायदा २००१' नुसार उपद्रव ठरत असल्याने या समुद्रकिनाऱ्यावर भिंत बांधल्याबद्दल कंपनीवर कारवाई का करू नये, याबाबत कारणे दाखवा नोटीस जारी केली आहे. यावरील सुनावणी २४ ऑक्टोबर रोजी सकाळी ११ वा. ठेवण्यात आली आहे. रिसॉर्ट व्यवस्थापनाला या नोटीसला उत्तर देण्यासाठी पर्यटन संचालकांसमोर आपला प्रतिनिधी पाठवण्याचे आदेश देण्यात आले आहेत.