राज्यात फसवणुकीच्या ३६ घटना नोंद
पणजी : सायबर गुन्हेगारांकडून अनेकांना कोट्यावधी रुपयांना चुना लावल्याचे वारंवार पुढे येत आहे. सीबीआय, ईडीचे अधिकारी असल्याची बतावणी करून डिजिटल अरेस्ट दाखवून फसवणूक करणे, पैसे दुप्पट, तिपट्ट करण्याचे आमिष दाखवून ऑनलाइन गुंतवणूक करण्यास लावून फसवणूक करणे असे प्रकार घडत आहेत. तिसवाडी, गोवा येथे एका ७२ वर्षीय निवृत्त ज्येष्ठाने ऑनलाइन गुंतवणूक केल्यानंतर ४.७४ कोटी रुपये गमावले आहेत. गोव्यातील आतापर्यंतचा सर्वात मोठा गुंतवणूक घोटाळा मानला जात आहे.
गोव्यातील तिसवाडी येथील एका ७२ वर्षीय निवृत्त व्यक्तीने राज्यातील सर्वात मोठ्या ऑनलाइन गुंतवणूक घोटाळ्यात ४.७४ कोटी रुपये गमावले. ही घटना ऑक्टोबर २०२५ च्या मध्यात घडली.
घोटाळ्याची तपशीलवार माहिती:
पद्धत : सोशल मीडियावर जाहिरात केलेल्या बनावट इनिशियल पब्लिक ऑफरिंग (आयपीओ) गुंतवणूक योजनेद्वारे आमिष दाखवण्यात आले.
फसवणूक : फसवणूक करणाऱ्यांनी पात्र संस्थात्मक खरेदीदार (क्यूआयबी) म्हणून ओळख निर्माण केली, ज्येष्ठ नागरिकाला गुंतवणूक ऑफर कायदेशीर असल्याचे आणि उच्च परतावा देणारी असल्याचे पटवून देण्यात यशस्वी ठरले.
व्यवहार: त्या व्यक्तीने नंतर अनेक हप्त्यांमध्ये पैसे हस्तांतरित करून गुंतवणूक केली.
हप्प्त्यांमध्ये गुंतवणूक पूर्ण झाल्यानंतर प्रतिसाद मिळणे बंद झाले व कोणताही परतावा न मिळाल्याने ज्येष्ठाला आपली फसवणूक झाल्याचे कळून चुकले.
ज्येष्ठाने तक्रार दाखल केल्यानंतर गोवा पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने गुन्हा दाखल करून घेऊन तपास सुरू केला आहे.
ज्येष्ठ नागरिक असुरक्षित?
गोव्यात ज्येष्ठ नागरिकांना अशाप्रकारे सायबर गुन्हेगार लक्ष्य करीत आहेत. मर्यादित डिजिटल साक्षरता, विश्वासू स्वभाव आणि तात्काळ मदतीचा अभाव यामुळे ज्येष्ठ नागरिक या घोटाळ्यांना बळी पडत असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे.
नऊ महिन्यांत ३६ जणांची फसवणूक
गोव्यात गेल्या नऊ महिन्यांत अशा प्रकारची ३६ जणांची फसवणूक झाल्याचे माहिती पुढे आली आहे.
गोव्यात घडलेल्या ठळक घटना
९७ लाखांचा "डिजिटल अटक" घोटाळा (जुलै २०२५): तिसवाडीतील एका महिलेची एकाने सीबीआय अधिकारी असल्याची बतावणी करून ९७ लाख रुपयांची फसवणूक केली. याप्रकरणी एका २३ वर्षीय तरुणाला अटक करण्यात आली.
१.०५ कोटी रुपयांचा "डिजिटल अटक" घोटाळा (ऑगस्ट २०२५): बनावट अटक वॉरंट असल्याची बतावणी करून केपे येथील एका स्थानिकाकडून १.०५ कोटी रुपये उकळण्यात आले. याप्रकरणी केरळच्या एका इसमाला अटक करण्यात आली.
१.१८ कोटींचा "फेडएक्स पार्सल" घोटाळा (सप्टेंबर २०२५): एका निवृत्त ज्येष्ठ नागरिकाच्या पार्सलमध्ये ड्रग्ज असल्याची बतावणी करीत त्याची १.१८ कोटी रुपयांची फसवणूक करण्यात आली.