क्रूझ टर्मिनलच्या उद्घाटनाचा मुहूर्त पुढे ढकलला

फेब्रुवारीपर्यंत काम पूर्ण; पर्यटन हंगामात होणार कार्यान्वित : एमपीए

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
16th October, 11:52 pm
क्रूझ टर्मिनलच्या उद्घाटनाचा मुहूर्त पुढे ढकलला

क्रूझ टर्मिनल प्रकल्पाचे मुरगाव बंदरावर सुरू असलेले काम. (समीप नार्वेकर)

पणजी : यावर्षीच्या पर्यटन हंगामात मुरगाव बंदरात क्रूझ टर्मिनल सुरू करण्याचा मुहूर्त मुरगाव बंदर प्राधिकरणाला चुकला. काही तांत्रिक त्रुटींमुळे क्रूझ टर्मिनलच्या कामांना विलंब झाल्याने हे टर्मिनल फेब्रुवारी २०२६ पर्यंत तयार होईल आणि पुढील पर्यटन हंगामात कार्यान्वित होईल, अशी माहिती माहिती एमपीएचे चेअरमन एन. विनोदकुमार यांनी दिली. मुरगाव बंदरावर आंतरराष्ट्रीय तसेच देशांतर्गत क्रूझसाठी दोन आधुनिक टर्मिनल उभारण्यात येत आहेत. इमिग्रेशन सुविधेसह इतर अत्याधुनिक सुविधा या टर्मिनल्समध्ये उपलब्ध असतील, ज्यामुळे राज्यातील क्रूझ पर्यटनाला अधिक चालना मिळेल. एन. विनोदकुमार यांनी सांगितले की, आंतरराष्ट्रीय आणि देशी क्रूझ टर्मिनलचे हे दोन मोठे प्रकल्प सुमारे १०० कोटी रुपये खर्चून एमपीएमध्ये उभारले जात आहेत. या दोन्ही प्रकल्पांचे ८३ टक्के काम पूर्ण झाले आहे.
हा प्रकल्प या वर्षीच्या (२०२५) पर्यटन हंगामात कार्यान्वित होईल, अशी अपेक्षा होती. परंतु, काही कारणांमुळे त्याला विलंब झाला आहे. या प्रकल्पाच्या एकूण पाच इमारती असून, त्यांचे बांधकाम फेब्रुवारीपर्यंत पूर्ण होईल. तर इमारतींमधील अंतर्गत कामे पूर्ण होण्यासाठी पुढील दोन महिने लागतील. पुढील पर्यटन हंगाम २०२६ पर्यंत हा प्रकल्प पूर्णपणे कार्यान्वित होईल, अशी आशा विनोदकुमार यांनी व्यक्त केली.
कंत्राटदाराच्या दिरंगाईमुळे विलंब
या प्रकल्पाला झालेल्या विलंबाचे कारण स्पष्ट करताना विनोदकुमार म्हणाले की, कंत्राटदाराच्या आर्थिक परिस्थितीमुळे तसेच बांधकामासाठी लागणारे साहित्य वेळेवर न मिळाल्याने हा प्रकल्प पुढे ढकलण्यात आला. राज्य सरकारचा यात कोणताही विषय नसून, सरकार या प्रकल्पासाठी पूर्ण सहकार्य करत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

हेही वाचा