रवी नाईक यांच्या मृत्यूनंतर रिकामे झालेले बारावे मंत्रिपद कोणाला दिले जाईल, की फोंड्याच्या पोटनिवडणुकीपर्यंत भाजप वाट पाहील, यापेक्षा फोंड्यात भाजपचा उमेदवार कोण असेल आणि त्याच्या विरोधात कोण उभे राहतील, ही चर्चा रंगत आहे.
माजी मुख्यमंत्री रवी नाईक यांच्या निधनामुळे गोवा विधानसभेतील फोंडा मतदारसंघाची जागा रिक्त झाली आहे. तेथे लवकरच पोटनिवडणूक होणार आहे. या पोटनिवडणुकीसाठी उमेदवार निवडीसाठी भाजप रवी नाईक यांच्या कुटुंबातील सदस्यालाच निवडणुकीत उतरवू शकते, असे सध्या चित्र आहे. रितेश नाईक हे रवी यांच्या जागी उमेदवार म्हणून निवडले जाऊ शकतात. भाजपच्या सरकारमध्ये घटक असलेल्या मगोने तर रितेश यांना उमेदवारी द्यावी, अशी मागणीही केली आहे. मगोने बहुजन समाजाच्या भावना ओळखूनच ही मागणी केली आहे. मगोचे नेते निवडून येत असलेल्या फोंड्याच्या भागांत बहुजन समाजाचा आणि विशेषतः भंडारी समाजाचा प्रभाव आहे, तसेच आदिवासी समाजाचीही मोठ्या प्रमाणात मगोला साथ आहे. रवी नाईक हे गोव्यातील बहुजन समाजाचे लोकनायक असेच म्हणून सर्वजण त्यांच्याकडे पाहतात. त्यांना खरी श्रद्धांजली म्हणजे, त्यांच्या घरातील सदस्याला उमेदवारी देऊन निवडून आणणे, अशी असेल. पोटनिवडणुकीत फोंड्यातून भाजप हा पक्ष म्हणून न पाहता तिथे रवी नाईक यांनी मागे ठेवलेली त्यांची प्रतिमा पाहिली जाऊ शकते, असेच काही वर्षांपूर्वी माथानी साल्ढाणा यांच्या बाबतीत घडले होते. साल्ढाणा यांच्या मृत्यूनंतर त्यांची पत्नी एलिना साल्ढाणा यांना बिनविरोध निवडून देण्यासाठी सर्वच पक्षांनी त्यावेळी पुढाकार घेतला होता. साल्ढाणा पर्रीकर यांच्या सरकारमध्ये मंत्री होते. त्यांचे निधन झाल्यानंतर भाजपने एलिना साल्ढाणा यांना उमेदवार म्हणून घोषित केले. काँग्रेस आणि अपक्ष उमेदवारांनी उमेदवारी अर्ज भरले होते, पण शेवटी सर्वांनी माघार घेतल्यामुळे माथानी साल्ढाणा यांनी गोव्याच्या सामाजिक कार्यात दिलेल्या योगदानामुळे एलिना साल्ढाणा यांना विधानसभेचा मार्ग मोकळा झाला होता. रवी नाईक यांचे योगदान गोव्यासाठी मोठे आहे. फक्त बहुजन समाजासाठी नव्हे, तर गोव्यातील सर्वच घटकांसाठी रवी नाईक यांचे योगदान आहे. राज्य क्रीडापटू, पायलट, बार चालवणारा ‘पात्राव’ यापासून ते राज्याचे मुख्यमंत्री असा प्रवास असलेल्या रवी नाईक यांनी कूळ-मुंडकारांचे प्रश्न सोडवण्यासाठी केलेले प्रयत्न असोत, किंवा गोव्यातील गुंडगिरीला लगाम लावण्यासाठी केलेले काम असो, ते विसरता येणार नाही. रवी नाईक आणि सुदिन ढवळीकर हे एकमेकांचे राजकीय शत्रू असले तरी रवी नाईक यांच्या कार्याची पावती म्हणून मगोच्याच नेत्यांनी रितेश नाईक यांना उमेदवारी द्यावी, अशी सर्वात प्रथम मागणी केली आहे. त्यामुळे भाजप रितेश नाईक यांचा विचार करू शकते. तसे झाले तर भाजपलाही त्याचा फायदाच होणार आहे. त्यामुळेच मगोने सध्या घेतलेली भूमिका ही मगोसाठी जशी फायद्याची ठरणार आहे, तशीच भाजपसाठीही. दोन्ही पक्षांना यात फायदेच आहेत.
फोंड्यात २०२२ च्या निवडणुकीत भाजप-मगो-काँग्रेस यांच्यात चुरशीची तिरंगी लढत झाली होती. मगोचे नेते केतन भाटीकर यांचा विजय थोड्या मतांनी हुकला होता. त्यांना ७,४३७ मते मिळाली होती तर रवी नाईक यांना ७,५१४ मते मिळाली होती. काँग्रेसने ६,८३९ मते मिळवली होती. त्यामुळे तिन्ही पक्षांना फोंड्यात चांगला वाव आहे. तिघांमध्ये तेवढ्याच ताकदीची स्पर्धा होते. पण आता मगोच्या नेत्यांनीच रितेश यांचे नाव पुढे केल्यामुळे अन्य पक्षाचे नेते आपला उमेदवार फोंड्यात उतरवतील का, हा प्रश्न आहे. सध्या आम आदमी पक्षाने भंडारी समाजाच्या मतांकडे आपला मोर्चा वळवला आहे. काँग्रेसची तयारीही सुरू आहे. गोवा फॉरवर्ड, आरजीपीही २०२७ च्या निवडणुकीच्या तयारीला लागले आहेत. फोंड्यातील पोटनिवडणूक ही विधानसभा निवडणुकीच्या एक वर्ष आधी होत असल्यामुळे अशा वेळी भाजपविरोधी राजकीय पक्ष फोंड्याच्या बाबतीत काय भूमिका घेतात, तेही पहावे लागेल. रवी नाईक यांनी काँग्रेस सोडून भाजपची कास धरली होती. त्यामुळे काँग्रेस फोंड्यातून निवडणूक लढवण्याचा विचार करू शकतो. रवी नाईक यांच्या निधनामुळे जी सहानुभूतीची लाट आहे, ती निवडणुकीपर्यंत रितेश नाईक यांच्यासोबत राहिली तर इतरांचा तिथे टिकाव लागणार नाही. पण माथानी साल्ढाणा यांच्या निधनानंतर ज्या पद्धतीने काँग्रेस या महत्त्वाच्या विरोधी पक्षाने जशी माघार घेतली होती, तशी माघार फोंड्यातून घेतल्यास काँग्रेसला आपली प्रतिमा बळकट करण्यास मदत होऊ शकते. रवी नाईक यांच्या मृत्यूनंतर रिकामे झालेले बारावे मंत्रिपद कोणाला दिले जाईल, की फोंड्याच्या पोटनिवडणुकीपर्यंत भाजप वाट पाहील, यापेक्षा फोंड्यात भाजपचा उमेदवार कोण असेल आणि त्याच्या विरोधात कोण उभे राहतील, ही चर्चा रंगत आहे.