विधानसभा निवडणुकीसाठी मंगळवार, १४ रोजी भाजपची पहिली यादी जाहीर झाली. या यादीत ७१ उमेदवार आहेत. विधानसभेच्या २४३ जागांसाठी ६ आणि ११ नोव्हेंबर, अशा दोन टप्प्यांत मतदान होत आहे. निकाल १४ नोव्हेंबरला जाहीर होणार आहे. ३ कोटी ९२ लाख पुरुष आणि ३ कोटी ५० लाख महिला, असे एकूण ७ कोटी ४२ लाख मतदार मतदानाचा हक्क बजावतील. १४ लाख मतदार प्रथमच मतदान करतील.
सत्ताधारी भाजपप्रणीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीला (एनडीए) पराभूत करण्यासाठी विरोधकांच्या ‘इंडि’ आघाडीने शड्डू ठोकला आहे. भाजपने पहिल्या यादीत ५० टक्के उमेदवारांवर पुन्हा विश्वास टाकला आहे, तर १० विद्यमान आमदारांचे तिकीट कापून नवीन चेहऱ्यांना संधी दिली आहे. पहिल्या यादीत उपमुख्यमंत्री सम्राट चौधरी यांच्यासह प्रमुख नेत्यांचा समावेश आहे.
एनडीएने १० ऑक्टोबर रोजी जागावाटपाचा फॉर्म्युला जाहीर केला होता. त्यानुसार भाजप आणि नितीश कुमार यांचा जनता दल (यु) पक्ष प्रत्येकी १०१ जागा लढवणार आहेत. केंद्रीय मंत्री चिराग पासवान यांच्या लोक जनशक्ती पक्षाला (रामविलास) २९ जागा दिल्या आहेत. राष्ट्रीय लोक मोर्चा आणि हिंदुस्थानी अवाम मोर्चा प्रत्येकी ६ जागा लढणार आहेत.
डच्चू दिलेल्या १० विद्यमान आमदारांमध्ये पाच माजी मंत्री आणि काही ज्येष्ठ नेते आहेत. साहिब मतदारसंघातून सातवेळा निवडून आलेले ज्येष्ठ नेते किशोर यादव, कुम्हरारचे पाच वेळा आमदार राहिलेले अरुण सिन्हा यांचे तिकीट कापले आहे. पाटण्यातील या दोन्ही मतदारसंघांतून उच्च न्यायालयातील वकील रत्नेश कुशवाहा आणि पक्षाचे सरचिटणीस संजय गुप्ता या नवीन चेहऱ्यांना संधी दिली आहे. माजी केंद्रीय मंत्री राम कृपाल यादव यांना दानापूरमधून तिकीट दिले आहे. वर्षी लोकसभा निवडणुकीत पाटलीपुत्र मतदारसंघातून त्यांना राजदच्या मीसा भारती यांनी मोठ्या मताधिक्यांनी पराभूत केले होते. दानापूरमध्ये त्यांची लढत राजदचे विद्यमान आमदार ऋतलाल यादव यांच्याशी होणार आहे. भाजपने पहिल्या यादीत ९ महिलांना संधी दिली आहे. यामध्ये रेणू देवी (बेतिया), गायत्री देवी (परीहार), निशा सिंह (प्राणपूर), देवांती यादव (नरपतगंज), स्वीटी सिंह (किशनगंज), कविता देवी (कोरहा–अनु.जाती), अरुणा देवी (वरसलीगंज), श्रेयसी सिंह (जमुई) आणि राम निषाद (औराई) यांचा समावेश आहे.
भाजपने जातीय संतुलन राखण्यावर विशेष भर दिला आहे. अनुसूचित जातीसाठी राखीव नऊ जागांवर उमेदवार उतरवले आहेत. इतर मागासवर्गीय आणि अति मागास समुदायातील उमेदवारांनाही संधी दिली आहे. यंदाची निवडणूक चुरशीची होण्याची शक्यता असल्याने त्यात कोण बाजी मारते, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
- प्रदीप जोशी