
पर्यटनाच्या नावाखाली गोव्यात किनारी भागात सुरू असलेली अंदाधुंदी नेहमीच चर्चेत असते. बेकायदा बांधकामांसह परवाने नसताना सुरू असलेली अनेक आस्थापने किनारी भागात आहेत. गोमंतकीयांनी आपल्या मालमत्ता भाड्याने देऊन परप्रांतियांना किनारपट्ट्याच आंदण दिल्या आहेत. शॅकचा परवाना घ्यायचा आणि बाहेरच्या व्यावसायिकांना तो चालवायला द्यायचा. जेवढी जागा असेल त्यावर नाईट क्लब, स्पा, ज्यूस सेंटर यासारखे धंदे थाटण्यासाठी राज्याबाहेरील व्यावसायिकांना भाड्याने द्यायची. त्यातून नंतर सुरू होतो सरकारी परवान्यांचा व्यवहार. परवाने नाही मिळाले तरीही संबंधित यंत्रणांना हाताशी धरून बिनदिक्कतपणे आपला व्यवसाय चालवायचा. पेडणे, बार्देश तालुक्यांतील किनारी भागांत असे अनेक अवैध व्यवसाय अशाच पद्धतीने सुरू आहेत. आजच्या घडीला सरकारने परवाने तपासण्याची मोहीम उघडली तरीही पन्नास टक्क्यांपेक्षा जास्त व्यवसाय अवैध सापडतील. अवैध व्यवसायांवर कारवाई करण्यापेक्षा त्यातून आपल्याला कसा फायदा होईल, त्याचा विचार करून नंतर 'सेटिंग' करणारेही अनेकजण आहेत. सगळ्यांचे हप्ते ठरतात. हे काम झाले की हे व्यावसायिकही नंतर कुठल्या नोटिसा आणि तक्रारींना जुमानत नाहीत. कोणी आलेच कारवाई करायला तर लगेच स्थगितीसाठी दाद मागायला जातात. कितीतरी क्लब ड्रग्समुळे चर्चेत आहेत. काही वेश्या व्यवसायासाठी तर काही क्लब सरकारचे आवश्यक परवाने नसताना सुरू असतात. हडफडेत ‘बर्च बाय रोमिओ लेन’ क्लबमध्ये जो मृत्यूचा तांडव घडला, त्याला ते सर्वजण जबाबदार आहेत, ज्यांनी या अवैध क्लबकडून आतापर्यंत हप्ते खाल्ले. ते सर्व राजकारणी, अधिकारी, सरकारी यंत्रणा जबाबदार आहेत, ज्यांनी या बेकायदा सुरू असलेल्या क्लबला आशीर्वाद दिला. ज्या २५ लोकांचा बळी गेला, जे लोक होरपळून मेले, गुदमरून मेले त्यांना वाचवता येण्यासारखीही तिथली स्थिती नव्हती, यावरून हा क्लब कसा चालत होता त्याची कल्पनाच करावी. जी दुर्घटना घडली आहे त्या निमित्ताने तरी सर्व सरकारी यंत्रणांनी त्वरित गोव्यातील अशा व्यवसायांची वैधता तपासावी. जे व्यवसाय बेकायदा पद्धतीने सुरू आहेत, ते त्वरित बंद करावेत. प्रसंगी बांधकामेच पाडून टाकावी. या घटनेतून बोध घेऊन गोव्यातील पर्यटन व्यवसायात अंदाधुंद कारभार नियंत्रणात आणावा.