
हडफडे येथील बर्च बाय रोमियो लेन नाईट क्लबमध्ये शनिवारी रात्री ११.४५ वा.च्या सुमारास भीषण आग लागली, आणि त्यात २५ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आणि ६ जण जखमी झाले. मृतांमध्ये ४ पर्यटक आणि १४ कर्मचारी होते, असे समोर आले आहे.
सोशल मीडियावर प्रसारित झालेल्या एका व्हिडिओमध्ये एक बेली डान्सर स्टेजवर नृत्य सादर करत असताना छताला अचानक आग लागल्याचे समोर आले. त्यावेळी नृत्य बंद करून तिथे जमलेले बाहेर धावले. याच दरम्यान ही आग वेगाने संपूर्ण क्लबमध्ये पसरली आणि त्यात १४ कर्मचाऱ्यांसह २५ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेमुळे अनेक प्रश्न समोर आले आहे. २५ मृत्यू हा केवळ आकडा नसून त्यात २५ कुटुंबे उद्ध्वस्त झाली आहेत. या घटनेनंतर मयताच्या कुटुंबीयांना सर्वतोपरी मदत सरकारकडून देण्यात येणार आहे. मात्र त्या अधिकाऱ्यांच्या निष्काळजीपणाबद्दल काय कारवाई होणार, हे महत्त्वाचे आहे. अशा आस्थापनांना स्थानिक पंचायत, जिल्हाधिकारी कार्यालय, गोवा राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळ, पंचायत संचालनालय, गोवा किनारी क्षेत्रीय व्यवस्थापन प्राधिकरण, नगर नियोजन खाते, आरोग्य खाते, वीज खाते, अग्निशामक दल अशा अनेक यंत्रणांची परवानगी आवश्यक असते. असे असूनही अशा घटना घडल्यानंतर प्रत्येक यंत्रणा जबाबदारी झटकते आणि दुसऱ्या यंत्रणेवर ढकलते, असे दिसून येते. नाईट क्लबकडे कोणतेही परवाने नव्हते, असा दावा करण्यात आला. असे असताना त्यांना वीज पुरवठा तसेच इतर सुविधा कशा मिळाल्या, तसेच संबंधित क्लब जमीनदोस्त करण्याचा आदेश दिला होता. त्यानंतर पंचायत संचालनालयाने त्या आदेशाला स्थगिती दिली असल्याचे बोलले जात आहे. तर या आदेशाला स्थानिक यंत्रणांनी न्यायालयात किंवा इतर प्राधिकरणाकडे आव्हान का दिले नाही. तसेच क्लब सुरू असल्यामुळे स्थानिक यंत्रणेसह इतर यंत्रणांचा त्यास छुपा पाठिंबा असल्याचे समोर येत आहे.
राज्यातील सर्व नाइट क्लब्स, रिसॉर्ट्स, हॉटेल्स, रेस्टॉरंट, कॅसिनो यांचे तातडीने फायर ऑडिट, स्ट्रक्चरल ऑडिट आणि परवान्याची पुन्हा छाननी होणे अत्यावश्यक आहे. नियम मोडणाऱ्यांचे परवाने तत्काळ रद्द केले पाहिजेत. दरम्यान सरकारने काही कठोर निर्णय घेण्याची आवश्यकता आहे. त्यात सर्व आस्थापनांना अग्निशमन दलाचा ना हरकत परवाना सक्तीचा करावा. त्यात कोणत्याही मर्यादा लागू करू नये. तसेच अग्निशमन दलाकडून ऑडिट झाल्यानंतर आणि ना हरकत परवान्यानंतर आस्थापनांना स्थानिक प्रशासनाकडून परवाना जारी करावा. तात्पुरत्या परवान्याचा प्रकार बंद करावा. अशा काही कठोर निर्णयांची आवश्यकता आहे.
- प्रसाद शेट काणकोणकर