यून्नान : चीनच्या सांस्कृतिक विकासाचे केंद्र

Story: विश्वरंग |
05th December, 10:25 pm
यून्नान : चीनच्या सांस्कृतिक विकासाचे केंद्र

चीनच्या नैऋत्य भागात असलेला यून्नान प्रांत हा ‘रंग-बिरंग्या ढगांचे दक्षिण’ या नावाने ओळखला जातो. म्यानमार, लाओस आणि व्हिएतनाम या देशांनी वेढलेला हा प्रदेश भौगोलिक विविधता आणि नैसर्गिक साधनसंपत्तीने समृद्ध आहे. उंच पर्वत, स्वच्छ नदी खोरे, वर्षभर वसंत ऋतूचे सुखद हवामान आणि जमिनीखालील नैसर्गिक संसाधनांमुळे यून्नान चीनमधील एक अनोखा प्रदेश ठरला आहे. यून्नान केवळ निसर्गाची देणगी नाही, तर चीनच्या सांस्कृतिक वारशाचे केंद्र देखील आहे.

चीनच्या ५६ वांशिक समूहांपैकी २६ समूह पिढ्यानपिढ्या येथे वास्तव्यास आहेत. याच विविधतेमुळे यून्नान सांस्कृतिक पर्यटन, ग्रामीण विकास आणि पारंपरिक जीवनशैलीला आधुनिकतेशी जोडण्याचे प्रमुख केंद्र बनले आहे. यून्नानमधील वेंडिंग गाव हे ‘वा’ समुदायाची सर्वात जतन केलेली वस्ती मानली जाते. सुमारे ४०० वर्षांपूर्वी हे गाव बाहेरील जगापासून जवळजवळ तुटलेले होते, मात्र पर्यटनाच्या वाढीमुळे या गावाचा आर्थिक विकास होऊ लागला आहे. रोजगाराच्या शोधात शहरांकडे गेलेले तरुण आता गावात परतले असून, ते टूर गाइड बनले आहेत आणि जगाला आपला अनोखा इतिहास आणि संस्कृती दाखवत आहेत. वा समुदायाची वुड ड्रम सेरेमनी हे येथील मुख्य आकर्षण आहे. हा एक पवित्र विधी आहे, ज्याच्या ध्वनीला ईश्वरीय शक्तीचे प्रतीक मानले जाते. ही प्राचीन परंपरा पर्यटक जवळून अनुभवू शकतील यासाठी आता दररोज आयोजित केली जाते. आधुनिकीकरण गावात पोहोचले असले तरी, समुदाय आपली पारंपरिक घरे, चालीरीती आणि सण जतन करण्यासाठी कटिबद्ध आहे. हे संतुलन आज वेंडिंगची सर्वात मोठी ताकद बनली आहे.

येथील बाओजांग गाव, जे पारंपरिक चिनी औषधी ‘टियानमा’च्या लागवडीसाठी प्रसिद्ध आहे. २००० वर्षांपासून या औषधीचा उपयोग आरोग्यासाठी केला जात आहे आणि बाजारात तिची मोठी मागणी आहे. गावातील लोक टियानमाची लागवड जंगलासारख्या नैसर्गिक वातावरणात करतात, ज्यामुळे त्याची गुणवत्ता उत्कृष्ट राहते. टियानमाच्या शेतीमुळे गावाचे उत्पन्न वाढले आहे आणि लोक आता गॅनडर्मासारख्या नवीन औषधी पिकांकडे वळत आहेत. चांगल्या रस्त्या, वीज, स्वच्छ वातावरण आणि पर्यटनामुळे बाओजांग गाव शाश्वत आणि आधुनिक विकासाचे उत्कृष्ट उदाहरण बनले आहे.

- सुदेश दळवी