पणजी: म्हादई आणि आसपासचा परिसर राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणाच्या (एनटीसीए) शिफारसीनुसार व्याघ्र क्षेत्र म्हणून अधिसूचित झाल्यास त्याचे जनजीवनावर काय परिणाम होतील, यावर चर्चा करण्यासाठी आज सायंकाळपासून महत्त्वाच्या बैठकांना सुरुवात होणार आहे. सर्वोच्च न्यायालयाने नियुक्त केलेल्या तज्ज्ञ समितीसमोर (सीईसी) समस्या, सूचना आणि हरकती मांडण्याची संधी पाच मतदारसंघातील लोकप्रतिनिधी आणि निवडक ग्रामस्थांना मिळणार आहे.
गोव्यात आज आणि उद्या (१६ व १७ ऑक्टोबर) असे दोन दिवस ही तज्ज्ञ समिती अभ्यास दौरा करणार आहे.सर्वोच्च न्यायालयाने नेमलेल्या या तज्ज्ञ समितीचे सदस्य चंद्रप्रकाश गोयल आणि सुनिल लिमये हे लोकांशी थेट चर्चा करून आपला अहवाल सादर करणार आहेत. या बैठकांमध्ये सावर्डे, वाळपई, काणकोण, सांगे व पर्ये या पाच मतदारसंघातील लोकप्रतिनिधी, सरकारी अधिकारी आणि ग्रामस्थांच्या समस्या ऐकल्या जाणार आहेत.
म्हादई आणि आसपासचा परिसर व्याघ्र क्षेत्र म्हणून अधिसूचित करण्यास गोवा सरकारचा विरोध आहे. सरकारने उच्च न्यायालयाच्या निवाड्याला सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. या आव्हान याचिकेच्या संदर्भात लोकांशी चर्चा करणे आणि एकंदर अभ्यास करून अहवाल सादर करणे, यासाठीच सर्वोच्च न्यायालयाने ही तज्ज्ञ समिती नेमली आहे. सरकारीअधिकारी, लोकप्रतिनिधी आणि ग्रामस्थांच्या समस्या व सूचना ऐकल्यानंतर तज्ज्ञ समिती (सीईसी ) आपला अहवाल थेट सर्वोच्च न्यायालयाला सादर करणार असल्याने आजच्या बैठकांना विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.