रामा काणकोणकर हल्ला प्रकरण: जेनिटोच्या वकिलाचा युक्तिवाद
पणजी : सामाजिक कार्यकर्ते रामा काणकोणकर यांच्यावर झालेल्या प्राणघातक हल्ल्याप्रकरणी अटकेत असलेल्या सराईत गुंड जेनिटो कार्दोझ याच्या जामीन अर्जावर शुक्रवारी १७ ऑक्टोबर रोजी न्यायालयात सुनावणी झाली. यावेळी जेनिटोचे वकील मायकल नाझारेथ यांनी महत्त्वपूर्ण युक्तिवाद केला.
वकील नाझारेथ यांनी न्यायालयासमोर मांडले की, रामा काणकोणकर यांनी पोलिसांना दिलेल्या जबाबात जेनिटो कार्दोझचा उल्लेख केलेला नाही. तसेच, तो सत्य काय ते सांगणार असल्यामुळे जेनिटोने यापूर्वी अटकपूर्व जामीन अर्ज दाखल केला नव्हता, असेही त्यांनी सांगितले.
१८ सप्टेंबर रोजी करंझाळे येथे रामा काणकोणकर यांच्यावर प्राणघातक हल्ला झाला होता. या प्रकरणी पणजी पोलिसांनी गुन्हा दाखल करून झेनिटो कार्दोझसह आठ जणांना अटक केली होती. न्यायालयाने प्रथम सर्व संशयितांना पोलीस कोठडी ठोठावली, त्यानंतर त्यांची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली.
२ ऑक्टोबर रोजी रामा काणकोणकर यांनी पोलिसांना दिलेल्या जबाबात, मिंगेल आरावजो (mingel aroujo) हा आपला पाठलाग करत असल्याचे आणि मारहाण करताना हल्लेखोरांनी आपल्याला 'गावडा' आणि 'राखणदार' असे जातीयवाचक शब्द वापरल्याचे सांगितले. या जबाबाची दखल घेऊन पोलिसांनी गुन्ह्यात अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती (छळ प्रतिबंध) कायद्याअंतर्गत कलम जोडले. त्यानंतर हे प्रकरण पोलीस उपअधीक्षक सुदेश नाईक यांच्याकडे तपासासाठी देण्यात आले. याच पार्श्वभूमीवर जेनिटोने न्यायालयात जामीन अर्ज दाखल केला आहे. या जामीन अर्जावर सायंकाळी सरकारी अभियोक्ता रॉय डिसोझा हे सरकारची बाजू मांडून युक्तिवाद करणार आहेत.
सक्तमजुरीच्या शिक्षेविरोधात सर्वोच्च न्यायालयात आव्हान
जेनिटो कार्दोझ याच्यावर असलेले जून प्रकरण देखील या निमित्ताने चर्चेत आले आहे. शिरदोण समुद्रकिनाऱ्यावर १० मे २००९ रोजी झालेल्या झटापटीत संतोष कालेल आणि फ्रान्सिस मॅन्युएल डिसोझा ऊर्फ मिरांड यांचा मृत्यू झाला होता. या प्रकरणी सत्र न्यायालयाने जेनिटो कार्दोझसह सचिन पाडगावकर आणि प्रसाद कुबल या तिघांना सुनावलेली तीन वर्षांची सक्तमजुरीची शिक्षा गोवास्थित मुंबई उच्च न्यायालयाने कायम ठेवली होती. या शिक्षेविरोधात जेनिटो कार्दोझने सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले आहे.