दोघा संशयितांच्या आवळल्या मुसक्या
वेर्णा : वेर्णा (verna) पोलिसांनी एका चोरीच्या प्रकरणाचा केवळ २४ तासांत छडा लावत दोन संशयितांना अटक केली आहे. या आरोपींकडून चोरीचे तब्बल ४४ मोबाईल फोन (theft cases) आणि इतर साहित्य जप्त करण्यात आले. संघटित पद्धतीने मजुरांच्या खोल्यांत चोरी करणाऱ्या या टोळीच्या अटकेमुळे वेर्णा आणि आसपासच्या परिसरातील मजुरांना मोठा दिलासा मिळाला आहे.
२४ तासांत गुन्ह्याचा उलगडा
श्रीचंद निसाद (२३, मूळ उत्तर प्रदेश, सध्या वेर्णा) याने वेर्णा पोलिसांत तक्रार दाखल केली होती. १५ ऑक्टोबरच्या मध्यरात्री १२.३० ते पहाटे ४.३० वाजण्याच्या दरम्यान, वेर्णा, जुने म्हार्दोळ येथील महालसा मंदिराशेजारील त्यांच्या भाड्याच्या खोलीत अज्ञात व्यक्तींनी प्रवेश करून त्यांचे आणि त्यांच्या सोबत वास्तव्यास असलेल्याचे तीन मोबाईल फोन चोरले. यात सुमारे ३०,००० रुपयांचे नुकसान झाले होते. या तक्रारीवरून वेर्णा पोलिसांनी गुन्हा दाखल करून, पोलीस निरीक्षक आनंद शिरोडकर यांच्या नेतृत्वाखालील पथकाने तातडीने तपास सुरू केला.
आगशीमधून आरोपींना अटक
पोलिसांनी तांत्रिक पाळत (Technical Surveillance) आणि मोबाईल ट्रॅकिंगच्या आधारे संशयितांचा माग काढला. संशयित अगासई येथील एका भाड्याच्या खोलीत असल्याचे निष्पन्न झाले. पोलिसांनी बनमाली प्रधान (२५) आणि कुमार बेहरा (२६) या ओडिशाच्या केंन्द्रापारा जिल्ह्यातील आणि सध्या आगशी येथे राहणाऱ्या दोघा संशयितांना ताब्यात घेतले. पोलिसांच्या कसून केलेल्या चौकशीत या दोघांनीही चोरी केल्याची कबुली दिली. त्यानंतर त्यांच्या खोलीची झडती घेतली असता, त्यांच्याकडून चोरी केलेले तब्बल ४४ मोबाईल फोन, एक बॅग आणि दोन सिम इजेक्टर पिन्स जप्त करण्यात आल्या.
मजुरांच्या बंद खोल्यांवर होते लक्ष्य
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हे आरोपी रात्रीच्या वेळी मजुरांच्या भाड्याच्या खोल्या लक्ष्य करत असत. दरवाजा उघडा असलेल्या खोल्यांमध्ये प्रवेश करून आत ठेवलेले मोबाईल चोरत असत. त्यांच्या या संघटित कार्यपद्धतीमुळे पोलिसांनी गुन्हा नोंद करताना भारतीय न्याय संहितेचे (BNS) कलम ११२ जोडले आहे. दोघा संशयितांना चौकशीनंतर अटक करण्यात आली असून, दक्षिण गोवा पोलीस अधीक्षक (SP SOUTH) टिकम सिंह वर्मा, उपअधीक्षक (DySP) गुरुदास कदम यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच पोलीस निरीक्षक (PI) आनंद शिरोडकर यांच्या नेतृत्त्वाखालील पथक पुढील तपास सुरू आहे.