सासष्टीत युनिटसची तपासणी : एका युनिटला पाच हजारांचा दंड
मडगाव : दिवाळी उत्सवाच्या पार्श्वभूमीवर दक्षिण गोव्यातील खाद्यपदार्थ उत्पादक युनिटची अन्न व औषध खात्याकडून (Food & Drugs) तपासणी करण्यात येत आहे. यात दवर्लीत गाडीत ठेवण्यात आलेली 78 हजारांची मिठाई जप्त करत नष्ट केली. याशिवाय चार युनिटची तपासणी करत एका युनिटला अस्वच्छतेसाठी दंड करण्यात आला. याशिवाय नुवे येथे 32 हजारांचा मावा जप्त करण्यात आला.
अन्न व औषध खात्याच्या अधिक़ार्यांकडून उत्सवाच्या काळात चांगले खाद्यपदार्थ नागरिकांना मिळावे यासाठी पदार्थ बनवणार्या युनिटसची तपासणी केली जात आहे. गुरुवारी दवर्ली येथे स्थानिक मिठाई उत्पादकांना मावा पुरवठा करणार्या वाहनाची तपासणी करण्यात आली असता दुधाच्या उत्पादनांसाठी आवश्यक योग्य साठवणुकीची सोय दिसून आली नाही. कलाकंद, बर्फी व इतर मिठाईंच्या पिशव्यांवर आवश्यक माहितीची नोंद नव्हती. अन्न व औषध खात्याने कलाकंदच्या प्रत्येकी 10 किलोच्या 5 पिशव्या, बर्फीच्या प्रत्येकी 10 किलोच्या 7 पिशव्या यासह इतर मिठाईंच्या 5 किलोच्या 6 पिशव्या अशा 78 हजारांचा माल जप्त करत नष्ट करण्यात आला. या मिठाईंच्या पिशव्यांवर कालबाह्य तारीख होत्या. उल्लेख करण्यात आलेला एफएसएसएआय परवाना क्रमांक निष्क्रीय असल्याचेही आढळून आले होते. याशिवाय स्वच्छता आणि स्वच्छताविषयक परिस्थिती तपासण्यासाठी 4 खाद्यपदार्थ उत्पादन युनिट्सची तपासणी करण्यात आली. यावेळी तपासणीसाठी नमुने घेण्यात आले. एका ठिकाणी अस्वच्छ परिस्थितीत काम सुरू असल्याने सदर युनिटला पाच हजारांचा दंड ठोठावण्यात आला.
यानंतर नुवे परिसरातील उत्पादन युनिटची तपासणी करण्यात आली. यावेळी योग्य लेबल्स नसलेल्या, कालबाह्य तारीख असलेला सुमारे 32 हजार रुपये किमतीचा 10 किलो मावा जप्त करण्यात आला व हा साठा नष्ट करण्यात आला. या कारवाईत अन्न व औषध खात्याच्या अधिक़ारी संज्योत कुडाळकर, प्रिया देसाई, झेनिया रोझारिओ, माधव कवळेकर, प्रदीक्षा चोपडेकर, स्नेहा नाईक, अमरदीप गावडे व गौरेश गावकर यांनी ही कारवाई केली