फिडे वर्ल्ड कप २०२५ च्या लोगो, गीताचे अनावरण
पणजी : विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास विकसित करण्यासाठी आणि रणनीती शिकविण्यासाठी राज्य सरकार शालेय आणि महाविद्यालयीन अभ्यासक्रमात बुद्धिबळाचा समावेश करणार आहे, असे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी सांगितले. मंगळवारी कांपाल येथे फिडे वर्ल्ड कप २०२५ चे (Fide World Cup 2025) लोगो आणि गीताचे अनावरण करण्यात आले. या आंतरराष्ट्रीय (International ) स्पर्धेमुळे पर्यटन (Tourism) वाढेल आणि जागतिक ओळख बळकट होऊन राज्याच्या अर्थव्यवस्थेला चालना मिळेल, असेही त्यांनी म्हटले.
फिडे वर्ल्ड कप २०२५ ही आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ स्पर्धा २७ ऑक्टोबर ते २७ नोव्हेंबर या कालावधीत भारतात होणार असून, गोवा हे या स्पर्धेचे यजमान राज्य आहे. मंगळवारी कांपाल येथील क्रीडा संकुलात फिडे वर्ल्ड कपाचे लोगो आणि गीताचे अनावरण करण्यात आले. या वेळी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, क्रीडामंत्री रमेश तवडकर, मुख्य सचिव डॉ. व्ही. कांदावेलू, अखिल भारतीय बुद्धिबळ महासंघाचे अध्यक्ष नितीन नारंग, गोवा बुद्धिबळ संघटनेचे अध्यक्ष महेश कांदोळकर आणि क्रीडा संचालक अजय गावडे उपस्थित होते.
२३ वर्षांनंतर फिडे वर्ल्ड कप पुन्हा भारतात आयोजित होत आहे, आणि २०२५ मध्ये गोवा या प्रतिष्ठित स्पर्धेचे यजमानपद भूषवणार आहे. हे राज्य आणि देश दोघांसाठीही अभिमानाचे पाऊल आहे,” असे मुख्यमंत्री सावंत म्हणाले.
गोवा आणि बुद्धिबळात समानता
गोवा आणि बुद्धिबळामध्ये बरीच समानता आहे. गोव्याला भेट देणाऱ्यांना हे ठिकाण केवळ समुद्रकिनाऱ्यांचे नव्हे, तर ज्ञानाचे केंद्र वाटते. त्यामुळे राज्यात आम्ही शाळा आणि महाविद्यालयांमध्ये बुद्धिबळाला प्रोत्साहन देऊन विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास निर्माण करण्यावर आणि रणनीती शिकविण्यावर भर देत आहोत,” असे मुख्यमंत्री सावंत यांनी सांगितले.
मुख्यमंत्री पुढे म्हणाले की, “या स्पर्धेमुळे राज्यात पर्यटनाला चालना मिळेल, आंतरराष्ट्रीय पातळीवरील ओळख मजबूत होईल, आणि यामुळे गोव्याच्या स्थानिक अर्थव्यवस्थेला निश्चितच लाभ होईल. या कार्यक्रमाचे उद्घाटन हे जणू बुद्धिबळातील पहिली चाल आहे. ही स्पर्धा यशस्वी होईलच, आणि तिचे नाव जागतिक स्तरावर झळकून राहील, असा मला विश्वास आहे.”
खेळाडूंना सहभागाचे आवाहन
गोव्यात अनेक उत्कृष्ट बुद्धिबळपटू निर्माण झाले आहेत, आणि ते पुढेही आपली परंपरा कायम ठेवतील. या स्पर्धेत तरुण आणि प्रतिभावान खेळाडूंनी सहभागी व्हावे, तसेच बुद्धिबळप्रेमी पालकांनी आपल्या मुलांसह या अनुभवाचा लाभ घ्यावा, असे आवाहनही मुख्यमंत्री सावंत यांनी केले.