पोलिसांनी घेतली सीसीटीव्ही फूटेज ताब्यात
वाळपई : होंडा (Honda) येथे नरकासुराच्या (Narkasur) वेळी कर्णकर्कश आवाजाची तक्रार केल्याचा राग मनात धरून जमावाने पोलीस (Police) चौकीसमोरच तक्रारदाराची कार पेटवून दिली. सुमारे २०० जणांच्या या संतप्त जमावाने पोलीस चौकीवर दगडफेकही केली. या गंभीर प्रकरणाची मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दखल घेतली आहे.
होंडा येथील रुपेश पोके यांनी १९ ऑक्टोबर रोजी रात्री कर्ण कर्कश आवाजाबाबत तक्रार केली होती. याचा राग मनात धरून जमावाने मध्यरात्री होंडा पोलीस चौकीवर हल्ला केला व पोके यांना जीवे मारण्याची धमकी दिली. त्यांनी पोके यांची स्विफ्ट डिझायर कार पेटवली. या जमावात स्थानिक सरपंच शिवदास माडकर आणि पंच कृष्णा गावकर यांचाही समावेश असल्याचा आरोप पोके यांनी तक्रारीत केला आहे.
कठोर कारवाईचे निर्देश
पोलीस चौकीसमोर कारला आग लावण्यासारखे प्रकार सरकार सहन करणार नाही. याप्रकरणी दोन-तीन जणांना ताब्यात घेतले असून, कठोर कारवाई केली जाईल, असा इशारा मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिला आहे. दरम्यान, पोके यांनी सरपंचाच्या बेकायदेशीर बांधकामाविरोधात पूर्वी तक्रार केल्याचा राग या हल्ल्यामागे असल्याचा संशय व्यक्त केला आहे.
पोलिसांनी घेतली सीसीटीव्ही ताब्यात
दरम्यान, या घटनेचे तीव्र पडसाद उमटले असून, पोलिसांनी घटनास्थळ परिसरातील सीसीटीव्ही कॅमेरे ताब्यात घेतले आहेत. पोलीस अधीक्षकांनी याठिकाणी जाऊन पाहणी करून तपासासंदर्भात आवश्यक सूचना पोलीस अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. सीसीटीव्ही कॅमेऱ्यात काहीजणांचे चेहरे झळकले असून, त्यांची ओळख ही पटली आहे. याप्रकरणी काहीजणांना संध्याकाळी उशीरा पर्यंत अटक करण्यात येणार असल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली.