कासवांचे पर्यावरणीय आणि सांस्कृतिक दोन्ही दृष्टीने मोठे महत्त्व आहे. मात्र सध्या प्रदूषण, शिकारी आणि किनाऱ्यांवरील विकासकामांमुळे त्यांचे अस्तित्व धोक्यात आले आहे. वाढते समुद्रप्रदूषण, प्लास्टिकचा कचरा आणि किनारी भागांतील अतिक्रमण यामुळे कासवांच्या अस्तित्वाला धोका निर्माण झाला आहे.

भारत हा विविध प्रकारच्या कासवांचा अधिवास असलेला देश आहे. येथे समुद्री, गोड्या पाण्यातील आणि जमिनीवर राहणारे अशा तिन्ही प्रकारच्या कासवांच्या प्रजाती आढळतात. भारतात सुमारे २६ प्रजातींचे कासव आढळतात. त्यापैकी काही प्रजाती ह्या अत्यंत दुर्मीळ आहेत.
समुद्री कासवांमध्ये ऑलिव्ह रिडले कासव सर्वाधिक प्रसिद्ध आहेत. ही प्रजाती प्रामुख्याने गोव्यातील समुद्रकिनाऱ्यांवर अंडी घालण्यासाठी येते. याशिवाय भारताच्या किनाऱ्यांवर ग्रीन टर्टल, हॉक्सबिल टर्टल, लेदरबॅक टर्टल आणि लॉगरहेड टर्टल या समुद्री कासवांच्या प्रजातीही आढळतात. इंडियन फ्लॅपशेल टर्टल, इंडियन टेंट टर्टल आणि ब्लॅक स्पॉटेड पाँड टर्टल या गोड्या पाण्यातील प्रमुख प्रजाती. ही कासवे जलाशयांची स्वच्छता राखण्यात मदत करतात. जमिनीवर राहणाऱ्या कासावांमध्ये इंडियन स्टार टॉर्टईजचा समावेश होतो.
मराठी भाषेत जरी सर्व प्रजातींना कासव म्हणूनच संबोधत असले तरी इंग्रजीमध्ये यांची नावे वेगवेगळी आहेत. जमिनीवर राहणाऱ्या कासवांना टॉरटॉइज तर पाण्यात राहणाऱ्या कासवांना टर्टल असे म्हटले जाते. टॉरटॉइज आणि टर्टलच्या राहणीमान व शारीरिक रचनेत फरक असतो. टर्टल प्रामुख्याने पाण्यात राहतात, तर टॉरटॉइज आपला अधिकतर काळ जमिनीवर घालवतात. टर्टलला पोहण्यासाठी फिन्ससारखे (पंखांसारखे) पाय असतात. टॉरटॉइजला चालण्यासाठी जाड आणि मजबूत पाय असतात. त्यांची मादी जमिनीवरच म्हणजेच किनाऱ्यावर अंडी घालते आणि परत पाण्यात जाते. टॉरटॉइज हे प्रामुख्याने गवत, पाने, फळे खातात. टर्टल मासे, शैवाल, कीटक वगैरे खातात. त्याची मादी जमिनीवरच खड्डा करून अंडी घालते. टर्टलचे कवच गुळगुळीत आणि सपाट असते, जे त्यांना पोहायला मदत करते. टॉरटॉइजचे कवच जाड आणि गोलसर असते, जे त्यांना जमिनीवर संरक्षण देते. टर्टलचे पाय पोहण्यासाठी पडसरी असतात, तर टॉरटॉइजचे पाय मजबूत आणि चालण्यासाठी योग्य असतात.
भारतीय संस्कृतीत कासवाला (कुर्म) पूजनीय स्थान आहे. हिंदू धर्मग्रंथांनुसार कासवाला स्थैर्य, धैर्य आणि धीराचे प्रतीक मानले जाते. समुद्रमंथनाच्या वेळी भगवान विष्णूंनी कुर्मावतार धारण करून मंदार पर्वताला आपल्या पाठीवर आधार दिला होता, असे पुराणकथेत सांगितले जाते. मंदिरांच्या वास्तुशास्त्रातही कासवाचा विशेष उल्लेख आहे. अनेक प्राचीन मंदिरांच्या तळाशी किंवा प्रवेशद्वाराजवळ आपल्याला अनेकवेळा दगडी कासव कोरलेले आढळते. काही ठिकाणी कासवाला लक्ष्मीचे वाहन मानून त्याची पूजा केली जाते.
कासव निसर्गातील अत्यंत महत्त्वाचे आणि उपयुक्त जीव आहेत. ते १०० वर्षांपेक्षा जास्त आयुष्य जगू शकतात. समुद्र, नद्या आणि गोड्या पाण्यात राहणारी ही प्रजाती परिसंस्थेतील संतुलन राखण्यात मोलाची भूमिका बजावते. समुद्री कासव समुद्रातील शेवाळ, जेलिफिश आणि इतर सूक्ष्म जीव खातात, ज्यामुळे समुद्राचे आरोग्य टिकून राहते. गोड्या पाण्यातील कासव सडलेली पाने, मृत जलचर आणि कचरा खाऊन पाणी स्वच्छ ठेवण्यास मदत करतात.
कासव हा अन्नसाखळीचा महत्त्वाचा घटक आहे. ते मातीची सुपिकता वाढवण्यास मदत करतात. काही प्रजाती किनाऱ्यांवर अंडी घालतात आणि त्यातून उरलेली अंडी किंवा कवच मातीला पोषण देतात. त्यामुळे किनारपट्टीवरील वनस्पतींची वाढ सुलभ होते. कासवाचं लिंग तापमानावर ठरतं. अंडी उबवताना तापमान जास्त असेल तर मादी, कमी असेल तर नर कासव जन्माला येतो.
कासवांचे पर्यावरणीय आणि सांस्कृतिक दोन्ही दृष्टीने मोठे महत्त्व आहे. मात्र सध्या प्रदूषण, शिकारी, आणि किनाऱ्यांवरील विकासकामांमुळे त्यांचे अस्तित्व धोक्यात आले आहे. वाढते समुद्रप्रदूषण, प्लास्टिकचा कचरा आणि किनारी भागांतील अतिक्रमण यामुळे कासवांच्या अस्तित्वाला धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे कासवांचे संरक्षण करणे ही केवळ जैवविविधतेसाठीच नव्हे, तर संपूर्ण पर्यावरणाच्या आरोग्यासाठी आवश्यक आहे. पर्यावरणातील संतुलन राखण्यासाठी कासवांचे अस्तित्व अमूल्य आहे.

- स्त्रिग्धरा नाईक
(लेखिका विद्युत अभियांत्रिकीच्या प्राध्यापिका आहेत.)