गोडाधोडाचं खाल्ल्यावर...

Story: स्वस्थ रहा, मस्त रहा |
just now
गोडाधोडाचं खाल्ल्यावर...

दिवाळीत घरात वेगवेगळे गोडधोड पदार्थ दिसू लागतात. लाडू, करंजी, चकल्या, शंकरपाळे, गुलाब जामून, रसगुल्ला, पेठा, फेणोरी, पेढे त्याचप्रमाणे बाजारातील विविध मिठायांचे प्रकार बघताच तोंडाला पाणी सुटतं! हे सगळे पदार्थ इतके चविष्ट लागतात की खाण्याचा मोह आवरणं कठीण होतं. तुम्हा सर्वांना सुट्टी असल्यामुळे बिनधास्त फराळ व इतर गोड पदार्थ खायला हरकत नाही. थोडं गोड खाणं जास्त झालं तर काय करायचं ते आज जाणून घेऊया आणि त्रास होऊ नये म्हणून काय करावं ते ही समजून घेऊया. 


 फराळाचे पदार्थ चांगली भूक असेल तेव्हाच खावे. 

 सूर्यास्तानंतर गोड व तळलेले पदार्थ खाणे टाळा. 

 सुट्टी असल्यामुळे खेळायला वेळ मिळणार आहे, त्यामुळे फराळ पचवण्यासाठी शरीराची हालचाल होईल असे खेळ खेळा. 

 भरपूर फराळ खाऊन मोबाईल हातात घेऊन सोफ्यावर लोळणे टाळा. 


पोट भरलं असलं तरी आवडता पदार्थ तडीस लागेपर्यंत खाल्ल्यास गॅसेस, पोटात दुखणे, उलट्या होणे असे त्रास होऊ शकतात. असे झाल्यास काही सोपे पण फायदेशीर उपाय तुम्ही घरच्या घरी करू शकता. 


 हिंग व ओवा घालून केलेली सोलकढी प्या. सोलकढी पचनाला मदत करते. पोटातील गॅस सुद्धा कमी होतात आणि पोटदुखी थांबते. 

 अपचन होऊन जीभेची चव गेली असेल तर आल्याचा छोटासा तुकडा सैंधव मीठ लावून चावून खा, याने जीभेची चव वाढते आणि भूक सुद्धा लागते. 

 साध्या पाण्याऐवजी चमचाभर धणे अर्धा लिटर पाण्यात घालून आईकडून चांगले उकळून घ्या आणि तहान लागेल तेव्हा हे धण्याचे पाणी घोट घोट प्या. हे पाणी सुद्धा पचनास मदत करते. 

 घरीच बनवा सोपे पाचक मिश्रण

तुम्ही स्वतः घरच्या घरी अगदी सोपे पाचक तयार करू शकता.

त्यासाठी एका पातेल्यात जिरे ४ चमचे घाला, बडीशेप - ४ चमचे, धणेपूड - २ चमचे, ओवा - १/२ चमचा, सैंधव - २/३ चिमूट व तीळ १ चमचा घाला. हे सगळं चमच्याने एकत्र करा आणि एका हवाबंद डब्यात भरून ठेवा. रोज सकाळ - संध्याकाळ यातील १ छोटा चमचा मिश्रण चावून चावून खा. याने पचन सुधारेल, जीभेची चव वाढेल आणि गॅसेस सुद्धा कमी होतील. 

खूपंच जास्त गोड पदार्थ खात असाल तर शाळा सुरु होण्याआधी किमान दोन वेळा किरायतं घ्यायला विसरू नका आणि हे सगळे उपाय करून सुद्धा त्रास कमी होत नसेल तर आपल्या जवळच्या वैद्याला नक्की भेटा. 


वैद्य कृपा नाईक, आयुर्वेदाचार्य