भाजपने 'नव्या चेहऱ्यांना' संधी द्यावी : मतदारांची मागणी

वाळपई : सरकारने जिल्हा पंचायतीच्या निवडणुका जाहीर केल्यामुळे आता सत्तरी तालुक्यातील केरी, होंडा, नगरगाव आणि उसगाव या चारही मतदारसंघांत राजकीय हालचालींना वेग आला आहे. तीन विधानसभा मतदारसंघांतील चार जिल्हा पंचायत मतदारसंघात होणाऱ्या या निवडणुकीसाठी उमेदवारांची निवड करण्याचे आव्हान सर्वच राजकीय पक्षांपुढे उभे राहिले आहे.
मागील निवडणुकीत या चारही जागांवर भाजपने विजय मिळवला होता. मात्र, यंदा भाजपच्या उमेदवारीसाठी इच्छुकांमध्ये मोठी स्पर्धा निर्माण होण्याची शक्यता आहे.
भाजपला मतदारांचे थेट आव्हान
सत्तरीतील अनेक मतदारांनी आणि खुद्द भाजपच्या कार्यकर्त्यांनी पक्षाकडे एक महत्त्वपूर्ण मागणी केली आहे, ती म्हणजे, भाजपने आगामी निवडणुकीत या तिन्ही मतदारसंघांमध्ये नवीन आणि प्रामाणिकपणे काम करणाऱ्या चेहऱ्यांना संधी द्यावी.
माजी सदस्यांची कामगिरी लक्षणीय नसल्याचे मतदारांचे म्हणणे आहे. त्यामुळे भाजपने मतदारांची ही मागणी पूर्ण न केल्यास, त्याचा परिणाम पक्षाच्या प्रभावावर होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
सध्याच्या सदस्यांची कामगिरी
सध्या होंडा मतदारसंघातून सगुण वाडकर, केरीतून देवयानी गावस, नगरगावातून राजश्री काळे आणि उसगाव जिल्हा पंचायत मतदारसंघातून उमाकांत गावडे हे सदस्य कार्यरत आहेत. गेल्या पाच वर्षांत या सदस्यांनी मतदारसंघात विकासकामे केली असली तरी, ती 'लक्षणीय' स्वरूपाची नसल्याचे मतदारांचे म्हणणे आहे.
नगरगाव मतदारसंघात चुरस
नगरगाव मतदारसंघ मागील निवडणुकीत ओबीसी महिलांसाठी आरक्षित होता. यावेळी राजश्री काळे (भाजप) निवडून आल्या होत्या. यंदा हा मतदारसंघ आरक्षित राहणार नसल्याचे समजते. राजश्री काळे यांच्यापूर्वी प्रेमनाथ हजारे यांनी या मतदारसंघाचे नेतृत्व केले होते. आता पुन्हा एकदा उमेदवारी मिळवण्यासाठी अनेकांनी हालचाली सुरू केल्या आहेत. या मतदारसंघाची धुरा आमदार आणि मंत्री विश्वजीत राणे यांच्यावर राहणार आहे. नगरगाव, खोतोडा, सावर्डे आणि गुळेली या चार ग्रामपंचायतींचा यात समावेश आहे.
केरीमध्येही नवीन चेहऱ्याची मागणी
केरी मतदारसंघातून अनेक जण उमेदवारीसाठी इच्छुक आहेत. मागील निवडणुकीत भाजपतर्फे देवयानी गावस निवडून आल्या होत्या. मात्र, त्यांची कार्यक्षमता या मतदारसंघात कमी पडल्याचे मतदारांचे म्हणणे आहे. त्यामुळे येथेही भाजपने चांगल्या आणि नवीन उमेदवारांना संधी द्यावी, अशी मागणी मतदारांची आहे.
होंडा मतदारसंघात मुख्यमंत्र्यांचे लक्ष
होंडा मतदारसंघाची रचना पर्ये विधानसभा मतदारसंघाचा व साखळी विधानसभा मतदारसंघातील काही भाग मिळून झाली आहे. यामध्ये पिसुर्ले, होंडा, पर्ये (पर्ये मतदारसंघातील) आणि हरवळे (साखळी मतदारसंघातील) या चार पंचायतींचा समावेश आहे. साखळी मतदारसंघाचे नेतृत्व करणारे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या मर्जीनुसार या मतदारसंघातून उमेदवाराची निवड होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. तर उर्वरित तीन ग्रामपंचायती डॉ. दिव्या राणे यांच्या मतदारसंघात येतात. उमेदवारी मिळवण्यासाठी अनेकांनी मुख्यमंत्र्यांशी संपर्क साधला आहे.
विरोधी पक्षांकडून चाचपणी सुरू
जिल्हा पंचायत निवडणुकीसाठी आरजी (Revolutionary Goans), काँग्रेस (Congress) आणि आम आदमी पक्ष (AAP) या तिन्ही विरोधी पक्षांकडून चारही मतदारसंघात चाचपणी सुरू झाली आहे. आरजी पक्षाचे मनोज परब, काँग्रेसच्या मनीषा उजसगावकर आणि आपच्या स्थानिक नेत्यांनी मतदारसंघांचा दौरा करून गाठीभेटी घेतल्या आहेत.
विरोधी पक्ष जर सर्व जागांवर एकच आणि प्रबळ उमेदवार रिंगणात उतरवणार असतील, तर भाजपसाठी ही निवडणूक अधिक कठीण होण्याची शक्यता आहे. मात्र, भाजपने नवीन उमेदवारांना संधी दिल्यास विरोधी पक्षांना संघर्ष करावा लागेल.