बार्देशमध्ये परतीच्या पावसाने भातपीक धोक्यात; शेतकरी चिंतेत

भातशेती पाण्याखाली गेल्याने पिकाची नासाडी

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
25th October, 11:37 pm
बार्देशमध्ये परतीच्या पावसाने भातपीक धोक्यात; शेतकरी चिंतेत

म्हापसा : संततधार कोसळणार्‍या परतीच्या पावसामुळे भातपीक खराब होण्याची चिन्हे दिसत असल्याने बार्देश तालुक्यातील शेतकरी हवालदिल झाले आहे. यंदा चांगले पीक मिळण्याची शक्यता होती. मात्र, पावसामुळे मेहनतीवर पाणी सोडावे लागण्याची भीती शेतकर्‍यांनी व्यक्त केली आहे.
बार्देशमधील शेतकरी यंदा समाधानपूर्वक भातपीक मिळेल, अशी आशा धरून होते. काहींनी भात कापणी केली होती. तर काही ठिकाणी शेतातील भात कापणीसाठी तयार होते. मात्र, संततधार सुरू असलेल्या पावसामुळे भात कापणे तसेच वाळवणे देखील मिळत नाही. शेतातील भातशेत वारा पावसामुळे खाली पडले असून शेतीत पाणी साचल्याने हे भात खराब होण्याच्या मार्गावर आहे.
तर कापून झाकून ठेवलेले भात वाळवण्यासाठी आवश्यक सूर्यप्रकाश मिळत नसल्याते ते पीक सुद्धा वाया जाण्याची परिस्थिती शेतकरी वर्गावर ओढवली गेली आहे. हळदोणा, साळगाव, थिवी, शिवोली, सुकूर, पिळर्ण, पर्रा, हणजूण, अस्नोडा, कळंगुट, उसकई, मयडे, नास्नोळा व इतर भागांतील शेती पावसामुळे जास्त प्रमाणात बाधीत झाली असून शेतकरी वर्ग आर्थिक संकटात सापडला आहे.

पावसामुळे भातपीक खराब होत आहे. कापणीसाठी यंत्रसामुग्री तयार असतानाही शेतात पाणी साचल्याने कापणी करणे शक्य नाही. त्यामुळे चांगल्या उत्पन्नाची आशा धूसर झाली असून मेहनत वाया गेली आहे.
- पांडुरंग चोडणकर, शेतकरी

पावसामुळे सर्व गणित बिघडले : च्यारी
शेतकरी आत्माराम च्यारी यांनी सांगितले की, यावर्षी पीक खूप चांगले होते. पण, पावसामुळे सर्व गणित बिघडले आहे. मी भात पिकाची कापणी आधीच केली होती. परंतु पावसामुळे भात वाळवणे शक्य होत नाही. आमच्यासह इतर शेतकरी चांगल्या हवामानाची वाट पाहत आहेत. शेतीत आडवे पडलेल्या भाताला अंकूर येऊ लागले आहेत.            

हेही वाचा