सायं. ५ ते सकाळी ९ वाजेपर्यंत वीज वापरावरील अधिभार जनविरोधी

पणजी : राज्य सरकारने सायं. ५ ते सकाळी ९ या वेळेत वीज वापरावर २० टक्के अधिभार लादण्याचा निर्णय जनविरोधी आहे. यामुळे जनतेवर आर्थिक भार वाढणार आहे. ही अतिरिक्त दरवाढ त्वरित मागे न घेतल्यास रस्त्यावर येऊन आंदोलन करणार असल्याचा इशारा आप गोवा प्रदेशाध्यक्ष अमित पालेकर यांनी दिला. शनिवारी पणजीत झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी वाल्मिकी नाईक, सिद्धेश भगत उपस्थित होते.
पालेकर म्हणाले की, डिजिटल मीटर बसवल्यानंतर संध्या. ५ ते ९ यावेळेत वीज वापरासाठी अतिरिक्त २० टक्के दर द्यावे लागतील. असे करून सरकारने आता जनतेच्या खिशातच हात घातला आहे. यावेळेत लोकांनी घरातील दिवे बंद करून पणत्या लावाव्यात का याचे उत्तर सरकारने द्यावे.
इलेक्ट्रिक वाहन वापरकर्त्यांना फटका
या निर्णयामुळे इलेक्ट्रिक वाहन वापरकर्त्यांवर देखील गंभीर परिणाम होणार आहे, कारण बहुतेक लोक रात्रीच्या वेळीच कार आणि बाईक चार्ज करतात. त्यामुळे त्यांच्या खर्चात मोठी वाढ होईल, असे पालेकर यांनी स्पष्ट केले.
सिद्धेश भगत म्हणाले की, एकीकडे गोव्यातील लोकांना लुटले जात आहे. तर दुसरीकडे कर दात्यांच्या पैशांवर मंत्री सर्व सुखसोयींचा आनंद घेत आहेत.हे सरकार विजेपासून रोजगारापर्यंत प्रत्येक आघाडीवर अपयशी ठरले आहे आणि आता ते स्वतःच्या अकार्यक्षमतेची शिक्षा लोकांना देऊ इच्छित आहेत, असा घणाघाती आरोप भगत यांनी केला.