
पणजी : गोव्यात दिवाळीपासून सुरू झालेल्या बिगरमोसमी पावसाचा (Unseasonal Rain) जोर अजूनही कायम आहे. सातत्याने पडणाऱ्या पावसामुळे यंदा बिगरमोसमी पावसाचे प्रमाण सरासरीपेक्षा तब्बल ३६ टक्क्यांनी अधिक नोंदवले गेले आहे. आज राज्यात सर्वत्र पावसाने हजेरी नोंदवली आणि दिवसभर हवामान दमट राहिले. १ ऑक्टोबरपासून आत्तापर्यंत राज्यात २.६१ इंच (६६.४ मि.मी.) पावसाची नोंद झाली आहे, जे सरासरीपेक्षा ३६ टक्क्यांनी जास्त आहे.
२९ ऑक्टोबरपर्यंत 'यलो अलर्ट'
दरम्यान, हवामान खात्याने (IMD) गोव्यात २९ ऑक्टोबरपर्यंत मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली असून, त्यासाठी 'यलो अलर्ट' (Yellow Alert) जारी केला आहे. गेल्या २४ तासांत राज्यात सुमारे १ इंच (२३.३ मि.मी.) पावसाची नोंद झाली आहे. यामध्ये धारबांदोडा भागात सर्वाधिक २.६१ इंच (६६.४ मि.मी.) पावसाची नोंद झाली.
धारबांदोडानंतर काणकोण (३५.४ मि.मी.), मुरगाव (३४.२ मि.मी.) आणि पणजी (२५ मि.मी.) यांसारख्या भागांतही १ इंचापेक्षा अधिक पाऊस नोंदवला गेला आहे. यंदा मान्सूनचा हंगाम संपल्यानंतर पावसाचा जोर कमी झाला होता. मात्र, दिवाळीपूर्वीपासूनच पावसाचे प्रमाण पुन्हा वाढले. शनिवारी (मागील २४ तासांत) सर्वाधिक, म्हणजे सुमारे तीन इंच पावसाची नोंद झाली होती.