क्रीडा। नागालँडला ८३ धावांनी नमवत गोव्याचा सलग तिसरा विजय

कर्णधार दर्शन मिसाळ ठरला सामनावीर

Story: क्रीडा प्रतिनिधी। गोवन वार्ता |
29th October, 09:55 pm
क्रीडा। नागालँडला ८३ धावांनी नमवत गोव्याचा सलग तिसरा विजय

पणजी : रणजी चषक प्लेट २०२४-२५ गटात गोव्याने सलग तिसऱ्या विजयाची नोंद केली. नागालँडविरुद्ध झालेल्या तिसऱ्या सामन्यात यजमान गोव्याने ८३ धावांनी विजय मिळवला. कर्णधार दर्शन मिसाळला सामनावीर म्हणून निवडण्यात आले.

चौथ्या व अंतिम दिवशी नागालँडला विजयासाठी आणखी १९४ धावांची गर​ज होती व त्यांचे ९ गडी शिल्लक होते. तिसऱ्या दिवशी नागालँडच्या फलंदाजांनी सुरेख खेळी करताना दिवसाचा खेळ संपला तेव्हा केवळ १ गडी गमावून १४५ धावा केल्या होत्या. चौथ्या डावात नागालँडकडून गोव्याला आव्हान मिळणार असे वाटत होते. मात्र गोव्याच्या भेदक माऱ्यासमोर नागालँडचा संपूर्ण डाव एकूण २५५ धावांत आटोपला.

चौथ्या दिवशी १ बाद १४५ धावांवरून पुढे खेळताना देगा निश्चिलने ७६ धावांवरून आपला डाव पुढे नेत शतकाच्या दिशेने दमदार चाल केली. त्याने गोव्याच्या गोलंदाजांना अडचणीत आणण्यास सुरुवात केली होती मात्र नव्वदीत प्रवेश करताच तो जास्त काळ टिकू शकला नाही व शतकापासून केवळ ६ धावा दूर असताना वैयक्तिक ९४ धावांवर बाद झाला.

चौथ्या दिवसी निश्चल वगळता केवळ चेतन बिष्ट ४१ धावा करू शकला मात्र नागालँडच्या इतर फलंदाजांनी पूर्णपणे निराशा केली. त्यांचे सहा फलंदाज दुहेरी आकडाही गाठू शकले नाहीत व रोमहर्षक होईल असे दिसणारा सामना अचानक एकतर्फी झाला व गोव्याने विजय नोंदवला. गोव्यातर्फे चौथ्या डावात कर्णधार दर्शन मिसाळने ५ तर राहुल मेहताने ४ गडी बाद केले. शुभम तारीला एक बळी मिळाला.

गोव्याचा सलग तिसरा विजय

रणजी चषक प्लेट २०२४-२५ गटात गोव्याचे प्रदर्शन शानदार राहिलेले आहे. पहिल्या सामन्यात गोव्याने सिक्कीमचा एक डाव आणि ५३ धावांनी पराभव केला होता तर मणिपूरवर ९ गडी राखून मात केली होती. या सामन्यातही गोव्याने नागालँडचा ८३ धावांनी पराभव करताना सलग तिसऱ्या विजयाची नोंद केली.

संक्षिप्त धावफलक :

गोवा : प. डाव : सर्वबाद १७९ धावा, दु. डाव : सर्वबाद ३०६ धावा.

नागालँड : प. डाव : सर्वबाद १४७ धावा, दु. डाव : सर्वबाद २५५ धावा.